अंबाबाई दर्शन

सकाळची वेळ.कोवळ ऊन पाय पसरत होतं.हळूच थंड हवेची झळूक अंगाला स्पर्श करून जात होती.अंगणातील झाडावर पक्ष्यांचा किलबिलाट चालू होता.झाड मात्र शांता उभा होता.वातावरण प्रसन्न होतं.तेवढयात दूधवाल्यानं आवाज दिलं”दूध घ्या दूध” व त्याच वेळी मोबाईल फोनची रिंग ही वाजली.
मी फोन उचललो.समोरुन विजयचा आवाज आला,”बाबा,दिनांक सातचं धनबाद कोल्हापूर या रेल्वेचे तिकीटआरक्षण केलोय. आपण सगळेच जाणार आहेत.”मी : सगळेच म्हणजे कोण कोण ? “सगळेच म्हणजे आपलं पूर्ण कुटुम्ब.” विजय म्हणाला .मी हो म्हणालो .
सूनबाई प्रा.शिक्षिका तिला दिवाळीची सूट्टी.दुसऱ्याच दिवशी रात्रीला नऊ वाजून विस मिनिटाला गाडी होती.माझी दोन मुलं व सूनबाई पुण्यातून कोल्हापूरला येणार होती.तर नांदेडहून आम्ही लहान मोठे सात जण.ठिक साडेआठ वाजता रेल्वे स्टेशन गाठलोत.गाडी जवळपास दहा वाजता आली व दहा सत्तावीस वाजता हालत डूलत शिट्टी वाजवत निघाली.
गाडी जीवतोडून पळत होती.कधी लिंबगाव गेलं व कधी पूर्णा आला हे समजलंचं नाही.माझे नातू खोडया करत होते.ते त्याच्याचं धुंदीत होते.वरच्या आसनावरून खालच्या आसनावर उड्या मारत होते.गाडी जेवढ्या वेगात पोहचली त्यापेक्षा दुप्पट वेळ दम घेत थांबली.बऱ्याच वेळानंतर गाडीनं सिट्टी दिली. खाली थांबलेले एकमेकाला धक्के देत मध्ये चढले.पुन्हा गाडीने वेग घेतलं.गाडी भन्नाट वेगाने पळू लागली.आली परभणी.थोडा वेळ थांबली.
गाडीने इशारा केला.लोकं कोंबल्यागत गाडीत बसली होती.डब्बा आरक्षणाचा पण साधरण डब्ब्यासारखी गर्दी होती.गाडी लईच भन्नाट सुसाट वेगाने पळत होती.गंगाखेड पार करून परळीला येवून थांबली.पळून पळून दमल्यावाणी गाडी दमायची व जणू सांगायची ” मला तरास देवू नका.म्या लईच दमलया बगा. थोडीशी इसरांती घेवू द्या की ,” असं म्हणून परळीला दोन तास थांबली . पुन्हा हळूच कुरवाळत हळूच म्हणाली,”इसरांती घेणं झालं . चाला निगूत की.”बाहेर आलेले सावध झाले पण आत आले नाही तेव्हा थोडंसं रागत येवून जोरात सांगितलं ” ऐकूं येईना गेलया व्हय.बसा मणून सांगूललोय ते.”सर्व प्रवाशी आत चढले.एक सुखद धक्का दिला.स्टेशनच्या बाहेर पडली गाडी.गाडीने पुन्हा वेग धरली.व रुसल्यासारखी लातूर रोडला (फाटयाला) येवून थांबली.
लातूर रोडलाही जवळपास तासभर थांबली असेल.नांदेडहून साडेदहा वाजता निघालेली गाडी सकाळी सहा वाजता लातूरला पोहचली.गाडीचा वेग चांगला होता.गाडी लेकूरवाळी नव्हती.
मोजकेच स्टेशनला थांबा घेवूनही गाडी धापा टाकित थांबल्यागत वाटत होती.एक एक स्टेशन पार करित धाराशिव,बार्शीवरुन कुर्डूवाडीला गाडी पुन्हा दम घेण्यासाठी जादा वेळ थांबली.दिवस दोन तीन कासरा वर आलं होतं. गाडीत चहावाले,फळवाले असे अनेक लोक विचित्र आवाजात आपआपलं माल विकत घ्या म्हणून ओरडत होते.
केळीवाला: ये केलेलो केलेलो केलेलो
माझे नातू ( हसत ) : ये केलेलो केलेलो केलेलो .
चहावाला : ये चायलो चायलो चायलो. नातू त्याच्याही आवाजाची नक्कल करत होते .
मध्येच फोनचं इसस्टेण्ड घ्या.हेडफोन घ्या.खारे खरमुरे,मिसळ,चिक्की घ्या असा आवाज येत होतं.थंडा थंडा पाणी बोटल, सरका ना भैया.बिरीयानी गरम गरम बिरीयानी असा नॉनस्टॉप आवाज येत होता .
माझ्या नातूचं धिंगाना चालूच होता.ते विक्रेत्याच्या आवाजाची नक्कल करत होते.वेगवेगळ्या आवाजात वेगवेगळ्या वस्तू विकण्याचं हवभाव करत होते.तेवढयात एक मध्यमवयाची बाई सिनेमाचं गाणं म्हणत भिक मागत होती.गाणं होतं “परदेशी परदेशी जाणा नही मुझे छोडके ” गाणं चालीवर म्हणत होती. त्याच वेळी बाहेरच्या बाजूने एक सत्तरी पार केलेलं आंधळा माणुस धरम करा ,धरम करा पुण्यं लागेल म्हणत होता.मध्येच तृतीयपंथी टाळ्या वाजवून ”ए ssचिकण्या देना दिवाळी की भेट” म्हणत होते.
बराच वेळ दम घेवून गाडी निघाली.कुर्डूवाडी येथून गोरे नावाचं एक माणुस माझ्यासमोरच्या सिटवर बसला.तो बोलकार होता.तो रामराम करत म्हणाला,” साहेब मराठा आरक्षणबदल आपलं मत काय ?” मी : त्यांनाही आरक्षण मिळायला पाहिजे.”
गोरे : आसं कसं मराठा सुरवातीपासून सत्ताधारी आहेत.पुढारलेली जात आहे.”मी: मराठा कोण ?आहे जे मराठी भाषा बोलतात व महाराष्ट्रात राहतात ते सर्व मराठे.आपण सगळेच मराठा आहोत.पण आपण ज्यांना मराठे समजतो ते सगळेच मराठे श्रीमंत नाहीत. त्यांनाही स्वतंत्रपणे आरक्षण मिळावं.”गोरे पुढं फारशे काही बोलले नाही.रेल्वे पंढरपूर,सांगोला,जत रोड,मिरज व कवठेमहाकाळ येथे दम घेत घेत ठिक दुपारनंतर दोन वाजता कोल्हापूरला पोहचली.पुण्याहून आलेले माझी दोन्ही मुलं व सूनबाई रेल्वे स्टेशनवरच वाट पहात थांबले होते.
रेल्वे स्टेशनवरून अटोरिक्षाने अंबाबाई मंदिरासमोरच आगदी जवळ एका यात्री निवासात तिन खोल्या भाड्याने घेतल्या होत्या. स्नान आटोपून अंबाबाईच्या मंदिरात गेलोत. मंदिरात फारशी गर्दी नव्हती.अगदी आरामात दर्शन आटोपलं.मंदिराच्या बाहेर छायाचित्र काढण्याचा छोटासा कार्यक्रमही पार पाडलं.
मंदिरातून बाहेर पडलो.तेथून बाहेर पडताना अंधार पडला होता.सूर्य डोगराआड पूर्णपणे लपला होता.पश्चिमेकडचं आकाश लाल गुलाबी दिसत होता.आकाश थोडसं लाजरा असल्यासारखं वाटत होतं.मंदिरातून बाहेर पडलो. मंदिरासमोरच्या रस्त्याने रंकाळा चौपाटी उद्यान गाठलोत.आ हाss झक्कास स्थळ आहे.आगदी पहाण्यासारखं .रंकाळा एक छानसं तलाव आहे. मुंबईच्या चौपटीवर फिरत असल्याचं भास होते.
किनाऱ्यावर लावलेले विजेच्या दिव्याचे प्रतिबिंब पाण्यात सुंदर दिसत होते.खरं तर नांदेड ते कोल्हापूर प्रवास करून शरीराला थकवा जाणवत होता.तरी तेथे गेल्यानंतर थकलेलं मन तरतरीत झालं.मनात टवटवीतपणा आला.मी थोडं वेळ इकडे तिकडे पाहत थांबलो.
रंकाळा नाव का पडलं असेल? माझ्या मनात प्रश्न शिरला.तळ्याच्या काठी संरक्षक कठडयावर जवळपास सत्तरी पार केलेले दोन माणसं बसलेली होती.मी तेथे जावून त्यांना रामराम केलो व विचारलो,”दादा श्री हा तलाव नैसर्गिक आहे का?दोघांपैकी एक जण म्हणाला,” बाहेरगावचे दिसता?मी : होय मी नांदेडहून आलोया.” त्यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं. दुसरा म्हणाला,”छ.शाहू महाराजानी बांधलय. मारोती मंदिर बांधण्यासाठी येथून खोदकाम करुन दगडं काढलं व पुढे चालून हा तलाव तयार झाला.
मी :या तलावाचं नाव रंकाळा का पडलाय?त्यातील एक जण,” येथे रंकाळा नावाच्या एका क्रुर महापापी राक्षसाला भैरवीने ठार मारले म्हणुन.” त्याचं बोलणं मध्येच तोडत पाहिला म्हणाला ,” अंबाबाई(महालक्ष्मी)ने कोल्हासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले म्हणून या गावचं नाव कोल्हापूर पडलय.”मलाही अधिकची माहिती मिळाल्याने आनंद झाला.
माझे दोन्ही नातू तेथे भरपूर मस्ती करत होते.स्प्रींगच्या उंचवट्ठयावर उडया मारत होते.बराच वेळ तळ्याकाठी रेंगाळत राहीलो. तेथून परत यात्री निवासला आलोत.नऊ साडेनऊ वाजले होते.सकाळी लवकरच बाहेर पडायचं असा बेत आखला.त्यासाठी रात्रीलाच दहा माणसं बसतील असी एक गाडी करुन सर्वजण आपआपल्या खोलीत निद्रा देवीच्या आधिन झाले.
सकाळच्या सर्व विधि पार पाडून बाहेर जाण्यास तयार झालोत.गाडी आली. रस्त्यावरच सकाळी सकाळी गरमागरम गोलगप्पा खाऊन गाडीत बसलो.गाडी निघाली.प्रथम पंचगंगा घाट येथील सात आठ पुरातन काळातील मंदिर दुरुनच पाहिलो.सर्व मंदिर पाण्यातच आहेत.नदीचं पाणी व गटारातील पाणी यात काहीच फरक दिसत नाही.त्यामुळे पाण्यात पायही बुडवला नाही.नदीची आवस्था पाहून आम्ही सर्वच दुःखी झालो.
गाडी रत्नागिरी रस्त्याने पळत होती.दोन्ही बाजूला ऊसांची शेती वाऱ्यावर डोलत येणाऱ्या जाणाऱ्याचं जणू स्वागतच करत होती. गाडीने रत्नागिरी रस्ता सोडला तसा मी म्हणालो, “काय भाऊ मर्दाने आपण कुठं चाललाव ? . गाडीच्या चालकाचं आडनाव मर्दाने होतं. तो म्हणाला,” आता आपण ज्योतिबाच्या डोंगरावर जात आहोत.तिथं ज्योर्तिलिंग आहे.ज्योतीबाचं मंदिर आहे.ते वेगवेगळ्या नावानं ओळखलं जाते. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या पूर्वजांनी ते बांधलेले आहे.”चालक माहिती पुरवत होता.माझे कान त्याच्या बोलण्याकडे होते तर डोळे बाहेरचं जग पहाण्यात मग्न होते.एक एक माळा चढून जावे तसं गाडी वेडीवाकडी वळणं घेत सातव्या आठव्या मजल्यावर जावून थांबली.उंच्च डोंगरमाथ्यावर सुंदर मंदिर आहे.त्यात तेवढीच सुंदर मूर्ती आहे.
“त्या ठिकाणी एका तपस्वीने राक्षसांचा सुळसुळाट बंद केला. राक्षसापासून लोकांची मुक्ती करून ते हिमालयाकडे निघाले तेव्हा महालक्ष्मीने त्यांना तेथेच थांबण्याची विनंती केली व त्यांनी देवीच्या शब्दाला मान देवून शेवटपर्यंत तेथेच थांबले.” चालक सांगत होता आम्ही ऐकत होतो.मी चालकाला म्हणालो, “आम्ही फक्त ‘ज्योतीबाचा नवस ‘ हा मराठी सेनिमा पाहिलाय बा यापेक्षा जास्त आम्हाला कायबी माहीत नाही.”
ज्योतिबाच्या डोंगरावरुन गाडी पळत निघाली किल्ले पन्हाळगडाकडे. तेथून चौदा पंधरा किमी असेल.उताराचा रस्ता.समोरचा उभा डोंगर दिसत होता.गाडी पळत होती.गाडीत बसल्या बसल्या छ.शिवाजी महाराजचं पराक्रम आठवत होतं.किल्ले कुणी बांधले?का बांधले?या विचारापेक्षा किल्ल्याचं प्रत्येक दगडं शिवाजी महाराजाचं शौर्य,विरगाथा सांगतो,येथील भूमीच्या प्रत्येक कणाकणात महाराजचं कार्य,शौर्य ठासून भरलेलं आहे याची जाणीव प्रत्येकाला होत आसते.
मी विचारांच्या तंद्रीत हरवलो होतो. गाडी पन्हाळगडावर कधी पोहचली हेच कळालं नाही.किल्ल्याच परिघ जवळपास आठ कि मी चं आहे. दक्षिण भारतातील सर्वात मोठा किल्ला. पण तेवढं काही पाहिलो नाही. तेथील शिवमंदिर , सज्जाकोठी ( महाराजचं विश्रांतीस्थळ ) , तिन दरवाजा , अंबरखाना ( धान्याचं कोठार ) , साधोबा दर्गा , धर्म कोठी , दारूगोळा कोठार इत्यादी स्थळ पाहून परत कोल्हापूरकडे निघालो .
सकाळी लवकर निघालो होतो.दुपार टळून गेली होती.सूर्य डोक्यावरून कानाकडे सरकत होता.सर्वांनाच सपाटून भूक लागली होती.रस्त्याच्या दोन्ही बाजूला हॉटेल, धाबे नटूनथटून ग्राहकांना आकर्षित करत होते. या जेवायला म्हणत होते.गाडीच्या चालाकाने हॉटेल पंचवटीसमोर गाडी थांबविली.गाडीतून आम्ही सर्व पटापट उतरलो.हात पाय तोंड धुवून आसनावर बसलो.विजय व विशालने चर्चा करून आपआपल्या आवडीनुसार ऑर्डर दिली.पंधरा विसमिनिटानंतर जेवनाच्या थाळी प्रत्येकांसमोर ठेवली.येथेच्छ जेवन करुन कोल्हापूर गाठलोत.
कोल्हापूरमधील शाहू पॅलेस पाहिला.अतिशय सुंदर राजवाडा.त्या ठिकानी सध्याला वस्तूसंग्राहलय आहे.तेथील सगळ्या वस्तू राजधरण्यांशी संबधित आहेत.तेथे सुंदर भव्य राजदरबार आहे.तेथे शाहू महारांजानी शिकार केलेल्या वेगवेगळ्या प्राण्याच्या भुसा भरून,रासायनिक प्रक्रिया केलेल्या त्यात वाघ, गवा,हारणं,गेंडा,हत्ती यांचे तोंड भिंतीला लावून तर काही जमीनीवर ठेवलेले आहेत.वेगवेगळे पक्षीही आहेत.अनेक प्रकारची शस्त्रात्रे आहेत. राजघराण्यातील स्त्री पुरुषांची छायाचित्र आहेत. त्याकाळातील राजाराणीचे वस्त्र आहेत.खूप काही आहे तेथे पहाण्यासारखं.तेथील सगळ्या वस्तू राजधरण्यांशी संबधित आहेत.
ते पाहून झाल्यानंतर तेथून गाडी निघाली कण्हेर मठाकडे.ते गाव कोल्हापूरपासून बारा तेरा कि मी असेल.सूर्य चक्क डोंगारावर उतरू पहात होता.गाडी गावात पोहचली.दिवस मावळतीला गेला होता. आम्ही प्रथम तिकीट काढलो.प्रत्येकी दिडशे रुपये तिकीट होतं.छोटयांना सत्तर रुपये.चक्क आम्ही जमीनीचा खाली अंधारी भूयारी गुंफ्यात शिरलो. तेथे प्राचीन भारतातील अनेक थोर पुरुष त्यात शास्त्रज्ञ,त्याकाळचे वैद्य,लेखक,संत,ऋषीमुनी यांचे पुतळे व त्यांची माहिती दिलेली आहे .
गुफ्यातून बाहेर पडलो तर तोंडात बोट घालून आम्ही सर्वजन थक्क झालो.तिथं जे कांही आम्ही पहात होतो ते सजीव की निर्जीव हेच कळत नव्हतं.हिरवं कचं शेत दिसत होतं.तेथे नांगरटी,पाळीपासून पेरणी रासीपर्यंतच्या कामाचं हुबेहुब जिवंत पुतळे उभे केलेले आहेत.खळं आहे.त्या मेढ रोवलेली आहे.चार पाच बैलाने मळणीचं काम चालू आहे.मळणी संपली.खळ्यात वावडी लावून धान्य उधळण्याच काम चालू आहे.कारभारीन खळ्यातीत रासीतला कचरा बाजूला करत आहे. तर दुसऱ्या बाजूला गुरेढोरं,शेळ्या,मेंढया,म्हशी चरत आहेत. गुराखी मुलांनी छानपैकी विठठी दांडूचा खेळ मांडलेला आहे.काही लगोरची खेळत आहेत. काहीनी सुरपाटीचा डाव मांडलेला आहे.तेथे गोटया खेळताना मुलं दिसतील. त्या ठिकाणी लपाछपीचा खेळ आहे.सर्व काही हुबेहुब. आपलं ग्रामीण जीवन आपलं बालपण तिथेहुबेहुब मूर्तीव्दारे चितारलेलं आहे.मी माझ्या बालपणात हारवून गेलो होतो.गाई चारवताना तेच खेळ तसंच भांडण लहानपणी करायचो..हिरवं कचं शेत दिसत होतं.तेथे नांगरटी,पाळीपासून पेरणी रासीपर्यंतच्या कामाचं हुबेहुब जिवंत पुतळे उभे केलेले आहेत.खळं आहे.त्या मेढ रोवलेली आहे.चार पाच बैलाने मळणीचं काम चालू आहे.मळणी संपली.खळ्यात वावडी लावून धान्य उधळण्याच काम चालू आहे.कारभारीन खळ्यातीत रासीतला कचरा बाजूला करत आहे. तर दुसऱ्या बाजूला गुरेढोरं,शेळ्या,मेंढया,म्हशी चरत आहेत. गुराखी मुलांनी छानपैकी विठठी दांडूचा खेळ मांडलेला आहे.काही लगोरची खेळत आहेत. काहीनी सुरपाटीचा डाव मांडलेला आहे.तेथे गोटया खेळताना मुलं दिसतील. त्या ठिकाणी लपाछपीचा खेळ आहे.सर्व काही हुबेहुब. आपलं ग्रामीण जीवन आपलं बालपण तिथेहुबेहुब मूर्तीव्दारे चितारलेलं आहे.मी माझ्या बालपणात हारवून गेलो होतो.गाई चारवताना तेच खेळ तसंच भांडण लहानपणी करायचो.
गावातील बारा बलुतेदारपद्धती आज नाही.बारा बलुतेदारपद्धती नामशेष झालेली आहेत.सध्याच्या तरुण पिढीला बारा बलुतेदार कोण कोण होते हे माहीत नाही.सुतार,कुंभार,न्हावी, गुरव,चांभार,मातंग,तैली,परीट,माळी,महार, लोहार,कोळी. हे गावातील बारा बलुतेदार होते. या लोकांच्या मदतीने गावगाडा सुख समाधानाने चालत राहायाचा.आहो अख्खा गावाचं त्या ठिकणी उभा केलेला आहे.तेथे जुन्या काळातील.रुढी.सण, पंरपरा,व्यापार,व्यवसाय उभं केलेल आहे.तेथे वेगवेगळे घरं उभे केलेले आहेत.तिथं हुबेहुब वतनदारचं वाडा आहे.तिथं पाटलाचा वाडा आहे.तिथं लमाण्याचं घर आहे.बारा बलुतेदारचं काम चालू आहे. जिवंत वाटवं असं चित्रन आहे सगळं.जीवंत वाटवं असं तेथे एक निर्जीव खेडेगावचं उभारलेलं आहे.कोल्हापूरला गेलात तर कणेरगावाला भेट द्याचं.
मग परत यात्री निवासाला आलो. हातपाय धुतून रात्रीचं जेवण घेवून पहाटे चार वाजताच्या रेल्वेगाडीने निघायचं म्हणुन सामानाची आवराआवरी करून ऑटोवाल्याला वेळेवर येण्यास सांगून आगं टाकलं.पहाटे तीन वाजता उठून रेल्वे स्टेशन गाठलोत.आसन आरक्षित होते, पण डब्बा खचाखच्च भरलेला होता.बाहेर राज्यातून म्हणजे बिहार,झारखंड,छत्तीसगडचे कामगार बसलेले होते.पाय ठेवायला जागा नव्हती.कसेबसे आसन गाठलोत.नांदेडपर्यंत खाली उतरता आले नाही.रेल्वेतील विक्रेत्यानां गाडीमध्ये फिरता आलं नाही.त्या दिवशी आम्हा सर्वांनाच उपवास घडला.पहाटे सव्वाचारला निघालेली दिक्षाभूमी जलद गाडी(कोल्हापूर धनबाद)रात्री नऊ वाजता नांदेडला पोहचली.
रेल्वेचा प्रवास सोडला तर बाकी प्रवास आनंदाचा झाला.

 

राठोड मोतीराम रुपसिंग
नांदेड .६
९९२२६५२४०७.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *