या पृथ्वीतलावर मानवाने वर्णव्यवस्था निर्माण केली. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, आणि शूद्र त्यानुसार त्यांची कामे त्यांना लावून दिली. वैदीक संस्कृतीमध्ये अशा पद्धतीने दिनचर्या चालायची; परंतु पुढे पुढे शिक्षणाचा मोठ्या प्रमाणात सर्वत्र विकास झाला.शैक्षणिक विद्यापीठ सुरू झाले, शिक्षणामुळे माणूस सुशिक्षित झाला. कोणीही कोणताही व्यवसाय करू लागले. त्यामुळे ज्या माणसाची बौद्धिक क्षमता मोठी तो मोठा अधिकारी झाला. म्हणून भेदाभेद न होता आपण सगळे प्रभुची लेकरे आहोत असे मातृभक्त साने गुरुजी म्हणतात. आपल्याला मानवा मानवामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद करायचा नाही ,अनेक शास्त्रज्ञ कवी, लेखक या जगात होऊन गेले, कोण कोणत्या पंथाचा आहे? याचा विचार न केलेला बरा, साधू संतांचा धर्म, शिक्षकांचा धर्म येथे जीवन जगणाऱ्या कर्तबगार महापुरुष समाज सुधारकांचा धर्म मोजू नये , संत कबीर म्हणतात,साधू की जात मत पूछो,कारण सर्व माणसं सारखेच आहेत. सर्वांना सारखीच अवयव आहेत; या सृष्टीचा कर्ता निर्माता आहे, वृक्ष सर्वांना सावली देतो ,नदी पाणी देते, झाडे फळे- फुले देतात ,मग हा भेद करायचा का ? स्त्री पुरुष समानता आहे? तसे मानवा मानवामध्ये सुद्धा समानता धरावी, एकमेकाबद्दल लहान मोठेपणा करून दहशत निर्माण करणे, विसंगती निर्माण करणे, एकमेकांची पात्रता मोजणे या गोष्टी अमंगळ आहेत. साधुसंत म्हणतात *विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। भेदाभेद भ्रम अमंगळ।।* तुम्ही भेद करू नका..तुमच्या पात्रतेनुसार तुम्ही जीवन जगा, खूप मोठे अधिकारी व्हा, लोकप्रतिनिधी व्हा,परंतु दुसऱ्याला त्रास देऊन नाही ,तर स्पर्धा जिंका,पण दुसऱ्याला धक्का न लावता ? अनेक जणांना चुकीची माहिती सांगून किंवा फसवणूक ,दगाफटका करून मिळालेली प्रसिद्धी जास्त काळ टिकत नाही, सत्य हे सत्य असते .जसे साखर चोरून जरी नेले तरी ते गोडच लागते, विठू माझा लेकुरवाळा का म्हणतात.कारण विठ्ठलाने सर्वांना एकत्रित केले, आणि संतांची मांदियाळी पंढरपूर येथे भरवली. आज जगामध्ये हजारो प्रकारच्या जाती/ उपजाती आहेत.
जसे वैज्ञानिक जैवविविधता आहे .जो तो आपपल्या प्रकारे जीवन जगतो.तसे ही मानवतावादातून स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही तत्व दिलेली आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बारा बलुतेदार व अठरापगड जातीची माणसे स्वराज्यात होती ते नेहमी बुद्धी चातुर्याला महत्त्व देत होते, हा बहिर्जी नाईक , जिवा महाला, शिवा काशीद , मदारी मेहतर असे भेदाभेद न करता महाराजांनी त्यांच्यामध्ये राष्ट्रप्रेम, देशप्रेम,निष्ठा निर्माण केले, तेव्हा जीवाला जीव देणारे मावळे स्वराज्यात निर्माण झाले ,छत्रपती
शिवाजी महाराजांचे मावळे म्हणजे एक शिव विचार होता या देशासाठी झगडले झुंजले तेच अमर झाले,
म्हणून भेदाभेद कोणी करू नये.
राजर्षी शाहू महाराज कोल्हापूर येथील संस्थानांमध्ये सर्व जाती-धर्माच्या लोकांना समानतेची वागणूक मिळत होती, हा समाज गुण्यागोविंदाने जीवन जगत होता. समाज कधी एकत्र येतो
एखाद्या राजाचे गुण आवडल्या नंतर ,समाज नेतृत्व कधी मान्य करतो. एखाद्या राजाचे वर्तन आपल्याला आपल्या जीवनात चांगले परिवर्तन केल्यानंतर आवडतात, म्हणून जीवन जगताना समतेचे तीर्थकर व्हा, जीवन जगा, भेदाभेद करू नका,भेदाभेद केले तर हा गाव गाडा चांगला चालणार नाही, एखाद्या माणसाला जीवन जगण्यासाठी सर्व जातीच्या माणसाची खरोखरच आवश्यकता लागते,हे काल सत्य होते,आज सत्य आहे,उद्या राहणार आहे, म्हणून त्रिकाल सत्य आहे, जर सर्वांनी एकत्रित आले तरच एखादं संस्थान, संस्था राज्य चालते
,म्हणून प्रांतभेद नको जातीयता नको
, वांशिकता नको, ही जर मानवी मनात बसली, तर ती मनुष्य आतून पोखरून टाकते, सर्वांनी एकत्रित आणण्यासाठी आपले विचार मोठे ठेवा, नीतीने वागा, एकमेकांशी बोलत रहा, येथे जगण्याचा प्रत्येकाला हक्क आहे ,तो *तुम्ही जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या* तथागत गौतम बुद्धांनी शांतीचा संदेश जगाला दिला, सर्वांना एका सूत्रात बांधले, आजपर्यंत कोणत्याही धर्मीयांनी कधीही भेदाभेद पाळला नाही
लिंगायत वीरशिव समाजाने सर्वधर्मसमभावाची शिकवण दिली, असा कोणताही धर्म नाही की तो भेदाभेद शिकवत नाही तर चांगले विचार शिकवतो, म्हणून माणूस कोणत्या जमातीत शूरवीर होऊन गेला हे महत्त्वाचं नसून , शूर व कर्तबगार होते हे महत्त्वाचे आहे, आज जिकडे- तिकडे वेगवेगळ्या प्रकारच्या रंगाचे झेंडे झालेले आहेत, कोण कोणाचा कोणता झेंडा कधी हाती घेईल हे सांगता येत नाही. नेतृत्वहीन झाल्यासारखं आपल्याला वाटत आहे ,बेरोजगारी व दहशतवाद वाढला, झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने अनेक जण बघत आहेत, वाममार्गाने जाऊन प्रसिद्धी मिळत नाही ,मिळाली तरी ती चांगली नाही.त्यासाठी चांगल्या मार्गाने चला, आपल्याकडे देण्यासारखे काही असेल तर इतरांना द्या ही संस्कृती आहे परंतु आपल्याकडे नाही म्हणून दुसऱ्याचे जास्त बघून हिसकावून घेऊ नका ही विकृती आहे. एवढे जरी कळाले तरी या जगात शांतता नांदेल मग खरोखरच हा अभंग आपल्याला कळाला असं म्हणता येईल. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। भेदाभेद भ्रम अमंगळ।।
राम कृष्ण हरी
शब्दांकन
*विठूमाऊली प्रतिष्ठान खैरकावाडी*
अध्यक्ष:प्रा.विठ्ठल गणपत बरसमवाड
ता.मुखेड जि .नांदेड