तुला गिफ्ट काय हवं ??

 

हा त्याने तिला प्रश्न विचारला आणि तिने उत्तर दिलं प्रेम हवय..
तिचं उत्तर ऐकुन तो बुचकळ्यात पडला .. त्याने तिला जवळ घेतलं आणि मनातच म्हणाला , मग इतके दिवस मी काय करतोय ??..
याला प्रेम म्हणत नाही का ??
मग नक्की प्रेम कसं असतं ??कुठे शोधु ??.. कोणाला विचारु ??.. दोघेही प्रचंड रसिक .. दोघांना माहीत आहे आपण करतोय ते प्रेम आहे पण तो अजुन जास्त तिला पॅंपर करु शकतो हे तिला जास्त माहीत होतं.. त्याने एक सुंदर रोमॅन्टिक गाणं तिच्यासाठी रेकॉर्ड केलं दोन खुर्च्या टेबल अशी बाल्कनीत अरेंजमेंट केली.. किचनमधे गेला आणि एका कपात कॉफी घेउन आला… सुगंधी मेणबत्ती लावली.. गुलाबाचं फुल आणलं होतं .. त्या कॅंडलच्या प्रकाशात तिच्या खट्याळ बटा तिच्या गालावर ओघळताना स्पष्ट दिसत होत्या..
बाल्कनीतुन येणारा खोडकर वारा त्या बटाना फुंकर घालत होता.. त्याच्या फुंकर घालण्याने मेणबत्ती अजूनच पेटुन उठली होती कारण तिचं सौंदर्य त्याला पहाता यावं म्हणुन तिचा आटापिटा चालला होता..
मेणबत्तीने मनातच वायुदेवाला प्रार्थना केली , वायुदेवा थांबनारे ,त्याला प्रेम उमगत नाही आणि तिने गिफ्ट म्हणुन त्याच्याकडे प्रेम मागितलय.. त्याला ते शोधण्यात मी थोडी मदत करतेय.. वायुदेव हलकेच मेणबत्ती च्या कानात कुजबुजला , अगं राणी हे सौंदर्य मलाही न्याहाळायच .. मलाही त्या बटेसोबत खेळायचय .. मेणबत्ती आणि वायुदेव यांच्यात चांगलीच जुंपली..
आणि ते दोघे ??.. ते केव्हाच कॉफीच्या घोटात अखंड बुडाले होते.. अग्नीदेवता म्हणाली , माझ्यामुळे गरम कॉफी त्या दोघांना मिळाली त्यामुळे आता मला त्यांचा रोमान्स पहायचा आहे.. तिनेही तिकडुन जोर लावला.. ही त्याच्या समोर काळ्या गाउन मधे बसली होती.. मधेच डोळ्यात शब्द फिरत होते जे फक्त त्यालाच वाचता येत होते.. त्या शब्दानाही तिच्या डोळ्यात राहायला आवडतं कारण त्यांनाही तो सुखद नजारा अनुभबायचा असतो.. थोड्या वेळात त्याने टेबलावरचा गुलाब उचलला आणि काट्याने हलका त्याच्या बोटाला चावा घेतला..थेंबभर रक्त ते पण त्यासाठी तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्या पाण्यासोबत शब्द वाहु लागले आणि लेखणीतुन तुमच्या पर्यंत रोजच पोचु लागले..
तिच्या अश्रूंतुन वहाणाऱ्या शब्दांची त्याला पुजा बांधायची होती आणि तिला प्रेम दाखवुन द्यायचे होते..
पण मी काय म्हणते , तुला गिफ्ट काय हवय असा प्रश्न त्याने का विचारावा ??
मला लिहायला किती त्रास होतो हे त्याला माहीत नसावं बहुधा..
आणि हिने तरी एखादी साडी किवा ड्रेस मागावा ना..
काय तर प्रेम हवय म्हणे..
विचार करुन माझ्या डोक्याचा भुगा झाला..
वायुदेव , अग्नीदेव , गुलाबाचा काटा , कॉफी किती ती नाटकं ना.. हे ऐकल्यावर वृषभ राशीचा माझा दगड मित्र म्हणाला , त्यापेक्षा मी दगड आहे तोच बरा.. या बायकांचे नखरेच फार..
अहो तुम्ही पण काय वाचत बसलाय , कॉफी पिउन ते दोघे झोपले.. नवरा बायकोत कुठलं काय आलय.. मी कायम स्वप्न रंगवते ..
धनु रास आहे ना.. ठासुन रसिकता भरलेय.. काहीही असलं तरीही रोमॅन्टिक लिखाण हा माझा फोर्टे आहे .. त्यात मी रमते आणि वाचकांना रमायला भाग पाडते.. कशी वाटली प्रेममय डेट ??.. काही क्षणासाठी का होइना तुम्ही त्यात रमला ना ??
Always be Romantic like me..

सोनल गोडबोले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *