@दिवाळी साठी लघुकथा … आठवणीतली दिवाळी

 

समृध्दीच्या कणाकणात सजावी,नटावी दिवाळी……!!
हासत, नाचत, गात यावी दिवाळी…!!
उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे,….!!
सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे… असा शुभेच्छांचा संदेश घेऊन येणारी दिवाळी हा सण सर्वत्रच खुप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याच निमित्त मात्राने मैत्रीणींमध्ये माहेरी जाण्यासाठीची कुजबुज सुरु झाली.

माहेर हा शब्द प्रत्येक स्त्रीच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. आई-वडील ,बहीण -भाऊ, नातलग इत्यादी माहेरची माणसं ही तिची सर्व आपली असतात. माहेराची आठवण येताच. मीना लहानपणीच्या दिवाळीच्या त्या आठवणीत रमून गेली..
प्रत्येक सणाचे वैयक्तिक मत,महत्व आणि त्याचे असे एक सौंदर्य असते. जसे की पाडव्याच्या गुडी;बत्तास्यानी गोड होती. गणपतीचे आगमन;मोदकाचा मानपान. घटाची स्थापना ;दुर्गेचे माहेरपण.असेच सगळे सण आपले कौतुक सांगत असतात.

प्रेम, जिव्हाळा, आपुलकीचा सण म्हणजे दिवाळी, आनंदाचे वारे घेऊन येणार दिवाळीचा सण आपल्याला प्रत्येक दिवसाचे महत्व सांगत येतो.लहानपणी कळायचं नाही दिवाळी का साजरी करतात ते पण दिवाळीच्या सुट्ट्या म्हणलं की खूप धमाल वाटायची, बालकिल्ले बांधायचे जी की आता नामशेष झाले आहे, नवीन कपडे ,वेगवेगळे पदार्थ फराळ म्हणून खायला मिळायचे, शाळेला सुट्टी, त्यामुळे गृहपाठाला सुट्टी, लवकर उठायचे उठण्याने आंघोळ करायची, मोठमोठ्या रांगोळी टाकायची, घर सजवायचे, दिवाळी म्हणून बस एवढंच कळायचं…

दिवाळी म्हटली की ,नुकतीच थंडीची चाहूल लागलेली असायची,मग काय सकाळी लवकर उठणे म्हणजे आमच्यासाठी
युद्धभूमीवर जाणे असं वाटायचं… उठण्याची आंघोळ मग औक्षण करायचं व करून घ्यायचं,फराळ खाईचा आणि मग नंतर आम्ही घराला सजवायला सुरू करायचो, पणत्या लावायचो आणि खरी धमाल सुरू करायचो फटाके वाजवायची कोणी लवंगी फटाका, लक्ष्मी बॉम्ब,सुतळी बॉम्ब,पाऊस,भुईचक्र,तर कोणी चिली मिली वाजवायचे फटाके वाजवायचे…

दिवाळीची सुरुवात वसुबारसने होई गाई-म्हैशी ना नैवेद्य दाखवला जायचा आणि एक गाणे म्हणायचे,”दिन दिन दिवाळी ,गाई म्हैशी ओवाळी”.
तर अशी गाणे बोलून दिवाळीची सुरवात व्हायची
भावाला भाऊबीजेला ओवळण्यापेक्षा त्याने काय गिफ्ट आणलाय हेच बगण्यात उत्साही असायचो. आणि त्याने गिफ्ट नाही दिले तर त्याच्या आवडीचे फटाके आम्ही चोरायचो आणि त्याच्या पुढे वाजवायचो. ते थोडे हट्टी पण लाडीक वागणे हे नेहमीच घरात आवडे. दिवाळी पाडव्याला खास महत्व होते.

जेवढे रंग इंद्रधनुष्यत नसतील त्याहून अधिक रंग माझ्या या लहानपणीच्या आठवणीतल्या दिवाळीत दडले होते.
आठवणींच्या खुशीत बिलगून असतानाच तेवढ्यात कोण्या तरी मैत्रीणीने आवाज दिला चल उठ! जाऊ घरी…सकाळी माहेरी जाण्यासाठी निघायचे आहे म्हणून…पण आता मात्र माझ्या मनाची त्रिधा वाढत होती.
जव्हा आई-वडीलचं छत्रच निघून जातं तेव्हा मात्र सगळी सण, उत्सव, नातलगं,आप्तसंबध, समस्त जग, माहेरचं अंगण ओसाड वाटू लागते.
घर, छप्पर, ओसरी सारं सारं क्षणात वाळवंट होऊन गेलेलं जाणवतं. फुलत नसतो कुठेच आपल्या कौतुकाचे मळे, डोळ्यांची फुलवात लावून दारी कोणीच वाट पाहत उभं नसतं… आपुलकी, काळजी आणि मायेच्या शब्दातले शिंपण ओंजळीत नसतं…

घरभर विखुरलेल्या वस्तू निराधार झालेल्या डोळ्यांनी पाहवत नाही…
चष्म्याचं घर, खुर्च्या,पलंग,कसली ती बिलं अन् कुठल्यातरी त्या झरझरत्या याद्या बिचार्याच्या सोबतीला कोणी कोणीच भरायला त्या घरात उरलेलं नव्हतं..
नुसतं घरभर विखुरलेल्या आठवणींना कवटाळून पाहत राहायचं फोटोतल्या क्षणांच्या शिदोरीत आपली ही माणसं जवळ नाहीत असं समजून सारं काही उसास्यात गिळायचं…

 

आई वडील गेल्यावर शिक्षा असते त्या घरात जाणं
चार भिंती आणि फक्त छप्पर उरलेलं पाहणं ते घर माहेर म्हणून शिल्लक नसलेलं..लोक म्हणतात, मुलीची पाठवणी करणं फार कठीण असतं पण आई वडीलांची पाठवणं करणं हेही हवं तेवढं सोपं नसतं…एकेक वस्तू पसारा म्हणून आवरतं जाणं… त्यांच्याच वास्तू मधील त्यांचेच स्पर्श पुसत जाणं…कानढळ्या बसल्या गत
‘परत कधी येणार’ या माहेरच्या एकाच प्रश्नाने संयमाचा बांध सुटायचा. सासरची वाट धरताना‘माहेराला’ बिलगायची त्या मिठीत माहेरची माणसं एकवटून घ्यायची.

 

ओलावलेल्या पापण्यांमध्ये अवघे माहेरपण, तो आनंद, ते उनाडपण साठवून दाटलेल्या कंठाने हुंदके देतच सासरची वाट धरायची…पुन्हा एकदा माहेरी येण्यासाठी…पुन्हा एकदा माहेरपण जगण्यासाठी…पण गेलेली माणसं कधीच परत येणार नाही…हा कडवटपणाचा घास न गिळण्या पलिकडचा झाल्यावर आता काय माहेरपण जगायचं यांची खंत खुप कमी वयातच पदरी पडल्यावर…त्याच्या झळा कश्या सोसायच्या…

आई-वडीलच्या नावाची चादर जव्हा आयुष्यातून निघून जाते… तेव्हा आयुष्यातील प्रत्येक सकाळ हि जबाबदारी ची जाणिव करुन देत असते…मग या माहेरच्या आठवणीत दिवाळी कशी साजरी करायची. स्वतःचं सामान आवरताना, एकट्यानेच रडायचं..
स्वतःचे स्वतःशी चाललेले अखंड संवाद..मध्यचं अडखळायच, सावरायचं… काही वेळेनंतर भानावर येऊन हातातील बनवलेली आंब्याची पान तोडून त्याची सुंदर तोरणं माळ दारावर चढवली होती. ती छान शोभत होती…घरात कोणीही नव्हतं पण घरातील आठवणींची वर्दळ डोळ्यासमोर थैमान घालत होती.
अगदीच थोडा सडा, रांगोळी, फुलं जमवून देवघरातल्या जागे जवळ दिवा लावून यंदा ची दिवाळी साजरी केली. 

उजळलेल्या दिव्याच्या प्रकाशात आई वडिलांच रूप डोळ्यात साठवून मीना सासरी वळली होती.
पाउल टाकलंय उंबरठ्याबाहेर,
मन अजून घरातच रेंगाळतंय..
दिव्याच्या लखलखटात बाहेरून,
पण,माहेरघर अंधारात आठवणी शोधतंय..

 

रूचिरा बेटकर, नांदेड.
9970774211

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *