त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त घेण्यात येणा-या गोदावरी गंगापूजनाचे हे बाविसावे वर्ष असून सोमवार दि.२७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ठिक ५ वाजता नगीनाघाट नांदेड येथे वेळेवर येणाऱ्या पहिल्या एक हजार महिलांना आकर्षक बक्षिसे आणि उर्वरित पाच हजार महिलांना मोफत द्रोण,दिवे व फुले देण्यात येणार असल्याची माहिती संयोजक भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी दिली आहे.
याप्रसंगी नांदेडच्या गंगापूजनाची महती देश पातळीवर पोहोचवणाऱ्या माध्यम प्रतिनिधींचा सत्कार करण्यात येणार आहे.
खा.प्रतापराव पाटील चिखलीकर,महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते,भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ.संतुकराव हंबर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा महानगर नांदेड, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल, अमरनाथ यात्री संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी हा उपक्रम घेण्यात येतो. गोदावरी गंगापूजनामध्ये शेकडो महिला एकाच वेळी गोदावरीची आरती करतात. त्यानंतर आपल्या परिवारातील सदस्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी हजारो दिवे नदीपात्रात सोडतात. हे नयनमनोहर दृश्य पाहण्यासाठी नगीनाघाटावर प्रचंड गर्दी असते. त्यामुळे हरिद्वार व वाराणसी नंतर भव्यतेमध्ये जगातील तिसऱ्या क्रमांकाची नांदेडची गंगा आरती ओळखली जाते.
दरवर्षी प्रतिष्ठित व्यापारी योगेश जयस्वाल यांच्यातर्फे मोफत द्रोण, दिवे व फुले देण्यात येतात. आकर्षक पूजेची थाळी सजविणाऱ्या एकवीस महिलांना पारितोषिके देण्यात येणार आहेत. संस्कार भारती तर्फे भव्यदिव्य रांगोळी काढण्यात येणार आहे. तसेच कोस्टल कर्नाटक, गंगासागर यात्रा, नेपाळ यात्रा व केरळ यात्रा करण्यासाठी नाव नोंदणी केलेल्या भाविकांचा सन्मान करण्यात येणार आहे. भाऊचा माणुसकीचा फ्रिज व लायन्सचा डबा च्या अन्नदात्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
संतोषगुरु परळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रोक्त पद्धतीने गोदावरी पूजन करण्यात येणार आहे. सालासार भजन मंडळातर्फे सवाद्य पाच आरत्या म्हणण्यात येणार आहे. कार्यक्रम संपल्यानंतर गुरुद्वारा लंगरसाहब तर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या सोहळ्याला नांदेडकरांनी हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन ॲड.दिलीप ठाकूर यांनी केले आहे.