हा देश माझा याचे, भान जरासे राहू द्या रे… ! 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन विशेष

येत्या 26 जानेवारीला 74 वा भारतीय प्रजासत्ताक दिन आपण थाटामाटाने साजरा करीत आहोत,आपल्या देशात सांस्कृतिक विविधता आहे. ती तशीच कायमस्वरूपी टिकवून राहावी, देशातील सर्व लोक सर्वधर्मसमभावाने वागावेत, एकमेकांचे जिव्हाळ्याचे संबंध असावेत, आपण सर्वांनी गुण्यागोविंदांने एकत्रित नांदावे, प्रत्येकाने आपल्या परीने सर्वांना समजून घ्यावे. उच्च- नीचता,
लहान-मोठा,स्पृश्य- अस्पृश्यता
,भेदभाव सोडून द्यावे. सर्व जाती,धर्म.
पंथ, संप्रदाय एकत्रित नांदावेत, तेव्हाच आपले प्रजासत्ताक चिरायू होवो, असे आपणास ठामपणे म्हणण्याचा पूर्ण अधिकार प्राप्त होतो. क्रांतीकारक सेनापती बापट यांनी लिहिलेले देशभक्तीपर गीत आज जसेच्या तसे आपणास लागू पडते.
15 ऑगस्ट 1947 ला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. आणि 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय प्रजासत्ताक दिन उदयास आला या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ,भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद हे होते, 26 जानेवारी 1950 पासून जनतेच्या हाती कारभार सोपवण्यात आला, भारताची राजधानी नवी दिल्ली येथे संसद भवन उभारण्यात आले, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ कायदेमंडळ , निर्माण करून जनतेच्या हाती सत्ता सोपवण्यात आली
,म्हणूनच या दिनाला प्रजासत्ताक दिन असे म्हटले जाते. तेव्हापासून राज्यघटने नुसार आपल्या देशाचा राज्यकारभार केला जातो, जातीभेद, दहशतवाद,विषमता,दारिद्र्य, भेदाभेद,
असहिष्णूता, नक्षलवाद हे विसरून आपण सर्व एक आहोत याची जाणीव ठेवून वागले तरच या देशाचं भान आपल्याला आले असे म्हणता येईल. या देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी हजारो सैनिकांनी, क्रांतिकारकांनी आपले बलिदान दिलेले आहे. त्यांच्या बलिदानाचे आपणाला विस्मरण होता कामा नये. स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून या क्रांतिकारकांनी आपले जीवन संपवले आहे .त्यासाठी आपण सर्वांनी मिळून त्यांच्या स्मृती जागल्या पाहिजेत. तिरंगी झेंड्याचा अभिमान ठेवला पाहिजे, राष्ट्रीय प्रतीके जोपासले पाहिजेत ,परकीय सत्तेने भारतावर आक्रमण केले. डच ,इंग्रज, फ्रेंच ,पोर्तुगीज, मुघल, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही या सर्वांनी भारतावर हल्ले केले तरीही आपल्या इथल्या सैनिकांनी, क्रांतिकारकांनी , शूरावीरांनी छातीचा कोट करून हे हल्ले परतून लावले याचे भान आपल्याला असणे आवश्यक आहे. आज आपण महासत्ता होण्याची स्वप्न पाहत आहोत, आपल्या देशावर आजूबाजूच्या देशांनी हल्ले केले त्यावेळेस ते परतून लावले, यापुढे आपण सर्वांनी एकत्रित पणे सहभागी झाले पाहिजे,तरीही आज देशाला संरक्षणाची गरज आहे ,कसाब सारखे दहशतवादी मुंबईला येऊन पोहोचतात. त्यामुळे आपल्या सुरक्षित तेविषयी शंका निर्माण होते. संसदेमध्ये कामकाज चालू असते वेळेस काही घुसखोर आत शिरतात. याबद्दलही शंका निर्माण होतात. त्यामुळे आपल्या सुरक्षितेविषयी काळजी घेणे गरजेचे आहे. आपला देश महासत्ता होण्यासाठी आपल्या विचारवंतांनी, समाज सुधारकांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी , शास्त्रज्ञांनी सर्वांनी जर आपापल्या कामाचे भान ठेवले तर आपण महासत्ता होणारच आहोत. यात तीळ मात्र शंका नाही. आपल्या देशाची लोकसंख्या आज १४० कोटी आहे तरीही ऑलिंपिक सारख्या खेळांमध्ये आपणाला बोटावर मोजण्या इतके पदक मिळतात ही गोष्ट आपल्याला भूषण नाही तर दूषण आहे. याचे भान सर्वांनी ठेवले पाहिजे. आज शेतकऱ्याची अवस्था अतिशय दयनीय व वाईट झालेली आहे, त्याच्या मालाला हमीभाव मिळत नाही ; त्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत हे सत्र थांबले पाहिजे हा देश माझा आहे. मग या देशातील माणसे सुद्धा माझे आहेत, त्यांची जपणूक करणे आपल्या देशाचे कर्तव्य आहे, माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी *जय जवान, जय किसान* म्हटले आहे, याचे भान असणे महत्त्वाचे आहे, तेव्हा हा देश माझा आहे असे म्हणता येईल ,
आज सर्वत्र बेरोजगारी वाढलेली आहे.काही तरुण हे व्यसनाधीन होत आहेत .जो तो मोबाईलच्या दिवा स्वप्ना मध्ये आपला अमूल्य वेळ वाया घालत आहे ,याचे भान तरुणांने ठेवावे, आज जिकडे तिकडे हिंसाचार वाढत आहे
अपघात दररोज कुठे ना कुठे होत आहेत, त्यामुळे हे थांबविने आज गरजेचे आहे.आज निवडणुकांमुळे लोक आपला, जवळचा ,नातेवाईक म्हणून गैरमार्गाने मतदान करत आहेत, त्यामुळे निवडणुका स्वच्छ वातावरणात घेतल्या जाव्यात, मत विकले जाऊ नये ते स्वाभिमानाने सत्याकडे झुकणारे असावे, मनुष्य हा राष्ट्राची संपत्ती असतो, चांगल्या व्यक्तीला निवडून दिले तर चांगले कार्य होतात .विवेक जाग्यावर ठेवून मतदान करावे लागते, चुकीच्या व्यक्तीला आपला प्रतिनिधी निवडल्या नंतर त्याचे वाईट परिणाम संपूर्ण समाजाला, देशाला भोगावे लागतात. म्हणून भान ठेवून प्रत्येकाने मतदान केले पाहिजे. हा देश माझा आहे या देशातील नैसर्गिक संपत्ती माझी आहे. आपल्याला हे स्वीकारावे लागते, हा उंच हिमालय माझा आहे त्याचं रक्षण करणं आपलं कर्तव्य आहे. आज झाडे तोडले जात आहेत, उजाड माळरान केलं जात आहे, सिंमिटांचे डोंगर उभे करत आहेत.त्यामुळे पाऊस कमी पडतो त्याचे परिणाम सर्व चराचरसृष्टीवर होत आहेत. म्हणून हिमालयाचे रक्षण करणे, आणखी झाडे लावून तो घनदाट जंगल करणे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे .
या ठिकाणच्या नद्या प्रदूषित होत आहेत.कचरा टाकला जात आहे. मलमूत्र सर्व नदीत सोडून नामा निराळे होत आहेत,जर नद्या प्रदूषित झाल्या तर जलचर प्राणी मरण पावतात. काही जलचरांच्या जाती नामशेष होत आहेत याचे भान आपणाला असावे. नद्या या पवित्र आहेत त्या पवित्र रहावेत म्हणून प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे, सध्या आपण तंत्रज्ञानाच्या युगामध्ये वावरत असलो तरी आपले सामाजिक पातळी घसरत आहे अनेक ठिकाणी आई-वडिलांना मुले घराबाहेर काढत आहेत, त्यामुळे वृद्धा आश्रमाची संख्या वाढत आहे. याचा विचार होणं गरजेचे आहे , लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे हा चिंतनाचा विषय झालेला आहे
,आपली ही पिढी जर अशी वागत असेल तर आपला भारत देश एवढा महान असून इथली संस्कृती चांगली असून असे का घडत आहे? याची साधक बाधक चर्चा समोर येणं आवश्यक आहे, स्वामी विवेकानंदाकनी भारतीय संस्कृतीचे महत्त्व शिकागोच्या धर्म परिषदेत वर्णन केलेला आहे याचे भान ठेवणे गरजेचे आहे ,माणसं पैशाने मोठी झाली. संपत्ती कमावली पण नैतिकता आणि कर्तव्याला विसरली असे होत आहे. त्यामुळे आपण सर्वांनी हा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे.आपला देश अर्थव्यवस्थेमध्ये पुढे जात आहे. आपण स्वावलंबी बनत आहोत ,याचा डंका आपण सर्वत्र वाजतगाजत पिटवत आहोत. त्याचबरोबर आपल्या देशावर किती कर्ज आहे? याचा विचार आपल्या मनात येत नाही ते करून पहा मग आपण किती पुढे आहोत? किंवा मागे आहोत ? हे आपोआप कळेल. तसेच आज मुलगाच हवा या अभिलाषे पोटी स्त्री भ्रूण हत्या होत आहेत, त्यामुळे मुलांची संख्या वाढली आहे मुलींची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे गावोगाव शेकडो तरुण लग्नाविना वावरत आहेत त्यामुळे त्यांच्या कडून गैरमार्ग होण्याची दाट शक्यता आहे ,यामुळे स्त्री -पुरुष समानता आणली पाहिजे.
आज वरवर आपण एक आहोत परंतु प्रत्येक व्यक्तीच्या हातात वेगळा झेंडा आहे, काही व्यक्ती सकाळी, दुपारी, संध्याकाळी तीन झेंडे घेऊन फिरत आहेत, वारंवार पक्ष बदलत आहेत, निष्ठे कमी होत आहे, त्यामुळे शंकेला जागा निर्माण होत आहे ,असे जर होत असेल तर आपण या देशाशी एकरूप होणार नाही, *साखरेचा कण जसा दुधाशी एकरूप होतो, तसा मनुष्य राष्ट्राशी एकरूप झाला पाहिजे* तेव्हा आपला भारत देश महान होईल असे मला वाटते ,प्रत्यक्ष कृती करूनच मोठे होता येते *बोलाचे भात आणि बोलाची कढी* म्हणून ढेकर देता येत नाही, असे पूर्वज सांगतात वरील सर्व गोष्टीचे स्मरण करून व प्रत्यक्ष कृती करून आपण वागलो तरच भारत हे प्रजासत्ताक चिरायू होईल म्हणण्याचा आपल्याला सर्व अधिकार आहे, जर आपली लोकशाही आतून पोखरून गेली तर परकीय हल्ले कधीही आपल्यावर होतील हे भविष्य सांगायला ज्योतिषाची गरज आपणास नाही, त्यामुळे आपली शिक्षण व्यवस्था उत्तम दर्जाची असावी, नद्या नाले यांचे साफसफाई केली पाहिजे, झाडे लावले पाहिजेत, पर्यावरणाचे संतुलन ठेवावे लागते तसेच आपला व्यवहार पारदर्शी असला पाहिजे,
आपले समाजकारण, राजकारण, जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण या गोष्टी सर्वांना घेऊन चालणारे असाव्यात, प्रत्येकाला वाटते आपला देश पुढे जावावे, मग कार्य कोण करावं? घरात बसून गप्पा मारून आपणाला सगळं सुरळीत चालवता येणार नाही. प्रत्यक्ष कृतीच करावी लागते ,पोहण्यासाठी पाण्यात उतरावं लागते, अंग न भिजवता पोहता येत नाही, तसं राष्ट्रीय कार्यात सर्वांनी पुढे यावे फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला आपण *भारत माता की जय* म्हणतो आणि दुसऱ्या दिवशीपासून आपण विसरून गेल्यासारखे होते,
*जरी अनेक आपले धर्म*,
*जरी अनेक आपल्या जाती*
*परी अभंग असू द्या* ,
*सदैव आपली माणुसकीची नाती* असे आपणाला घडवायचे आहे
असं राष्ट्रीयत्व आपल्याला सांभाळता येईल, म्हणून अनेक विषयावर आज आपण मागे आहोत त्यामुळे भारतीय प्रजासत्ताक दिन अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे या 75 वर्षात आपण केलेल्या सुधारणा आणि आपली झालेली अधोगती या दोन्ही गोष्टी आपल्यासमोर येणे गरजेचे आहे. त्यासाठी आजच्या तरुणांनी आपले नौदल, हवाई दल ,भूदल सुरक्षित राहण्यासाठी त्यात भरती होऊन आपल्या सीमा सुरक्षित ठेवल्या पाहिजेत. आपल्या संस्कृतीला कोणी नाव ठेवेल असे वागू नका, भ्रष्टाचार हा समाजाला लागलेला कलंक आहे, त्यापासून दूर राहा तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने भान ठेवून वागत आहोत काय? म्हणून सेनापती बापट म्हणतात.
*हा उंच हिमालय माझा*,
*हा विशाल सागर माझा*,
*या गंगा यमुना शेती धरती*
*बागबगीचा माझा*
*अभिलाषा याची धरीता*,
*कोणी नजर वाकडी करता*
*या मरण द्यावया स्फुरण*,
*आपल्या बाहू पावू द्या रे* …
*हा देश माझा याचे*,
*जरा भान राहू द्या रे..!* या ओळी वाचल्यानंतर अंगावर रोमांच उभे राहतात.खरोखर आपण असे वागलो तर आपला प्रजासत्ताक दिन चिरायू होईल असे मला वाटते म्हणून
माझ्या देशवासीयांनो तुम्हाला मला असं सूचित करावं वाटते ,वाढलेली अंधश्रद्धा ,वाईट चालीरीती ,प्रथा, परंपरा ,भ्रष्टाचार ,गैरमार्ग ,अपहरण, दहशतवाद ,नक्षलवाद ,पळवा पळवी, फसवणूक, खोटी आश्वासने, लैंगिक अत्याचार , पैशाचा पाऊस हे सर्व बंद केले तरच आपण जगाच्या स्पर्धेमध्ये टिकू शकाल म्हणून हे गीत तुमच्यासमोर स्फूर्तीसाठी ठेवत आहे.
*हे बंद करा उत्पात*,
*थांबवा हा आपुला घात*
*संघर्ष न जावो व्यर्थ*
*काहीसा अर्थही येऊ द्या रे…!*
सर्वांनी आपण एकत्रित येऊन आपल्या देशाची सेवा करावी, या ठिकाणी महिलांना समानतेची व सन्मानाची वागणूक द्यावी,अनाथ मुले मुली, विधवा महिला या सर्वांना न्याय देऊन समानतेने घेऊन चाललो तरच आपले भान जाग्यावर आहे असे म्हणता येईल आणि देशाचा सन्मान होईल, भारतातील भिन्न भिन्न प्रदेशातील अनेक संत, महंत, महात्मे, थोरपुरुष, क्रांतिकारक , सैनिक, शेतकरी, प्राकमी महिला पुरुष,
समाजसुधारक ,विचारवंत, शास्त्रज्ञ,महान व्यक्ती या सर्वांनी देशासाठी केलेल्या कार्याचे स्मरण करू, भारतातील अनेक गट जाती समूह ,आदिम जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती ,बारा बलुतेदार , अठरा अलुतेदार यांच्यातील समन्वय, सामंजस्य, एकात्मता, यांच्या प्रथा, परंपरा ,पोशाख, भाषा ,आचार- विचार, देवदेवता ,उत्सव ,उपासना पद्धती, नृत्य विविधतेतून एकात्मता सर्व जतन करून हा आपला देश आहे याचे जरासे भान राहू द्या रे…..!असे म्हणून विविधतेत एकता दाखवून देऊ, व आपला देश प्रगतीपथाकडे नेण्याचा सर्वांनी प्रयत्न करू, (लेखक हे इतिहास विषयाचे तज्ञ आहेत)
विठूमाऊली प्रतिष्ठान खैरकावाडीच्या वतीने भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

*शब्दांकन*
*प्रा.बरसमवाड विठ्ठल गणपत* अध्यक्ष :विठूमाऊली प्रतिष्ठान खैरकावाडी. पो. बोमनाळी
ता.मुखेड जि. नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *