नवीन येणाऱ्या टेक्नॉलॉजी या निश्चितच वाखाणण्याजोग्या असतात.. त्याचा आपल्याला उपयोगही करता यायला हवा आणि योग्य ठिकाणी वापरताही यायला हवा पण मेकअप आणि मेकअप मागील रीॲलीटी समोरच्याच्या जेव्हा लक्षात येते तेव्हा बऱ्याचदा त्या व्यक्तीचा हिरमोड होतो किवा ती व्यक्ती कायमस्वरूपी आयुष्यातुन बाजूलाही जाऊ शकते त्याचं कारण असतं फोटोवरुन त्याने पाहिलेले तिचं बाह्यांग आणि फिल्ट्रेशन ने केलेली जादु .. जी प्रत्यक्षात वेगळी असते.. मग त्या व्यक्तीचा स्वभाव कितीही चांगला असला तरीही त्याला वेगळं वळण लागतं.. कितीही बाह्य सौंदर्याला किमत द्यायची नाही म्हटलं तरीही सगळ्यात आधी तेच दिसतं आणि मग समोर येतो तो स्वभाव..
बऱ्याचशा स्त्रीया त्यांच्या तरुणपणीचे फोटो सोशल मिडीयावर ठेवतात.. किवा बऱ्याचदा त्या कमरेच्या वर अर्धे फोटो ठेवतात आणि काहीजणी तर फिल्टर लावुन ८० किलोच्या ६० किलो दिसायचा प्रयत्न करतात.. खरं तर त्यांनी व्यायाम डाएट करुन वजन आटोक्यात ठेवलं तर फिल्टर लावायची गरज पडणार नाही आणि दुसरं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आहे तसेच फोटो ठेवावेत म्हणजे नंतर होणाऱ्या परिणामांना सामोरं जायची वेळच येणार नाही..
दोन माझ्या मित्रांच्या बाबतीत घडलेले किस्से सांगते.. एका मैत्रीणीची एका मुलाशी गृपवर ओळख होते.. एकमेकांना फोटोत पाहिलं जातं.. ती माझी मैत्रीण वय ५२ उंची ५ फुट आणि वजन जेमतेम ५० किलो.. स्कर्ट फ्रॉकवर फोटो काढलेल्यावर ती लहान दिसते.. तिचे फोटो पाहुन २४ वर्षांचा मुलगा तिच्या प्रेमात पडला आणि जेव्हा प्रत्यक्ष तो तिला भेटला तेव्हा तो अचंबित झाला आणि म्हणाला ,, तुम्ही खुप मोठ्या आहात.. तो नाराज झाला .. कदाचित त्याचं प्रेमही नाराज झालं असेल..
दुसरा किस्सा नाटकाच्या मित्राच्या बाबतीत घडलेला .. दोन्ही किस्से एकदम खरे आहेत.. त्याच्या एकांकिकेसाठी एक हिरॉइन हवी होती.. तिने फिल्टर केलेले २ फोटो त्याला पाठवले होते .. ते पाहुन तो तिच्या घरी स्क्रीप्ट द्यायला गेला.. जेव्हा तिने दार उघडलं तेव्हा ८० किलोची तिला पाहुन त्याला चक्कर यायचीच बाकी होती.. यात कुठेही तिच्या बॉडी शेमिंगबद्दल बोलायचं नाही आहे तर नसलेल्या गोष्टी दाखवताना त्याचा दुष्परिणाम काय होवु शकतो हे मला सांगायचं आहे… अति मेकअप करुन काढलेले फोटो असतील किवा फिगर मधे बदल करुन काढलेले फोटो आणि प्रत्यक्षातील ती व्यक्ती ..
त्यापेक्षा व्यायाम आणि आहाराने मिळवलेले शरीरासाठी फिल्टरची गरज लागत नाही .. माझ्या बुकक्लब मधे काही वर्षापूर्वी घडलेला एक किस्सा सांगते .. ६० वर्षाच्या स्त्रीने तिचा ४० शीतील डीपी ठेवला होता आणि मग जेव्हा तिला पुरूष मेसेज करायला लागले तेव्हा तिने ॲडमीनकडे तक्रार केली.. आपण चुकीचे वागतो त्यामुळे आपल्याला त्रास होतो..
मग फिल्टर करायचय तर काय करायचं ?? ..फिल्टरचा अर्थ आपल्याला नको असलेल्या गोष्टी काढून टाकणे असा आहे तर मग आपल्यातील व्यायाम न करण्याचा आळस फिल्टर करायला हवा ना…
वाट्टेल ते वाट्टेल त्या वेळी खाणं टाळायचं हे फिल्टर करायला हवं..
गॉसीपींग आणि सोशल मिडीयावर नको ते व्यक्त होणं हे फिल्टर करायला हवं..
दुसऱ्यातील वाईट न पहाता चांगलं पहाता यायला हवं..
जसे चेहऱ्यावरील डाग फिल्टर करतो तसेच मनावरील डाग फिल्टर व्हायला हवेत..
आयुष्यातुन अनेक वाईट गोष्टी फिल्टर केल्या तर चेहरा आपोआप चमकेल त्यासाठी फिल्टर लावायची गरज पडणार नाही.. सुंदर दिसण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे पण ते खरं सौंदर्य हवं म्हणजे ते चिरकाल टिकतं त्यासाठी घ्यायला हवी प्रचंड मेहनत .. रोज व्यायाम करा आणि फिल्टर ला आयुष्यातुन बाजूला सारा..
सोनल गोडबोले