जगणं यालाच म्हणतात

आपल्या जवळच्या व्यक्तीचा आपत्कालीन किंवा आपघाती मृत्यू झाला तर त्या शोकातून जाणे मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या कठीण आहे, पण त्यातून सावरणेही शक्य आहे आणि गरजेचे ही आहे. यात आपल्याला धैर्य देणार्‍या गोष्टी व्यक्तीने स्वत: शोधल्या तर अधिक चांगले. गेलेल्या व्यक्तीमुळे आपल्या आयुष्यात पोकळी निर्माण होते, पण त्या पोकळीत आपण हरवायचे की नाही, हे ज्याने त्याने ठरवायचे.
आपल्या जवळच्या कुटुंबातील किंवा प्रियजनांचा आपघाती दुर्दैवी मृत्यू झाला तर तो काळ तिव्र असाह्य वेदनांचा असतो. त्यामुळे त्या कुटुंबाला आणि निकटवर्तीय लोकांना खूप भावनिक आघातातून जावे लागले. त्यातच त्याच तो एकुलता एक मुलगा, मुलगी किंवा घरातील कर्ता धरता असो वा, त्या गृहस्थाची नव्वदीच्या घरात पोहोचलेली वृद्ध माता- पिता असो. या काळात अनेक नातेवाईक,मित्र मदतीला येतात. आपलं दुःख कमी करण्याचा प्रयत्न करतात. पण त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर ची पोकळी ही अगम्य आणि गूढ भीतीचे पूर्ण वलय आपल्या आसपास निर्माण करते. हळूहळू हळूहळू त्या कुटुंबियाच्या गाठीभेटी घेणं कमी होऊन तो विषय त्यांच्या मोबाईलवरील चौकशीवर संपतो. खुप काळापर्यंत अजून ही लोक त्या व्यक्तीच्या जाण्याने भडभडून रडताना दिसतात.
दुःखाचा शोक वेळेनुसार कमी होतो, अशी अपेक्षा जरी असली, तरी परिस्थिती मात्र सर्वसाधारण नसते. कारण, अशा काळात कुठे कुठे नातेवाईक, शेजारी साथ द्यायला तयारच नसतात. बर्‍याच लोकांच्या बाबतीत ही दुर्दैवी घटना घडली असेल. आपल्या जवळची व्यक्ती अपघातात गमावल्यामुळे कोणाला कुणाचा आधारही मिळू शकला नाही. अशावेळी तर शोककळा अधिक तीव्र झालेली असते. भावनांचा कोलाहल माजलेल्या असतो. हा दु:खाचा काळ, दुखवटा किंवा शोक काळ किती दिवस, किती महिने, किती वर्ष…चालेल याचे मोजमाप नसतेच,
शोक ही पूर्णत: सामान्य प्रक्रिया आहे. काही गोष्टी जसं आठवणीने गदगदायला होणं, ऊर्जा संपल्यासारखं वाटणं, दैनंदिन जगण्यात रस न वाटणं किंवा त्यात मन न रमणं, नियमित कामात लक्ष न लागणं या सर्वसामान्य अनुभवातून शोकाकुल व्यक्तीला जावे लागते. हळूहळू शोकाकुल व्यक्ती आपल्या नवीन दैनंदिन जीवनाला सुरुवात करते. तथापि काही व्यक्ती मात्र, अधिक गुंतागुंतीच्या दुखवट्यातून जातात. त्यांना त्या दुखवट्यातून बाहेरीही येता येत नाही आणि सर्वसामान्य आयुष्यही जगता येत नाही. त्यांच लक्ष प्रिय व्यक्तीच्या मृत्यूतून बाहेर पडतच नाही. आपल्या प्रियजनांचा मृत्यू स्वीकारणं त्यांना कठीण होतंच, पण आपण का जगतो आहोत, ही अपराधीपणाची भावना त्यांच्या मनातून जात नाही. त्यांना ती मृत व्यक्ती सतत भासत राहते. मनात मृत्यूचे विचार येतात. विशेषत:
