सासू आणि सुन

 

सासु ही कधीच सुनेची आई होऊ शकत नाही…
सुन ही कधीच सासूची लेक होऊ शकत नाही…

खुप पुर्वी पासुन सासू म्हणजे सारख्या सूचना, आणि सून म्हणजे सूचना नको… अशी व्याख्या केली आहे. मग ही अशी परिस्थिती असताना “सासु ही कधीच सुनेची आई होऊ शकत नाही” तसेच “सुन ही कधीच सासूची लेक होऊ शकत नाही”हे सूद्धा तीतकच खरं आहे.आता हा वादाचा मुद्दा इतका मूलभूत असल्यावर कसं पटणार? खरं की नाही?
ही तर वस्तुस्थिती आहे, मुलगी वेगळी आणि सून वेगळी ह्या दोघीही वेगळ्या घरातील आणि वेगळ्या मत – विचाराच्या असतात. म्हणून दोघींचं आपसात पटत असेल असं हे क्वचितच कारण, मुलगी म्हणजे स्वतः जन्म दिलेली आणि सून म्हणजे दुसऱ्याने जन्म दिलेली जिने तुमच्या मुलाबरोबर लग्न केले आहे. या शिवाय मुलाची बायको म्हणून ती तुमची सून, म्हणजे डायरेक्ट नाते नाही, तुमचा त्या नात्यावर काही अधिकार नाही. मुलाने किंवा सुनेने जर सोडचिठ्ठी दिली तर ती तुमची सून आपोआप राहणार नाही, थोडक्यात म्हणजे काय तर त्या नात्यावर सासूच किंवा आईच कंट्रोल देखील राहत नाही.
मुळात नातीच वेगळी आहेत. जे काही आहे ते मानसिक आहे, मनाला बरे वाटावे म्हणून ठीक आहे, पण त्यावर अवलंबून राहता येणार नाही.
प्रत्येक नात वेगळं आणि त्याचा अनुभव वेगळा , आणि त्याचे एक स्वतः चे वेगळेपण असते . सुनेला मुलगी करून तुम्ही पहिले तर तुम्ही सुनेचे नाते घालवून बसता मग ती सून धड नीट मुलगी होत नाही आणि सूनही नाही.
जेंव्हा तुम्ही सुनेची मुलगी करता तेंव्हा कुठेतरी तुम्ही तिच्यावर उपकार केल्याची भावना ठेवता आणि आपण “चांगली ” सासू आहोत असे क्रेडिट घेत असता अगदी तसेच
‘सासू कधीच आपल्या सुनेची आई होऊ शकत नाही’,
आपल्याकडे काही रूढी , काही गैरसमज , पक्के झाले आहेत . म्हणजे अमुक कामे सासूनीं च करायची व तमुक कामे सूनेनींचच करायची. त्यामुळे सासू व सून यांचे कायम वाकडेच राहाणार हाही गैरसमज पक्का आहे . हा गैरसमज आपणच मिटवणे गरजेचे आहे . एकाच घरात दोन माणसाचे पटत नसेल तर वातावरण कसे राहील ? तेव्हा दोन्ही बाजूनी पुरूष मंडळी ने अडजेस्टमेंन्ट केली पाहिजे . काही गोष्टी सासुबाईनी केल्या पाहिजेत काही सुनेने . सासुबाईनी विचार केला पाहिजे एक परक्या घरात वाढलेली मुलगी आपल्या घरात आली आहे . तिथे ती सर्वस्व सोडून आली आहे . स्वताचे , वडिलांचे व आडनाव सुधा तिने सोडले आहे . या नवीन घरात तिला अॅडजेस्ट व्हायला वेळ लागणार . तिला तेवढा वेळ दिला पाहिजे . ती करते ती कामे फक्त तिचेच आहेत असे समजू नये . उलट जमेल तेवढी मदत करावी . काही ठिकाणी सगळे बसून राहातात एकटी घरातली सून काम करत राहाते. हे चुकीचे आहे. तर दुसरीकडे
सासू-सून-नणंद-जावा-भावजयी यांच्यातील भांडणांमूळे भारताचे सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आले आहे.
एक टक्का अपवाद वगळता ९९ टक्के सासू या कधीच सूनेची आई होवू शकत नाही. स्वतःच्या मुलीशी जशी वागते तशी सुनेशी का वागू शकत नाही? जी सासू स्वतःच्या सुनेशी आईसारखी वागत नाही, ती मात्र स्वतःच्या मुलीच्या सासू बाबत तीची सासू आईसारखी असावी अशी अपेक्षा का बाळगते?
हा वैश्विक प्रश्न कसा सुटेल? सुनेत आणि मुलीत नेहेमी भेदभाव का केला जातो? कामाला सून आणि आरामाला मुलगी. स्वतःच्या सुनेकडून कामाची अपेक्षा करणारी सासू स्वतःच्या मुलीच्या सासरी तीला कमीत कमी काम असावे अशी अपेक्षा का ठेवते?
असो. सासूने आई का बरं व्हायला पाहिजे? उद्या म्हणाल आत्याने काका व्हायला पाहिजे.एक जन्मदात्री, पालनकर्ती आई पुरत नाही का? आणि नसेल पुरत तर हा दोष सासूचा का आपला?
कन्या म्हणजे वस्तू आहे का, दान करायला? आणि ती मुलगी म्हणजेही रोबो आहे का, एका क्षणात ‘आई बदलली’ हे मान्य करायला! आणि सासूसुद्धा दुसरा रोबो आहे का, एका क्षणात सूनेला मुलगी मानायला.
सासू आई होत असेल तर आनंद आहे, पण चांगली सासू असेल तरीही त्यात आनंद मानायला काय हरकत आहे?
तरीही तुम्ही-आम्ही ज्या समाजात राहतो, त्या समाजाने मुलीने सासरी जाणे हेच मान्य केले आहे.- मुली सासरी जातात व नाव बदलतात. अपत्यास, कुटूंबास अधिकृतपणा- कायद्याने व सामाजिक रितीने येण्यासाठी हे करावेच लागते. – जो पर्यंत कायदा तसा आहे तो पर्यंततरी. पुढे पुरुषाने लग्न झाल्यावर पत्नीचे आडनाव घेऊन तिचे नाव वडीलांच्या जागेवर घेऊ देण्यास कायदेशीर व सामाजिक मान्यता मिळाली की, ते ही शक्य होईलच; आजतरी ही परिस्थीती नाही.
या नात्यांमध्ये काही बदल घडवून आणायचा असेल तर दोघींनीही सासू आणि सुनेने आपापली मानसिकता बदलणे गरजेचे आहे.
त्यांच्या जागी स्वतः ला गृहित धरून विचार करावा . सून नोकरी करत असेल तर तिला जास्तीत जास्त घरातील काम लागणार नाही याची काळजी सासूने करावी. ती घरात ही आणि बाहेर ही आपल्या मुलाच्या संसारासाठी कष्ट करते हे समजून घ्यावे. सुनेनेही सासू ही घरातील एक आदराचं स्थान समजून आणि त्यांचं वय लक्षात घेऊन योग्य मान दिला पाहिजे. सासुबाईंची काही चूक झाली तर सुनेने त्या वयाने मोठ्या आहेत म्हणून किंवा एखाद्या परिस्थितीची त्यांना योग्य ती समज नाही म्हणून सोडून दिली पाहिजे तसेच सासुबाईनी पण केले पाहिजे. नवर्याने बायकोच्या कामात मदत केली तर सासुबाइना वाटते हा जोरू का गुलाम झाला . तिच्या ताटाखालचे मांजर झाला . हे विचार सोडून दिले पाहिजेत . आजकालच्या मुली पुरुषा एवढे किंवा त्याहून जास्त हि कमावतात . त्यामुळे त्यांनाही बरोबरीची वागणूक दिली पाहिजे .
मुलाच्या आईने किंवा मुलीच्या आईने त्या दोघांच्या संसारात लक्ष घालू नये . सर्वातून निवृत्ती , हि भूमिका ठेवली पाहिजे . आपल्या सर्व काही मिळते आहे ना मग इतर उठाठेवी कशाला करायच्या ? सासूने सूनेला सुन न मानता मुलगी मानावे तसेच सुनेने सासूबाईंना सासू न मानता आई मानावे असं काही नाही. जर दोन्हींही हे नातं कर्तव्य म्हणून पाळली तर ? दोघींनी समजूतदारपणा दाखवला तर ?सासू आपल्या सुनेची आई होऊ शकण्याची शक्यता आहे.
खुपदा कन्यादान ह्या शब्दातून ध्वनित होणाऱ्या अर्थाला विरोध होत आहे. मराठी-हिंदीतील सिरियल मधील स्त्री पात्रांच्या कळत-नकळत घडणाऱ्या घटनांना विवाहसंस्थेच अधिकृत स्थान नाही हे जेव्हा दोघींना कळेल. तेव्हा दोघीं मिळून मिसळून राहतील आणि आनंदाचा संसार करतील. हे सर्व आपल्याच हातात आहे व मुळीच अवघड नाही.

रूचिरा शेषराव बेटकर, नांदेड.
9970774211

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *