नांदेड : प्रतिनिधी
वॉटर ग्रीडला विरोधाचे कारण नाही. मात्र अगोदर कोकणातून अरबी समुद्रात वाहून जाणारे पाणी आणि त्यातून मराठवाड्यातील तुटीचे प्रकल्प भरा, असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
शेतीसंदर्भात नियम १०१ अन्वये विधानसभेत झालेल्या चर्चेत सहभागी होताना ते बोलत होते. या चर्चेत अगोदरच्या सदस्यांनी वॉटर ग्रीडचा उल्लेख केल्याचा धागा धरून अशोक चव्हाण म्हणाले की, पिण्यासाठी आणि शेतीसाठी जायकवाडीला पाणी मिळावे, ही खालच्या भागातील नागरिकांची मागणी आहे. यासाठी छत्रपती संभाजीनगरला अनेक सर्वपक्षीय आंदोलने झाली. मात्र, वरच्या भागातील लोकांचा पाणी सोडायला विरोध आहे. तुटीचे प्रकल्प भरल्याशिवाय वॉटर ग्रीड सुरु झाले तर याच पद्धतीने मराठवाड्याच्या जिल्ह्याजिल्ह्यात भांडणे सुरू होतील.
याप्रसंगी त्यांनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकी वेळेवर होत नसल्याचाही मुद्दा राज्य सरकारच्या निदर्शनास आणून दिला. ज्या धरणांमध्ये पाणी उपलब्ध आहे, तिथे पाणी सोडण्याबाबत निर्णय घ्यायला मंत्र्यांना, पालकमंत्र्यांना वेळ मिळत नाही. पाणी असतानाही केवळ बैठकीची औपचारिकता पूर्ण होत नसल्याने शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. आवश्यकतेनुसार कालवा सल्लागार समितीच्या बैठकी झाल्याच पाहिजेत, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी या चर्चेदरम्यान केली.