पुण्याच्या भेटीत मित्र परेश जयश्री मनोहर या दोस्तानं पोपट श्रीराम काळे या प्रकाश पेरणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्याच्या ‘काजवा’ या आत्मकथनाची वाचनशिफारस केली होती. तेव्हापासून ओढ लागली होती वाचायची. काजवा मिळवलं. वाचायला आरंभ केला. मध्येच एका मित्राला ते वाचायची लहर आली. झालं माझ्या वचनावर गंडांतर आलं.
बराच काळ लोटल्यावर परवा काजवा हातात पडला.तसं माझं वाचन मंद आहे. पण सन्माननीय पोपट श्रीराम काळे सरांनी माझ्यासारख्या मंद वाचकाला दामटीत नेलं. आत्ता वाचून हातावेगळं केलं.
एका ऊसतोड कामगाराचा मुलगा ते आदर्श शिक्षणाधिकारी असा नितळ पण संघर्षमय प्रवास म्हणजे ‘काजवा’. एक ऊसतोड कामगार आपल्या पोटी पुन्हा कोयताधर जन्माला येऊ नये म्हणून लहान्या पोपटला शाळेची वाट दाखवतो. कसलीच अनुकूल परिस्थिती नसताना लेखक आपली पायवाट अधिक रुंद करतो.साखरेच्या गोड राजकारणाच्या चरकात शेतकरी आणि ऊसतोड कामगारांच्या जिनगानीचा चोथा होण्यापासून वाचवतो.हा या आत्मकथनाचा सार.
पोपट श्रीराम काळे हे मुळात लेखक नाहीत. लेखकसाहेबांच्या ठायी असणारी पोज त्यांच्याकडं नाही. आणि म्हणूनच आडरानातून खळखळ वाहणाऱ्या झऱ्यासारखा नितळ, निर्मळपणा त्यांच्या आत्मकथनाला लाभला आहे. एकूण शिक्षणाचा केंद्रबिंदू मूल आहे. दुर्दैवानं हे मूल स्वातंत्र्याच्या अमृतमोत्सवानंतरही उपेक्षित आहे. पोपट श्रीराम काळे यांच्यासारखे बोटांवर मोजता येतील असे काही शिक्षणाधिकारी आहेत. अशा कळवळ्याच्या जातीतल्या अधिकाऱ्यांचे शाळेतल्या लेकरांना केंद्रस्थानी आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.अशा अधिकाऱ्यांची संख्या वाढत जावी, असं वाचताना वाटत राहतं. चांगली कामं करताना किती जाच होतो ;याचाही प्रत्यय येतो.झालेल्या त्रासाबद्दल तक्रार नाही. आक्रोश नाही. केलेल्या कामाबद्दल श्रेय नाही. मिळालेल्या यशाबद्दल हुरळून जाणं नाही. उलट अडचणी, त्रासाबद्दल वाटणाऱ्या खेदाची उर्जा निर्माण करून नव्या दमानं पुढं जाणं अशा कितीतरी बाबी लेखकाच्या व्यक्तित्वात आहेत. त्या गरजूंना निश्चितच प्रेरणादायी आहेत. शिक्षक, याक्षेत्रातले अधिकारी, जागरुक पालक आणि संस्थाचालकांनी हे आत्मकथन वाचणं गरजेचं आहे. यामुळं काजव्याएवढा उजेड पडेल. त्यात बरंचसं उजळून निघेल.लेखक, त्यांच्या सुविद्य पत्नी, आई – वडील, प्रकाशकांना धन्यवाद.
शिवाजीराव आंबुलगेकर यांच्या fb वॉल वरून साभार