दीर्घकालीन आजारात व्यथित होऊन झालेला मृत्यू पेक्षा अचानक अनपेक्षित झालेला अपघाती मृत्यू किंवा कोवळ्या वयात झालेला मृत्यू प्रियजनांच्या हृदयात खोलवर जखम देतात.
कुठल्या नात्यात शोक तीव्रतेने जाणवतो हे सांगणे कठीण आहे. पण, पुत्रशोक हा मात्यापित्यांना विकल करतो.
कुठल्याही परिस्थितीत शोक अनुभवणे न टाळता त्याला वाट करुन दिली पाहिजे. कधी कधी दुसर्‍यांना अस्वस्थ वाटेल म्हणून काही लोक आपलं दु:ख मनातच ठेवतात. तसं न करता शोक व्यक्त केला पाहिजे. दु:ख भरतानाच्या प्रक्रियेत कळत नकळत हिंमत लागते. अवसान लागते. डोळे भरुन येतात.
अशा प्रकारचं व्यक्त होणं माणसाला त्या अनमोल दु:खाला स्वीकारण्याची ताकद देतं. आपल्याला जे दु:ख कल्पनेतसुद्धा सहन करायला कठीण वाटतं, ते वास्तविकतेत स्वीकारण्याचे म्हणजे साहस लागतं. बर्‍याच जणांना दु:खाने दडपल्या गेलेल्या शोकाकुल मनाला दु:ख पटकन विसरुन गेले, तर किती बरे होईल असे वाटते. ‘मी का विसरु शकत नाही’ हा प्रश्न थोडा किचकट आणि अनुत्तरितच राहतो. आपल्या प्रिय व्यक्तीच्या आठवणी अशा सहज मनपटलावरुन पुसल्या जात नाहीत.
आनंदाच्या प्रत्येक क्षणात त्या व्यक्तीची आठवण येणं साहाजिकच असते. यातुन आपल्याला बाहेर येण्यासाठी एक करता येईल की, आठवणीचा ज्या वेळी विरह वाटायला लागतो. त्या वेळी आपण आपल्या आठवणी इतरांजवळ व्यक्त केल्या पाहिजे.ते आयुष्य प्रिय व्यक्तीबरोबर जगल्या त्याबद्दल बोललं पाहिजे. त्या आठवणींना जाग केलं पाहिजे. असे केल्याने त्या आठवणींनी मनाला उभारी येते. किंबहुना, काहीही विसरुन जायची गरज भासत नाही. जे लोक सुखी आणि आनंदी असतात, त्यांच्या घरी कधी मृत्यू झालेले नसतात का? कोणाच्या घरात वा आयुष्यात मृत्यूचे दर्शन झाले नाही असे होत नाही, पण ज्यांनी ज्यांनी हे सत्य स्वीकारले, त्यांचा जगण्याचा मार्ग हा सुखकर झाला आहे.
आपल्या आयुष्यातील प्रिय व्यक्तीच असं सहज, अचानक जाऊ देणे कुणाला शक्य नाही. त्यात ही खूप मोठे आणि खरे आव्हान पेलावे लागते. पण अशी वेळ नक्की येते की, आपण स्वत:चे वेगळे आयुष्य बांधायला सुरुवात करतो. एका दिवसात नाही, पण हळूहळू आपण आयुष्याला नवा अर्थ द्यायला लागतो. आपण आपल्या दु:खी जगण्याला नवीन वळण देतो, तेव्हाच कुठे जगायला शिकतो.
आयुष्यात जगत पुढे जाणेसुद्धा जमवून यायला पाहिजे. आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकाने आयुष्यात कधी उत्तम संधी गमावली, कधी कौशल्य गमावले, कधी भावना गमावल्या, तर कधी तत्त्वं गमावली. या सगळ्या गोष्टी परत त्याच अस्तित्वात मिळतील, असे नाही, पण हा सगळा अनुभव म्हणजेच जगणे आहे.
जीना इसी का नाम है….

रूचिरा बेटकर, नांदेड.
9970774211

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *