रानटी कि आनंददायी.

भटकण्याचा प्रचंड नाद.. अनेक फ्रेंड्सच्या कृपेने मला कायम वेगवेगळ्या स्पॉटवर जायला मिळतं.. निसर्गात जाताना अनेक गोष्टी माझ्या डोक्यात असतात.. निसर्गाला देत काहीच नाही फक्त घ्यायलाच जाते हे तंतोतंत खरं आहे… मोकळी हवा.. भरपूर ऑक्सिजन .. पाण्याचा खळखळाट पक्ष्यांचे गुंजन.. अथांग आकाश आणि त्याच्या विवीधांगी छटा अनेक फुले पाने आहेतच..
कालही आम्ही एका नवीन स्पॉटवर गेलो होतो.. वाई पासुन जवळ असलेल्या बलकवडी धरणाच्या बॅक वॉटर ला..

गाडीतुन उतरलो आणि पहातो तर काय सगळच सुंदर आणि साईजने लार्जर.. पण त्या सगळ्यात उंचीने लहान आणि रानटी ज्याचा तसा काहीही उपयोग नाही असं रोपटं आणि त्याला सुंदर पांढरे तुरे… त्या भव्यदिव्य सौंदर्यात ते रोपटं एकटच मस्त वाऱ्यावर डुलत होतं.. इतर कोणाचं लक्ष गेलं की नाही माहीत नाही पण मला त्या रोपट्याने हळुच खुणावलं.. ते अशा ठिकाणी उगवलं होतं ना की त्या जागेला स्वर्गीय रुप आलं होतं… दोन्हीकडे पाणी आणि मधे तो पाथ आणि त्याच्या मध्यभागी उभं राहुन त्याने मला जवळ बोलवुन घेतलं..

इतक्या मोठ्या पसाऱ्यामध्ये त्याने त्याचं अस्तित्व निर्माण केलं होतं.. कितीही कोणीही बलवान असो किवा मोठं असुदेत आपली बलस्थानं आपल्याला माहीत असली की आपण कायमच युनीक रहातो.. त्या रोपट्यामधे प्रचंड सकारात्मकता होती.. खुप सौंदर्य होतं.. खुप प्रेम देण्याची ताकद होती.. रील्स , फोटो यातुन सोनलच्या रसिकतेला दाद देण्याचं काम त्या पिटुकल्या रोपट्यानं केलं.. मला त्याचा हेवा वाटला आणि भगवंताची सुद्धा कृतज्ञता व्यक्त करावी वाटली.. त्याने प्रत्येकाला युनीक बनवलय.. प्रत्येकाला वेगळं काहीतरी दिलय.. आपल्याकडे आकर्षित करुन घेण्याची ताकद आपल्याला प्रत्येकाला दिली आहे.. फक्त आपण त्याचा उपयोग गॉसीपींग किवा इतर वाईट वागण्यासाठी करतो आणि तिथेच आपली प्रगती थांबते..
आम्ही मालदिवला गेलो तेव्हाही तिथे अथांग समुद्र होता.. निळं हिरवं पाणी होतं.. मधेच खोल समुद्र त्याचं डार्क काळं पाणी.. पाहुन भिती वाटावी असं .. आणि त्याच ठिकाणी म्हणजेच समुद्राच्या मध्यभागी साधारणपणे ३०० sq . इतकीच जागा ज्यावर पांढरी वाळु होती आणि चहूबाजूंनी पाणी .. त्या अथांग समुद्रात सुध्दा त्या जागेने आम्हाला वेड लावले… किती फोटो काढु किती व्हीडीओ करु असं झालं होतं..

कालचं रोपटंही माझ्यासाठी स्पेशल होतं… निरागस. इतर कुठलाही रंग नाही तरीही रंगीबेरंगी होतं.. छोटे असल्याचं दुख नाही.. आपल्याला कोणी निरुपयोगी म्हणेल याबद्दल कटुता नाही.. पाण्यात खेळणारी मंडळी आपल्याजवळ येतील की नाही माहीत नाही तरीही ते दुरुन हसत होतं.. मस्त वाऱ्यावर डुलत होतं.. आनंद घेत होतं आणि देतही होतं… आपल्यासोबत असलेली किवा आजूबाजूला असलेली कुठलीही व्यक्ती ही निरुपयोगी नाही हेही नकळत त्याने दाखवुन दिले.. पण तरीही वैचारिक लेव्हल उच्च आणि उच्च विचारसरणी असणाऱ्या व्यक्तीमधे मला रमायला आवडतं.. बाकी सगळे आपल्याला लागतातच.. छोट्या गोष्टीत रमताना आपण कायम छोटंच रहातो आणि तीच आपली जीत असते..

त्या रोपट्याला मनापासून धन्यवाद आणि माझे मित्र ज्यानी ही जागा सजेस्ट केली आणि ज्याने तिथे नेउन मला आनंद दिला त्या सगळ्याची कृतज्ञता व्यक्त करते..
हे जीवन सुंदर आहे या गाण्याची प्रकर्षाने आठवण आली..
या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे हेच खरे..

सोनल गोडबोले
.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *