मी अनेकदा म्हणते , आपण कोणालाच काहीही देउ शकत नाही आणि त्याचा प्रत्यय अनेकदा येतो तसाच तो पुन्हा कालही आला..
आमची मैत्रीण वंदना तिच्या आईचा ७५ वा वाढदिवस गेल्या आठवड्यात होता पण मला जायला जमलं नाही म्हणुन मी आमच्या गृपवर एक मेसेज केला की आईला सरप्राइज देउ.. सचिनने एगलेस केक घरी करुन दिला आणि आम्ही ८ जण रात्री ८ वाजता त्यांच्या घरी गेलो.. आम्हाला दारात पाहुन आईला इतका आनंद झाला कि त्यासाठी माझी लेखणी खूपच लहान आहे… तिचे बाबाही खुश झाले.. वय वर्षे फक्त ७५ चेहऱ्यावर कमालीचे तेज .. चेहऱ्यावर एकही सुरकुती नाही. गाण्याच्या दोन परिक्षा झालेल्या.. आवाज एवढा सुंदर आणि खडा की चांगल्या गायकाची बोलती बंद होइल.. आणि उत्साह म्हणजे मी किती लहान आहे हे सगळं लिहायला हे आताही लिहीताना जाणवतय.. लगेच आत गेल्या खायला करते म्हणाल्या.. मी नको म्हटलं तर ऐकायला तयार नाहीत..
आतमधे जाऊन लाल रंगाची मस्त साडी नेसुन तयार होवुन आल्या.. २५ वर्षांची मुलगीही करणार नाही इतकं ते सळसळतं तारुण्य आणि उत्साहही..
हॉलमधे आल्या .. मी ओवाळलं आणि त्यांनी केक कापला.. लगेच त्यांनी एक सुंदर गाणं गायलं आणि आम्ही निशब्द झालो.. काय करु आणि काय नको असं त्यांना झालं होतं.. आणि हे सगळं पुण्यात घडलय बरं… इथुन पुढे आम्हा पुणेकराना कोणीही नावे ठेवायची नाहीत बरं का.. ही माउली अर्धा कप कॉफी देउन शांत बसेल की नाही तर लगेच पदर खोचला .. रव्याचा डबा काढला आणि गुळाचा सांजा केला.. फक्त सांजा कसा द्यायचा म्हणुन त्यासोबत मसाले भात केला आणि म्हणाल्या , मी न जेवता कशी सोडेन आहे की नाही गम्मत.. सरप्राइज द्यायला आम्ही गेलो होतो पण सरप्राइज आम्हाला मिळालं.. इतकं करुन ही सुंदरी शांत राहिली का तर अजुन एक स्वतःहुन गाणं गायल्या आणि आम्ही सगळे अचंबित झालो.. रात्रीचे १० वाजले होते .. मी सहा वाजता रोजच्या वेळात एक भाकरी खाऊन गेले होते तरीही तिथे आईच्या हातचं पुन्हा जेवले आणि तेही रात्री १० वाजता. आम्ही त्या घराला आणि माऊलीला काहीही न देता भरभरुन आनंद घेउन निघालो तर या आमच्या मागोमाग जवळपास १०० एक पायऱ्या उतरुन आम्हाला सोडायला खाली आल्या.. लिफ्ट नाही.. तिसऱ्या मजल्यावरुन खाली त्या अनेकदा येतात आणि पुन्हा वर जातात आणि बाबा वयवर्षे फक्त ८४ तेही तसेच.. हे सगळं कशामुळे असेल बरं ??.. विचार करा आणि अमलात आणा कारण आपण प्रत्येकाकडून काहीही ना काही घेत असतो.. इथे काय घ्यायचय तर अनेक गोष्टी ज्या बऱ्याचशा आधीच माझ्याकडे आहेत.. ज्यांच्याकडे नाहीत त्यांनी त्या जरुर अंगिकारा कारण असं घर असायला खुप नशीब लागतं आणि आपलं नशीब आपणच घडवु शकतो.. फक्त आणि फक्त आपल्या चांगल्या वागण्याने..
मी माझ्या आयुष्यात घडलेल्या घटना रोज शेअर करते कारण यातुन प्रत्येकाने काहीना काही शिकावे आणि कोणाकडेही जाताना रिकाम्या हाती कधीही जाऊ नये.. आपल्याकडे द्यायला खुप गोष्टी असतात फक्त देण्याची वृत्ती हवी.. मग तो आनंद असेल , एखादी वस्तु असेल.. घरातल्या झाडाचं एखादं फळ असेल .. अगदी दारातला कडीपत्ता असेल.. ज्याच्याकडे जे आहे ते ते त्याने द्यावे आणि त्याबदल्यात आनंद द्यायला भगवंत आहेच.. मी मागे एक लेख लिहीला होता की डावं उजवं खा आणि निरोगी रहा .. हीच ती माणसं ज्यानी डावं उजवं खाल्लय कीवा खात आहेत म्हणुन हा उत्साह आहे आणि दुसरं खुप महत्वाचे म्हणजे दुसऱ्याला खाऊ घालायची आवड.. किती सुंदर आहे ना हे सगळं..
फक्त आनंदाची पेरणी करा .. हजार पटीने तोच आपल्याकडे येइल..
सगळ्याची मनापासून कृतज्ञता व्यक्त करते..
सोनल गोडबोले