सुदृढ भारतासाठी तरुण आयुर्वेदाकडे वळणे आवश्यक : श्री विश्वेश्वर आयुर्वेद व गोवर्धन गोसेवा प्रकल्पाच्या गुरुकुलात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे प्रतिपादन

नांदेड : धावपळीच्या आणि ताणतणावाच्या जीवन पद्धतीने मानवी आरोग्य धोक्यात आले असून मानवी आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी आयुर्वेदाची नितांत गरज आहे.तरुण पिढीलाही अनेक व्याधीने वेढले अअसल्याने तरुण पिढी सुदृढ राहिल्यास भारत समृद्ध होईल त्यामुळे समृद्ध भारत हवा असेल तर तरुणांना आयुर्वेदाकडे वळवावे लागेल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज केले . श्री विश्वेश्वर आयुर्वेद व गोवर्धन गोसेवा प्रकल्प , शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकच्या वतीने मुदखेड तालुक्यातील कोल्हा येथे आयोजित करण्यात आलेल्या गुरुकुलाच्या प्रशिक्षणात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

 

यावेळी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकचे प्रतिनिधी तथा एस एस व्ही पी आयुर्वेदिक महाविद्यालय हट्टाचे प्राचार्य माणिक कुलकर्णी , शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड चे अधिष्ठाता डॉक्टर यशवंत पाटील , गुरूकुलाचे संयोजक डॉक्टर अविनाश अमृतवाड, बालाजी कंठेवाड,उद्योगपती तथा गुरुकुलचे संयोजक मारुती कंठेवार, सौ. सविता कंठेवाड यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
गुरुकुलाच्या तीन दिवसीय प्रशिक्षणातील दुसऱ्या दिवसाचे पुष्पगुण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत उपस्थित झाले होते. दुसऱ्या पुष्पाची प्रास्ताविक डॉक्टर अविनाश अमृतवाड यांनी केले . यावेळी उपस्थितआयुर्वेदाचा अभ्यास करणाऱ्या आणि आयुर्वेदाची चिकित्सा करून रुग्णांवर उपचार करणाऱ्या वैद्यांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत पुढे म्हणाले की, आयुर्वेद हे शाश्वत आहे. जगण्याचं शास्त्र आयुर्वेद शिकवते. त्यामुळे हे शास्त्र समजून घेणे आजच्या काळातील गरज निर्माण झाली आहे. धावपळीच्या जीवनात आयुर्वेद महत्त्वाचा आहे.

 

अनेक आजारांवर कायमस्वरूपी उपाय आणि ताणतणावाचे परिणाम कमी करण्याचे अनुषंगानेही आयुर्वेद महत्त्वपूर्ण ठरतो आहे . अलीकडच्या काळात तरुणांमध्ये हृदयविकार, शुगर ,मेंदू विकार अशी विविध गंभीर व्याधी जडत आहेत. त्यामुळे तरुणांनाही आयुर्वेदाचे महत्त्व आणि आयुर्वेद पद्धतीची आवश्यकता निर्माण झाली आहे . जगाला भारताने आयुर्वेद शास्त्र शिकवले आहे . त्यामुळे भारत हा आयुर्वेद शास्त्राची जननी ठरतो. अशा परिस्थितीत शरीरातल्या आतून उपचाराचा शास्त्र म्हणूनही आयुर्वेद महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे आयुर्वेदाची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे काळाची गरज झाली आहे. मानसिक थकवा असो अथवा शारीरिक व्याधी असो त्यात खात्रीशीर उपचार म्हणून आयुर्वेदाकडे पाहिले जाते .

 

त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही. तरुणांना आयुर्वेदाकडे वळवण्यासाठी आणि देशाच्या विकासात महत्त्वाचे योगदान देण्यासाठी सर्वच आयुर्वेदाचार्यांनी , आयुर्वेदाचा अभ्यास करणाऱ्यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले . सूत्रसंचालन डॉक्टर नूतन गावडे यांनी केले तर आभार डॉक्टर भाग्यश्री नरवाडे यांनी मांडले.
दरम्यान जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी येथील गो शाळेला भेट दिली. गोमातांना चारा दिला.

 

त्यानंतर परिसराची पाहणी करून श्री विश्वेश्वर आयुर्वेद व गोवर्धन गोसवक प्रकल्पाचे कौतुक केले. भविष्यासाठी ही गोशाला आणि श्री विश्वेश्वर आयुर्वेद नांदेड जिल्ह्याच्या विकासात आणि आयुर्वेदाच्याही विकासात महत्त्वपूर्ण भूमिका पार पडेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *