बौद्ध धर्मात दिपावलीचे महत्त्व!” बौद्धांनो दीपावली सण जरूर साजरी करा …!

” बौद्ध धर्मात दिपावलीचे महत्त्व!”
बौद्धांनो दीपावली सण जरूर साजरी करा…..!
दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण. अश्विन वैद्य त्रयोदशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया या पाच दिवसांमध्ये दिवाळीचा सण संपूर्ण भारतभर थाटामाटात साजरा केला जातो दिवाळीलाच दीपावली असे सुद्धा म्हणतात दिवाळी हा सण अमावस्येच्या दिवशी येतो
दिवाळी हा सण हिंदू धर्मातच नव्हे तर इतर धर्मांमध्ये सुद्धा अतिशय आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो. जसे की बौद्ध धर्म जैन धर्म सिख धर्म या तीनही धर्मामध्ये दिवाळी या सणाचे आपापले एक ऐतिहासिक महत्त्व आहे. या तिन्ही धर्मांमध्ये दिवाळी या सणाच्या दिवशी अतिशय महत्त्वाच्या घटना घडल्या होत्या म्हणून या धर्मात दिवाळी या सणाला खूप महत्त्व दिले जाते

जैन धर्मात याच दिवशी भगवान महावीर स्वामींचे निर्वाण झाले होते म्हणून मोक्षदिन म्हणून जैन मंदिरात हा दिवस साजरा केला जातो. तसेच सिख धर्मामध्ये याच दिवशी अमृतसर येथे १५७७ ला स्वर्ण मंदिराची स्थापना केली होती. तसेच शिखांचे सहावे गुरु गोविंद सिंह यांची तुरुंगातून सुटका झाली होती म्हणून सिखधर्मीय लोक दिवाळी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात.

बौद्ध धर्म या धर्मातही दिवाळी हा सण अतिशय महत्त्वाचा असून सर्व बौद्ध बांधव हे दिवाळी हा सण थाटामाटात दिव्यांच्या झगमगटात साजरा करतांना दिसतात.
परंतू आपल्या धर्मामध्ये दीपावलीला इतके महत्त्व का आहे आपण दीपावली का साजरी करावी हे बऱ्याच लोकांना अजूनही माहिती नाही .ते दिवाळी या सणाच्या दिवशी अभ्यंग स्नान, फराळ, फटाके, लक्ष्मीपूजन यालाच खरी दिवाळी मानतात. परंतु बौद्ध बांधवांनी दीपावली साजरी करण्याची प्रमुख दोन कारणे आहेत ती म्हणजे…

एका मान्यतेनुसार *भगवान गौतम बुद्ध* याच दिवशी आपल्या कपिल वस्तू या जन्मभूमीवर अठरा वर्षानंतर परतले होते. गौतम बुद्धाच्या या आगमनाच्या खुशीमध्ये संपूर्ण कपिल वस्तूमध्ये लाखो दीप प्रज्वलित करून त्यांचे भव्य दिव्य स्वागत करून कपिल वस्तू तील लोकांनी आनंदोत्सव साजरा केला होता .हे एक प्रमुख कारण आहे की बौद्ध धर्मात दीपावली या सणाला ऐतिहासिक महत्त्व आहे. म्हणून आजही बौद्ध बांधवांनी घरोघरी दीपावली हा सण साजरा करावा.

‌‌ बौद्धांनी दीपावली साजरी करावी याचे अजून एक दुसरे महत्त्वाचे कारण असे की, याच दिवशी सम्राट अशोक राजांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारला होता. त्यानंतर सम्राट अशोक राजाने कधीही युद्ध केले नाही. ते अहिंसावादी बनले बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर अशोक राजांनी भारत व आजूबाजूच्या सर्वच देशांमध्ये बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसार केला. यामुळे संपूर्ण जगामध्ये बौद्ध धर्म पसरला गेला. या प्रमुख आनंदी घटनेच्या आठवणीत बौद्ध धर्मीय लोकांनी दिवाळी हा सण जरूर साजरा करावा.

बौद्धांनी दीपावली हा सण नेमका कसा साजरा करावा या दिवशी बौद्ध बांधवांनी आपल्या घरी गौतम बुद्धांची मूर्ती ठेवून पुष्प अर्पण करून आपल्या घरी संपूर्ण परिवारासह बुद्ध वंदना घ्यावी. आपले घर अंगण दिव्यांनी उजळून टाकावे .तसेच या दिवशी विहारामध्ये खीरदान करावी.
फराळामध्ये चिवडा चकली अनारसे लाडू यासारखे गोड खमंग पदार्थही बनविले‌ तरी चालतील.शेवटी ते अन्नपदार्थ आहेत. शुभ्र वस्त्र परिधान करून बौद्ध विहारांमध्ये सामूहिकरीतीने बुद्ध वंदना घ्यावी.

 

बौद्ध विहार दिव्यांच्या लख्ख प्रकाशामध्ये उजळून टाकावीत. धम्म बांधवांनी पंचशील आचरणात आणावे.ज्या
पद्धतीने आपण बुद्ध पौर्णिमा साजरी करतो त्याच पद्धतीने दीपावली हा ही सण शांतमयी वातावरणामध्ये सर्व बौद्ध बांधवांनी नक्कीच साजरा करावा. या दिनाचे महत्त्व आपल्या घरातील लहान बालकांना सुद्धा समजावून सांगावे.

 

बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेबांच्या उपदेशाचे पालन करावे दीपावली या सणाचे महत्त्व जाणून समाजाला धम्माचे ज्ञान व्हावे यासाठी विविध उपक्रम राबवावेत.

 

लेखिका.
सौ अंजली मनोज मुनेश्वर (अंजुमन)
मो.न.९६३७११६५५३
नांदेड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *