आमची चाळीशी पन्नाशीतील पोरं लयीच वांड.. काय तर म्हणे तु माझं स्टेटस पाहिलं तरी मी लाजते..
इश्य काहीही हा असच म्हणावं वाटतं..
दोन मिनिटे आपण हे खरं धरुन चालुयात.. ही कल्पनाच किती सुंदर आहे ना.. मला हे लिहीताना अंगावर शहारा येतोय म्हणजेच मी जीवंत आहे आणि तरुणही आहे.. इश्य म्हणणं असेल , लाजणं असेल हे लुप्त झालं का ?? ..
नाही हो फक्त व्यक्त होण्याची पध्दत बदलली .. कुठल्याही वयात आपण प्रेमात पडतो, कोणाला तरी मिस करतो. त्याच्या मिठीची हुरहुर , एका कपातील कॉफी , एकत्र घालवलेले क्षण हे सगळं तर तेच आहे तरीही रोज नव्याने ते भासतं आणि वाढत्या वयाला वेड लावतं..
खुप मिस करतोय गं तुला हे वाऱ्याच्या झुळुकीसारखं सुखावुन जातं आणि वेडं मन एका क्षणात मयुर होवुन नाचू लागतं.. धोक्याचं वय पन्नास की १८ हेच कळत नाही पण याला धोक्याचं का म्हणावं ??.. मोक्याचं का म्हणु नये.. ज्यातुन आनंद मिळतो ते दाबुन टाकुन सभ्यता मिरवण्यात कसलं शहाणपण आलय.. आपल्याला कोणाबद्दल काहीतरी वाटतय आणि आपण ते व्यक्त करतो या वेडालाच तर प्रेम म्हणत असावेत ना.. माझ्या आयुष्यात गेल्या आठवड्यात मी पहिल्यांदा बुढ्डी के बाल आणि गोळा खाल्ला त्यावेळी सुध्दा पुन्हा नव्याने प्रेमात पडल्याची जाणीव झाली..
आपण कशातही रमतो ना.. मी तर प्रेमाच्या बाबतीत वेडी आहे आणि सगळ्याना वेड लावणं जणु छंदच आहे.. इथे रत्नागिरीत हॉस्पिटलच्या खाली भुभु आहे.. काल त्याला दोन वेळा पोळी दिली तर आज तो माझी वाट पहात बसला होता.. मला पाहिल्यावर शेपटी हलवत जो उड्या मारायला लागला ते पाहुन मन प्रफुल्लित झालं.. हेही प्रेमच की.. मी कोणालाही प्रेमात पाडु शकते आणि प्रेमात पडताना मात्र चॉइस असतो…
आताच लव्ह बर्डचा एक व्हीडीओ पाहिला आणि प्रेमाची नव्याने व्याख्या समजली .. प्राणी ,पक्षी सुध्दा इतकं उत्कट प्रेम करु शकतात मग आपण का नाही ??.. लव्हयु वालं प्रेम फसवं असु शकतं पण जो फक्त आपलीच वाट पहातो त्याला शोधणं हेच तर प्रेम असावं.. प्रेम निरपेक्ष कधीही नसतं फक्र ते अपेक्षाच्या ओझ्याने झुकणार नाही ना याची काळजी प्रत्येकाने आपली घ्यायची.. कोणी चड्डीत रहातं मी मात्र कायमच प्रेमात रहाते.. इतक्या लेखक कवीनी प्रेमावर लिहीलय तरीही त्यातील सौंदर्य प्रत्येक व्यक्ती गणीक नव्याने खुलतं.. एक व्यक्ती अनेकदा प्रेमात पडुच शकते पण एकाच व्यक्तीच्या प्रेमात पुन्हा पुन्हा पडायला ज्याला जमलं तो खरा प्रेमवीर..
तो म्हणाला , I love you
मी म्हणाले , I like you
दोन्हीत फरक काय ??
एकात प्रेयसी दडलेय आणि एकात बायको
सोनल गोडबोले..