अनेकांना धनुर्वात हा शब्द माहीत असेल पण धनुर्मास काय आहे तर मकरसंक्रांतीच्या आधी सुर्य धनु राशीत भ्रमण करतो ..किवा त्याला धुंधुरमास असही म्हणतात.. जुने शब्द आणि त्यामागील शास्रीय माहीती बऱ्याच जणाना माहीत नसते..
या दिवसांत अनेक भाज्या मिळतात.. त्या प्रत्येक भाजीचा शरीराला उपयोग आहे.. संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजे भोगीला मिक्स भाजी खाल्ली जाते किवा पोपटीही याच दिवसांत करतात कारण त्या शेंगा याच दिवसांत मिळतात.. बाहेर थंडी असते आणि शरीराला उष्मांकाची गरज असते.. माझ्या आईशी बोलत असताना काही गोष्टी काही शब्द पुन्हा माझ्या दृष्टीपटलासमोरुन गेले आणि यावर लिहावं वाटलं..
निसर्गाने इतक्या मुबलक भाज्या , फळं या सीझन ला दिली आहेत म्हणुनच मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी हळदीकुंकु करुन फळं वाटली जातात. संक्रांतीच्या दरम्याने बोरनहाण करुन लहान मुलांना बोरं , आवळे ,चिंचा , उस याची चव दिली जाते..
तीळ लावुन बाजरीची भाकरी असेल किवा तिळगुळ असेल हे सगळं तब्बेतीसाठी चांगलं असतं या दिवसांत व्यायामालाही उत्साही वातावरण असतं त्यामुळे आहार ,व्यायाम याची उत्तम सांगड घालुन तब्बेत चांगली ठेवायला हा कालावधी उत्तम असतो.. धुंधुरमासाच्या या आहारात भरपुर प्रमाणात कॅल्शियम , लोह आहे.. त्यामुळे कॅल्शीअम किवा प्रोटीन्ससाठी कुठल्याही प्राण्याला खायची गरज नाही..
जेव्हा मी इंडीजीनस न्युट्रीशन सर्टीफिकेशन करत होते तेव्हा लक्षात आलं हे सगळं आपल्या स्वयंपाकघरात आहे फक्त कशात काय आहे आणि ते किती आणि कधी खायचं हे शिकायची गरज होती.. आपले पुर्वज आणि निसर्ग किती ग्रेट आहेत हे यावरुन लक्षात येतं.. आपल्या घराला आजी आजोबा , आई बाबा असणं किती गरजेचं आहे हे यावेळी लक्षात येतं त्यांना डाएट हा शब्द माहीत नसेल पण घरी केलेलं आणि शेतात पिकवलेलं सीझन नुसार खायचं हे माहीत होतं..
आजच मित्राच्या मुलाच्या लग्नाला गेले होते .. तिथे त्या ॲंकर ने विचारलं , तुम्ही एकमेकांच्या हातचं काय खाल्लं . एकीकडुन उत्तर आलं पास्ता आणि दुसरीकडुन उत्तर आलं सॅंडवीच.. वरणभात , खिचडी , भाकरी , पोळी हे अन्नपदार्थ अपेक्षित होते कारण त्यातच खरे न्युट्रीशन आहेत.. त्यांनी काल संगीत कार्यक्रमात उखाणे घ्यायला सांगितले होते .. खरं तर त्याचही महत्व आहे. नवरानवरीच्या डोक्यावर तांदूळाच्या अक्षता का इतर धान्य का नाही यालाही शास्त्रीय कारण आहे..
त्यामुळे आता या सीझनला मिळणाऱ्या भाज्यांचा मनसोक्त आस्वाद घ्या आणि निरोगी रहा..
सोनल गोडबोले