दिवाळीनंतरचा परतीचा प्रवास

 

दिवाळी म्हणजे अंधारावर प्रकाशाने मिळवलेल्या विजयाचा उत्सव – किती साधी, सोपी, सुंदर संकल्पना!
पण नुकतीच एकदाची संपली हि दिवाळी. आनंद, मौज-मजा, गाठीभेटी, फोटो विथ फॅमिली असा सगळं होऊन गेलं. जुन्या बालपणीच्या मित्रमैत्रीणींसोबत पुन्हा एकदा गप्पा, टप्पा झाल्या. बऱ्याच गोष्टीतून बराच आनंद देऊन जातो हा दिवाळी सण ! घरादारात समाधान, मनात गोडवा, नातेवाईकांशी पोट भरून गप्पा, अनेक किस्से आठवून हशा पिकायचा. घरोघरी ताट भरभरून फराळ व्हायचा. सणाचे हे पाच सहा दिवस कसे भुर्रकन उडून गेले कळलेच नाही. सगळीकडे एकच आनंद पसरलेला.
गावाकडे आल्यावर सडा रांगोळीने अंगण बहरलेलं दिसायचं, घरोघरी चुली पेटवल्या जायच्या आणि शहराच्या धावपळीत हरवलेले असंख्य जीव पुन्हा एकदा सारवलेल्या घरात सुखाचे चार घास भरवले जायचे. गावाकडचं एरवी सुन्न सुन्न वाटणारं अंगण रात्री गप्पांनी बहरून जायचं. रात्री गप्पांमध्ये कधी डोळा लागायचा ते कळायचं नाही.
आपल्या घरी असताना एरवी दूधवाला, पेपरवाला यांच्या मुळे झोपमोड व्हायची. पण गावाकडं पहाटे पहाटेच मंदिरातील घंटा, काकड आरत्या, विहिरीवरील रहाटीची कुईकुई आणि गोठ्यातील गोंगाट असं सर्व असल्यामुळं हल्ली मोबाइलमध्ये अलार्म लावावं लागले नाही.
रोजच्या जगण्याच्या रहाटगाड्यात अडकलेलो असताना सुट्ट्टीच्या निमित्ताने आठ दहा दिवस का होईना गावाकडं जाऊन, बालपणात रमून मनमोकळे वाटले. पण एकदा का हा दिवाळीचा सण आटोपला आणि आता परतीची वेळ येऊन ठेपली, मग उपसलेल्या बॅगा पुन्हा एकदा भरतांना जीव कासावीस झाला. हुंदका दाबतच शब्द कानावर पडायचा ‘थांबले असते आजचा दिवस’ हे शब्द ऐकून ही भरल्या डोळ्यांनी…कपडे तसेच बॅगेत भरले जायचे.
आजी- आजोबा,आई- वडील, आमचे मुके घेत निरोप द्यायला थांबायचे.
नातलगात आणि शेजारांत आपल्या बद्दल प्रेम, जिव्हाळा, आपुलकी राहायाची. तोच जिव्हाळा अन् जराशी प्रेमाची आठवण देत प्रवासात खाऊ घे हं ! असं म्हणून हातात पैसे द्यायची. गावाकडे जाताना पुरतीच एक बॅग नेली जात पण तिकडून परतीचा प्रवास करत असताना सोडायला आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या हातात आठवणीची शिदोरी म्हणून बॅग होती. त्या बॅगा घेवून बस स्टँडचा रस्ता धरायचं आणि आपण त्यांच्यामागे निमूटपणे निघायचं.
अनेक कुटुंब गावाच्या बसस्टँडवर गोळा झालेली असायची. त्यांना सोडायला गावाकडची कुटुंब यायची. गावातल्या हवेतील गारवा, आजी आजोबा आणि नातलगांचे प्रेम उरात भरून ही आमच्या सारखीच चार डोक्यांची अनेक कुटुंब पुन्हा एकदा भाकरीच्या चंद्रासाठी परतीच्या प्रवासाला निघायची. येतांना गोंगाटाने भरलेली बस आता जाताना मात्र हुंदक्यांनी फुसफसत दिसली. कंडक्टरने डबल बेल देत, बस निघायची. सर्वांना खिडकीतून हात बाहेर काढून काळजी घ्या, आम्ही पुन्हा येऊ, असं म्हणत परतीचा प्रवास सुरु होई. येतांना भरभरून येणारी बस जातांना मात्र नुसताच खडखडाट करून जात होती.
पुन्हा एकदा तो आठवणींचा हिंदोळा गावाकडच्या गार वाऱ्यांसह मनातल्या मनातच हेलकावे घेत, जसजसं गाव मागे पडायचं, तसतसं गावातली झाडं, ती रस्त्यावरच लागणारी शाळा, ते मंदिरं आणि तो मुका झालेला रस्ता अनेकांना एकच प्रश्न विचारत असेल, पुन्हा कधी येणार, पुन्हा कधी येणार ??….

रूचिरा बेटकर नांदेड
9970774211

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *