माझे कुटुंब माझी जबाबदारी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी या नव्या मोहिमेची घोषणा पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी केली.  कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या आणि चिघळत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम राबविण्यात येत आहे. १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर एक मोहिम राबविणार आहोत. या काळात महाराष्ट्रातील एकही घर असे राहू द्यायचे नाही‌ की जिथे आरोग्य टीमने प्रत्येक घरात जाऊन चौकशी केली नाही. डॉक्टर सर्वांचीच तपासणी करतील‌ कारण हे पथक घराघरात जाऊन नागरिकांची चौकशी करील. सुरुवातीला झोपडपट्टीमध्ये व्हायरस जाईल असे वाटले होते. पण आता गावागावात मोठमोठ्या सोसायट्यांमध्ये कोरोना रुग्ण सापडू लागले आहेत. गणेशोत्सव काळात घरात जमलेले  ३०-३० सदस्य कोरोनाबाधित झाले आहेत. यामुळे ही जनजागृतीची मोहिम राबवत आहोत. यानंतरचा दुसरा टप्पा १२ ते २४ ऑक्टोबर असा आहे. या काळात ज्येष्ठ नागरिकांचे आजार, त्यांना होणारे त्रास आदींची माहिती घेतली जाणार आहे. गरज पडल्यास तपासणी केली जाईल. गावागावात तीन जणांचे पथक असेल, गावपातळीवर हे काम करायचे आहे. विशेषतः सरपंच, नगरसेवक यांच्यावर ही जबाबदारी आहे. जनजागृतीसाठी हे आवश्यक आहे. तसेच विविध स्पर्धाही आयोजित केल्या जातील निबंध स्पर्धा असतील, त्यांना बक्षिसे दिली जातील, गावांच्या दक्षता समित्यांनी याला मदत केली पाहिजे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजपर्यंत आरोग्य हा विषय मागे पडला होता‌ याबाबत कबुली दिली. कारण आरोग्य सेवा सुविधा याकडे आपण गांभीर्याने पाहिलेच नाही.‌ या मोहिमेत तमाम जनतेचे  सहकार्य आवश्यक आहे. जनतेला कोरोनासोबत कसे जगावे हे शिकविण्याची तसेच शिकून घेण्याची गरज आहे. कोरोनाचे संकट हे शेवटचे आहे असे म्हणता येणार नाही. आज नाकातोंडात, डोळ्यात जाणारा विषाणू इतके मृत्यूचे तांडव‌ घालीत आहे तर दुसरा एखादा सरळ डोळ्यात किंवा डोक्यात घुसून माणसांची वाटच लावतो, असा विषाणू भविष्यात जन्माला येऊ शकतो. 

 अवघे मानवी जीवनच धोक्यात आले आहे.  लस कधी येणार हे कुणालाही माहित नाही. अनेक देश‌ केवळ दावाच करीत आहेत. आपला हात हीच आपली लस आहे. यासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिम सुरु करत आहोत. दुबईत कायदे एवढे कडक आहेत की काही हजारांत दंड होतो. आपल्याकडे ते शक्य नाही. यामुळ जनतेला हित समजावले जाणार आहे, असे ठाकरे म्हणाले आहेत. गावागावात कोरोना दक्षता समिती स्थापण्यात येणार आहे. यामध्ये सर्व पक्षांचे कार्यकर्ते, नागरिक आदी आहेत. काही ठिकाणी अंमलबजावणी केली जात आहे. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेमुळे आरोग्य सेवेवरील ताण कमी होईल. यामधील सुचनांनुसार आवश्यक असेल तरच बाहेर पडा अशा काही सूचनांचे पालन करावयाचे आहे. आगामी काळात ट्रॅकिंग आणि ट्रेसिंगची संख्या वाढवून कोरोनावर नियंत्रण मिळवण्याचे आवाहन त्यांनी केले. 
संपूर्ण जगाला इशारा दिला आहे की कोरोनाचे संकट लवकर जाईल असे वाटत नाही, पण इशारा हा आहे की पुढच्या अजून मोठ्या महामारीला अधिक सज्जतेने तयार रहा. याचा अर्थ असा की आपल्याला कुठेही शिथिलता किंबहुना गाफील राहून चालणार नाही, प्रत्येक पाऊल समजूतदारपणे व दक्षतेने टाकावे लागणार आहे. ठाकरे यांनी महाराष्ट्रातील तमाम जनतेला धन्यवाद दिले आहेत, कारण की हे करोनाचे संकट म्हणजे विषाणू बरोबरचे आपले युद्ध आहे. या युद्धामध्ये सर्व धर्मीय, सर्व पक्षीय खांद्याला खांदा लावून एकत्रितपणे मैदानात उतरले. मधल्या काळामध्ये आपण अधिवेशन कधी घ्यावे, या विषयावर चर्चा केली आणि दोन दिवस अधिवेशन घेण्याचे ठरले. दोन्ही दिवस अत्यंत शांतपणे, शिस्तीने, समजूतदारपणे, सामंजस्याने विरोधी पक्षाने आणि सर्व पक्षाच्या सन्माननीय सदस्यांनी शासनाला सहकार्य केले. 

चेस दी व्हायरस या मोहिमेमुळे आपण या साथीला चांगले रोखले. पूर्वी झोपडपट्टी व वसाहतीत वाढलेला प्रादुर्भाव आता उंच इमारती, मोठ्या सोसायट्या आणि उच्चभ्रू वस्तीत मोठ्या प्रमाणावर आढळत आहे. ८० ते ८५ टक्के रुग्ण या भागातून आहेत.  मुंबईत ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष, नगरसेवक, स्वयंसेवी संस्था, गणेश मंडळे यांची मदत घ्यावी लागेल, त्यांना सहभागी करून घ्यावे लागेल. कोरोना रुग्णांची वाढती संख्या वेळेतच नियंत्रित करणे गरजेचे आहे. सर्वांच्या सहभागाशिवाय हे शक्य नाही, आगामी दोन महिने अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे. धारावी, वरळी पॅटर्नचे जागतिक पातळीवर कौतुक झाल्यानंतर आपली जबाबदारी अधिक वाढली आहे. ही वेळ कौतुक ऐकत बसण्याची नाही. गणपती उत्सवानंतर सणांची मालिका सुरु झाली आहे. हा काळ नववर्षापर्यंत आहे हे लक्षात घेवून कोरोना साथ नियंत्रणाचे नियोजन करणे अपेक्षित आहे. नागरिकांनी गणपती, मोहरम अत्यंत संयमाने साजरे केले इथून पुढेही हाच संयम नागरिकांनी बाळगायला हवा. 
माझे कुटूंब, माझी जबाबदारी” या अभियानाद्वारे प्रत्येकाने वैयक्तिक स्वच्छेवर भर देवून वाढती संख्या रोखत कोरोनावर नियंत्रण मिळवायला हवे. मास्क हा या पिढीसाठी आवश्यक बाब बनली आहे. लोकांनी स्वतःहून काळजी घेणे आवश्यक आहे त्यादृष्टीने जागृती करणे आवश्यक आहे. श्रावणात मलेरिया, डेंग्यूची साथ वाढण्याचा धोका लक्षात घेवून पालिका प्रशासनाने तत्पर असावे. या मोहिमेअंतर्गत राज्यातील दोन कोटी पंचवीस लाख कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट शासनाने निश्चित केले आहे. जिल्ह्यातही प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचण्यासाठी आरोग्य, महसूल, स्थानिक स्वराज्य संस्था आदी विविध विभाग, संस्थांनी समन्वय व नियोजन करावे. मोहिमेत आरोग्य विभागाने नियुक्त केलेले स्वयंसेवक कुटुंबांपर्यंत घरोघरी जाऊन लोकांचा ताप आणि ऑक्सिजन लेव्हल तपासणी, लोकांना आरोग्य शिक्षण आणि महत्त्वाचे आरोग्य संदेश देणे, तसेच संशयित कोरोना रुग्ण शोधणे आदी बाबी पार पाडणार आहेत. त्याचप्रमाणे, उपचारासाठी संदर्भ सेवा तसेच मधुमेह, हृदयविकार, किडनी विकार, लठ्ठपणा यासारखे आजार असणाऱ्या व्यक्तींना शोधून काढणे व उपचारासाठी संदर्भ सेवा या बाबींचाही त्यात समावेश आहे.
ग्रामपंचायतीपासून तर महानगरपालिकेपर्यंत लोकप्रतिनिधींच्या सहभागातून व स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने ही मोहीम राबवण्यात येणार आहे. आरोग्य विषयक जनजागृती करण्यासाठी विद्यार्थी,पालक, सामान्य व्यक्तींसाठी निबंध स्पर्धा, संदेश स्पर्धा इत्यादी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असून विजेत्यांना पारितोषिकेही दिली जाणार आहेत. विविध संस्थांसाठी ही बक्षीस योजना राबविण्यात येईल.नागरिकांमध्ये, तसेच विद्यार्थी, तरूणांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करण्यासाठी विद्यार्थी, पालक,  नागरिक अशा विविध गटांसाठी निबंध स्पर्धा, संदेश स्पर्धा, चित्रकला स्पर्धा इत्यादी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. स्वयंसेवी संस्थांसह विविध क्षेत्रातील संस्थांचा सहभागही मोहिमेत मिळवला पाहिजे.  विविध माध्यमांतून मोहिमेबाबत प्रभावी प्रसार करुन जनजागृती कार्यक्रमात सातत्य ठेवणे आवश्यक आहे. 
                याच काळात केंद्र सरकारने २१ सप्टेंबरपासून शाळा उघडण्यास परवानगी दिली आहे. यासाठी सरकारने नियमावली जारी केली आहे. कोरोनामुळे लॉकडाउन केल्यानंतर देशातील शाळाही बंद होत्या. अनलॉकच्या पहिल्या चार टप्प्यांमध्ये शाळांना परवानगी देण्यात आलेली नव्हती. मात्र आता केंद्र सरकारच्या सूचनेनुसार शाळा उघडण्यात येणार आहेत. सरकारच्या आदेशानुसार ९ ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठीच शाळा उघडता येणार आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या नियमावलीतसुद्धा याबाबत सांगण्यात आलं आहे. 

केंद्र सरकारने दिलेल्या आदेशानुसार कंटेन्मेंट झोनमध्ये शाळा उघडता येणार नाहीत. कंटेंनमेंट झोनच्या बाहेरच शाळा उघडता येतील. शाळा सुरु केल्या तरी प्रार्थना, खेळ आणि इतर कार्यक्रम सुरु कऱण्यास परवानगी नाही. कारण यावेळी गर्दी होण्याची शक्यता आहे. यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचा नियम महत्वाचा असून याबाबत सक्तीने सूचना केल्या आहेत. तसंच सरकारने असंही म्हटलं आहे की, डिस्टन्स लर्निंग सुरुच ठेवलं जाईल आणि त्याला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. याशिवाय शाळांमध्ये सॅनिटायझेशनबाबतही काही सूचना सरकारने केल्या आहेत. 

आदेशामध्ये म्हटलं आहे की, नववी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी शिक्षकांकडून माहिती मिळाल्यानंतर शाळेला जाता येईल. मात्र यातही कंटेनमेंट झोनमध्ये असेलल्या विद्यार्थ्यांना शाळेला जाता येणार नाही. विद्यार्थ्यांना शाळेतसुद्धा पालक आणि शिक्षकांच्या लेखी परवानगीनंतरच जाता येईल.  शाळेत येण्यासाठी पालकांची लेखी संमती आवश्यक आहे.शाळेत लॉकर वापरता येतील, मात्र शारीरिक अंतराच्या नियमाचे पालन सक्तीचे आहे. जलतरण तलाव, सामूहिक खेळांना परवानगी नाही. पुस्तके, वह्या, पेन्सिल, पेन, पाण्याची बाटली अशा गोष्टी एकमेकांना देता येणार नाहीत.  प्रात्यक्षिकांच्या वेळा वेगवेगळ्या ठेवाव्या लागतील.
               शाळांसासाठीही काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी वेगवेगळ्या वेळा निश्चित कराव्यात. वर्गाऐवजी खुल्या मैदानात शिकविण्याच्या पर्यायाचा विचार करावा. ऑनलाइन व डिस्टन्स लर्निंगची व्यवस्था करावी. शाळा उघण्यापूर्वी निर्जंतुकीकरण गरजेचे आहे. केवळ ५० टक्के शिक्षकांनाच ऑनलाइन टीचिंग किंवा टेलि कौन्सिलिंगसाठी बोलवावे. बायोमेट्रिक उपस्थिती ऐवजी इतर पर्यायांचा वापर करावा.  सर्वांच्या तपासणीसाठी पल्स ऑक्सिमीटर आवश्यक असल्याचही नमूद करण्यात आले आहे. क्वारंटाइन झोनमधील विद्यार्थी, शिक्षक वा कर्मचारी विद्यार्थी, शिक्षक किंवा कर्मचाऱ्यांना कोणताही आजार असल्यास यांना शाळेत, आवारात कुठल्याही परिस्थितीत प्रवेश देण्यात येऊ नये. याशिवाय शाळेत अशाच विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना प्रवेश द्यावा ज्यांना कोरोनाशी संबंधित कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. एखाद्या वेळी कोणत्याही शाळेत कोरोनासदृश्य लक्षणं आढळल्यास त्वरीत कोरोना चाचणी करून घ्यावी असंही नियमावलीत सांगण्यात आलं आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सध्या शाळा बंद असल्याने लाॅकडाऊनच्या काळात शासन निर्णय/ परिपत्रकातील मार्गदर्शक सूचनेनुसार व्हाट्स अॅप, दीक्षा अॅप, टिली- मिली कार्यक्रम, भ्रमणध्वनीवरून विद्यार्थी, पालकांशी संवाद, ऑनलाईन  (व्हर्च्युअल) क्लास, सरावासाठी विद्यार्थ्यांना घरचा अभ्यास पीडीएफ झेराॅक्स वाटप, झूम मिटींग, गुगल मिट अशा विविध पर्यायांचा अवलंब करून शैक्षणिक दिनदर्शिकेच्या आधारे नियोजनानुसार 100% विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहावे, यासाठी पर्यवेक्षिय यंत्रणा, शिक्षक  प्रयत्नशील आहेत.सद्यस्थितीत, कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने सोशल , फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन, मास्क, सॅनिटायझर, साबण, हॅन्डवाॅशचा सजगतेने वापर करणे क्रमप्राप्त आहे. याबाबत आपण स्वतः काळजी घ्यावी. तसेच कोरोना संसर्गाच्या  उद्रेकापासून बचावासाठी विद्यार्थी पालकांचे उद्बोधन करावे अशा जबाबदाऱ्या पर्यवेक्षीय यंत्रणांनी शिक्षकांवरच सोपविल्या आहेत. 

बरेच शिक्षक गृहभेटीतून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करीत आहेत. याबाबतचे व्हाट्स अॅप ग्रुपवरील फोटो, व्हिडिओ क्लिप्स पाहिले असता काही शिक्षक सोशल/ फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन तसेच  मास्कचा वापर या बाबींचा अवलंब करीत नसल्याचे निदर्शनास आले आहे. सद्यस्थितीत, कोरोना उद्रेकाच्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तूर्तास विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष संपर्क/भेट शक्यतो टाळून शिक्षकांनी स्वतःच्या आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य द्यावे. 
       यापूर्वी लातूर जिल्हाधिकारी यांनी एसीपी म्हणजे अँटी कोरोना पोलिस हा उपक्रम राबविला होता. त्याचे मन:पूर्वक कौतुक मुख्यमंत्र्यांनी केले होते. तसेच नांदेडच्या सप्तरंगी साहित्य मंडळाने हाच उपक्रम हाती घेतला होता. यात घरातील एकावर आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची काळजी घेण्याबाबत नियमावली तयार करण्यात आली होती. हे या मंडळाने सोशल मीडियाचा आधार घेऊन आवाहन केले होते. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेला सुरुवात केली आहे. केंद्र सरकारने माझी शाळा, माझी जबाबदारी हा उपक्रम शाळा सुरु करण्याबाबत निश्चित केला आहे. सर्वांनीच जबाबदारीने वागल्यास, आवश्यक ती खबरदारी आणि उपाययोजनेसह वावरल्यास आपणच आपल्या हातांना कोरोनाची लस बनवून कोरोनाला हरवू शकतो. 

Gangadhar DHAVALE
Gangadhar DHAVALE

गंगाधर ढवळे,नांदेड

 संपादकीय       /                १०.०९.२०२०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *