भारतीय संविधानाचे प्राणपणाने संरक्षण करावे – भदंत पंय्याबोधी थेरो

नांदेड – भारतीय संविधानाने या देशातील प्रत्येक माणसाच्या कल्याणाचा विचार केला. परंतु भारतीय संविधान लागू केल्याच्या ७५ वर्षांनंतरही संविधानविरोधी शक्ती डोके वर काढत आहे. येत्या काळात भारतीय संविधानाचे प्राणपणाने संरक्षण करावे अशी अपेक्षा येथील अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरू संघनायक भदंत पंय्याबोधी थेरो यांनी केले. ते दाभड येथे भरलेल्या ३७ व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेत धम्मदेसना देतांना ते बोलत होते. यावेळी  भदंत धम्मसेवक महास्थविर, भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो, भिक्खू अतुरलीय रतन थेरो, कानरोजी टेंपल ओसाका, जपानी भिक्खूणी कछो, भिक्खू डॉ. खेमधम्मो महाथेरो, भिक्खू डॉ. एम. सत्यपाल थेरो, भिक्खू डॉ. इंदवंश थेरो, संयोजक डॉ. एस. पी. गायकवाड, डॉ. मिलिंद भालेराव आदींची उपस्थिती होती.
         पौष पौर्णिमेनिमित्त दाभड येथे भारतीय बौद्ध ज्ञानालंकार, शिक्षण संस्था मुळावा शाखा महाविहार बावरीनगर, दाभड यांच्या संयुक्त विद्यमाने ३७ व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भिख्खू संघाची धम्मदेसना संपन्न झाली. भदंत पंय्याबोधी थेरो बोलताना म्हणाले की, येणारा काळ आपल्या सर्वांसाठीच खडतर असा आहे. आपण आपल्यातील अहंभाव विसरून एकत्र आले पाहिजे, ही काळाचीच गरज आहे. देशात हुकुमशाहीची चाहुल लागली आहे. विविध शासकीय संस्थांचे खाजगीकरण सुरू आहे. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आरक्षण विविध मार्गांनी संपुष्टात येत आहे. याचाच अर्थ सर्वसामान्य माणसाच्या हक्क आणि आणि अधिकारांवर छुप्या मार्गाने गदा येत आहे असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *