नांदेड दि. 3 :- राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत 3 नोव्हेंबर पासून कुष्ठरोग शोध अभियान व सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहिम सुरु करण्यात आली आहे. कुष्ठरोग आणि क्षयरोगाचे निर्मूलन व्हावे व ज्याचे आजार प्राथमिक टप्प्यात आहेत, अशा रुग्णांवर वेळीच उपचार करुन या रोगाचा प्रसार होणार नाही याची दक्षता घेण्याच्या दृष्टीने ही मोहिम अत्यंत महत्वाची आहे. नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागासह महानगरापर्यत यादृष्टीने जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग व जिल्हा शल्य चिकित्सक यांनी परस्पर समन्वय साधून शोध मोहिमेची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले.
राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत कुष्ठरोग शोध अभियान व क्षयरुग्ण शोध मोहिम, नियमित लसीकरण, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण सोसायटी, एड्स नियंत्रण, गाभा समिती याबाबत आढावा बैठक जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, महिला व बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम, अशासकीय सदस्य डॉ. अशोक बेलखोडे, डॉ. पी.डी. जोशी पाटोदेकर व आरोग्य विभागातील अधिकारी, स्वयंसेवी संस्थेचे सदस्य आदीची उपस्थिती होती.
कुष्ठरोग, एड्स, क्षयरोग सारखे आजार रुग्णांच्या मनोधैर्याचे खच्चीकरण करतात. यात उपचार घेण्यासाठी त्यांची मानसिकता टाळाटाळ करते. यादृष्टीने अशा रुग्णांना सामाजिक लाभासह उपचार व समुपदेशनावर भर देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केल्या. कुपोषण होवू नये यासाठी प्रत्येक अंगणवाडीत लहान बालकांची तपासणी वेळोवेळी झालीच पाहीजे त्यासाठी वैद्यकीय अधिकारी व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी वेळेावेळी अंगणवाड्यांना भेट देवून पाहणी केली पाहिजे. शासनाने निर्देश दिल्याप्रमाणे पोषक विषयक निर्देशाची तपासणी झाली पाहिजे. सॅम व मॅम श्रेणीतील बालकांना वैद्यकीय अधिकारी व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी महिन्यातून दोन वेळेस भेट देवून कुपोषणातून सक्रीयपणे बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावेत. आगामी वर्षापासून पहिल्या वर्गापासून कुपोषण विषयक तपासणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
आरोग्याच्या बाबतीत तालुकास्तरावर कार्यशाळा घेवून स्थानिक पातळीवर असलेल्या शालेय व्यवस्थापनापासून सर्व संबंधित यंत्रणांना सक्षम करण्याचे त्यांनी सूचित केले. प्रत्येक नागरिकांच्या स्वास्थ्यासाठी शासन दुर्गम भागातील वाडी वसतीपासून महानगरातील विविध वसतीपर्यत कटिबध्द होवून काम करत आहे. आरोग्य विभागाच्या अनेक योजना यासाठी साकारल्या आहेत. या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेपासून तालुका पातळीवरील संबंधित यंत्रणांनी आपले उद्दिष्ट पूर्ण करण्यासह जबाबदारीने कर्तव्य पार पाडावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले.
सर्व शासकीय आरोग्य मोहिम व उपक्रमामध्ये खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांचा सहभाग हा अतिशय महत्वाचा आहे. त्यादृष्टीने सर्व तालुक्याच्या ठिकाणी खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांना अशा मोहिमा व उपक्रमांची माहिती देवून यात त्यांचा प्रभावी सहभाग करुन घेता येईल. यादृष्टीने तालुका पातळीवरील वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी नियोजन केले पाहिजे असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी स्पष्ट केले. या आवाहनाला प्रतिसाद देत किनवट सारख्या आदिवासी बहूल तालुक्यात आम्ही आवश्यक त्या प्रशिक्षणासाठी सहभाग देवू असे डॉ. अशोक बेलखोडे यांनी साने गुरुजी रुग्णालयाच्यावतीने स्पष्ट केले.