मी नक्की कोण आहे ?? स्त्री की पुरूष ??

जन्माला येताना मुलगा आणि सातआठ वर्षानंतर अचानक शरीरात मुलगी डोकावते आणि मन आणि हृदय याचं द्वद्व सुरु होतं.. मन खरं की शरीर हा प्रश्न दोघे एकमेकांना विचारु लागतात आणि पुढे जाऊन हे सारे प्रश्न नशीबाला , भगवंताला विचारले जातात.. पण त्याचं उत्तर कोणाकडेच नसतंपण तरीही स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करत तृतीयपंथी त्यांचा मार्ग काढत जगत असतात ..बऱ्याचदा त्यांची मानसिकता घरचे स्वीकारत नाहीत आणि मग पुढे जाऊन समाज समजुन घेत नाही त्यामुळे ते त्यांच्या घोळक्यात रहाणं पसंत करतात..
भरकटलेल्या अवस्थेत कधी मदिरेचा सहारा तर कधी ड्रग्ज कधी चोरी कधी मारामारी , गुंडगिरी , सिगरेट अशा अनेक नको असलेल्या गोष्टी जवळ येतात .. पैशासाठी भीक मागणं असेल , कधी सेक्सवर्क असेल याही गोष्टी नकळत जवळ येतात आणि आयुष्य वेगळ्या वळणावर घिरट्या घालतं.. कधी पांढरपेशा समाज त्यांचा गैरफायदा घेतो तर कधी ते त्यांच्या नसलेल्या कमजोरीचा फायदा घेतात.. दोन्ही समाज एकमेकांना वाळीत टाकतात मग चुक कोणाची असते ??
दोष कोणाचा ??.. नशीबाचा ??.. कर्माचा ??.. की अजुन काही…….. अनेक निरुत्तरीत प्रश्न …

तीही माणसच आहेत.. त्यांच्यातही भगवंताचा अंश आहे पण तरीही ते कसे वागतील हे आपण ठरवणार नसुन आपण किवा मी कसा वागतो इतकच माझ्या हातात आहे आणि आपण तेच करायचय.. त्यांना माणूस म्हणुन स्विकारायचय.. त्यांच्याशी मैत्री करायची आहे.. काही देता आलं नाही तरी त्यांना आपण हिणवणार नाही ही कबुली स्वतः स्वतःला द्यायची आहे कारण आपण किवा मी चांगला आहे.. कुठल्याही व्यक्ती चा अपमान हा भगवंताचा अपमान आहे..
एखाद्या घरात अपंग , अंध मुल जन्माला आलं तर त्याला आपण स्विकारतो मग तृतीयपंथी मुलाला का स्विकारु शकत नाही ??.. हा प्रश्न आपण आपल्याला विचारायचा आहे आणि तसच कर्म करायचं आहे.. जो तो आपल्या कर्माने आपलं आयुष्य घडवतो त्यामुळे आपणही उत्तम कर्म करत उत्तम आयुष्य घडवायचं आहे..
अस्तित्व , वास्तविकता आणि मानसिकता या स्तरावर ही मंडळी लढत असतात आणि त्याचवेळी भगवंत सोनलच्या कानात येउन म्हणतो , तु यांच्यासाठी काहीतरी कर.. माझ्या लेखणीतुन तो एका तृतीयपंथी महिलेचा जीवन प्रवास माझ्याकडून रेखाटुन घेतो..हे माझं सौभाग्य आहे कारण सेवा करायची संधी मला त्याने दिलेय.. ग्रॅज्युएशननंतर ब्लाइंडटिचर डिप्लोमा करायला लावुन त्याने अनेक वर्षे माझ्याकडून अशीच अंधांची सेवा करुन घेतली होती..

ती मंडळी ॲबनॉर्मल नाहीत तर आपले विचार ॲबनॉर्मल आहेत.. त्यांना आपल्यासारखेच सगळे अवयव , मन , भावना आहेत.. त्यांचा आदर करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि आपण फक्त तेच करणार आहोत.. रस्त्यावर तृतीयपंथी दिसले तर त्यांच्यातील सौंदर्य पहा.. त्यांच्यातील कलागुण पाहिले तर तुम्ही थक्क व्हाल.. काल त्यांच्या मेळाव्याला मी गेले होते.. त्यांची नृत्यकला पाहुन मी हरखुन गेले.. त्यांच्याकडे असलेली मेकअप कला असेल .. अभिनय असेल.. कादंबरी सुध्दा एम कॉम आहे.. दिसायला सुंदर .. मितभाषी आहे..काल त्यांचा अभिनय पाहुन मी थक्क झाले . त्या उत्तम डांसर आहेत .. मेकअप आर्टीस्ट आहेत.. .. हे लिहायला माझी लेखणी आणि नजर दोन्ही खुजे आहेत एक तृतीयपंथी महिला प्रोफेसर आहे.. अनेक आयटी मधे नोकरी करतात.. त्यातील माझे काही फ्रेंड्स आहेत.. उच्चशिक्षीत अनेक मंडळी आहेत..
माझ्या नात्यातही एक व्यक्ती तृतीयपंथी आहे.. त्यामुळे आपण कुठेही त्यांना कमी लेखायची चुक करु नये..
गेली चार वर्षे मी यांच्यासाठी सेवा देतेय त्यामुळे त्यांना जवळुन पहातेय.. पुढच्या महिन्यात कादंबरी ( तृतीयपंथी ) महिलेचा जीवनप्रवास पुस्तकरुपात घेउन येतेय . ते वाचल्यावर जाणवेल की यांचं आयुष्य किती खडतर आहे..
माझ्या इतर पुस्तकांवर आणि रोजच्या लेखणीवर तुम्ही भरभरुन प्रेम केलय असच कादंबरीवर कराल अशी आशा करते..
आदर देउ .. आदर मिळवु.
आनंद देउ.. आनंद घेउ.

 

सोनल गोडबोले..

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *