निमित्त पोपटीचं

पण एका कुटुंबाला जोडले गेल्याचा आनंद..
पोपटी या पदार्थाबद्द्ल अनेक वर्षे ऐकुन होते.. सहज फेसबुकवर पोस्ट केली.. मला पोपटी बनवण्याची प्रोसेस अनुभवायची आहे आणि टेस्टही घ्यायची आहे . काही मिनीटात मेसेंजर आणि फेसबुकवर मेसेजेसचा खच पडला..
मॅम आमच्याकडे या.. तुमचे पाय आमच्या उंबऱ्याला लागूदेत. आम्हाला सेवा करायची संधी द्या अशा आशयाचे मेसेजेस होते…
त्यात एका माझ्या वाचक आणि चाहत्याने म्हणजेच अरुणजी कुंभार यांनी मला wp वर पनवेलहुन मेसेज केला , मॅम पोपटीसाठी लागणारे कडवे वाल आता आले आहेत .. तुम्ही कधी येताय ??.. आणि तुमच्या कितीही मित्रमैत्रीणीना घेउन या.. जेव्हा मी पैशाचं त्यांच्याशी बोलले तेव्हा त्याला त्यांनी नकार दिला आणि म्हणाले , आम्हाला तुमचा पाहुणचार करायचा आहे…काल दुपारी ५ जण पनवेलला जायला निघालो.. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने हसतमुखाने त्यांच्या घरी आमचे स्वागत केले.. थोडं खेडं , थोडं शहर.. एकत्र हसतमुख कुटुंब , अंगणात तुळस , असा सुंदर परिसर .. गेल्या गेल्या गरमागरम कॉफीचा कप हातात आणि तिथुन त्यांच्या मित्राच्या शेतावर भाज्या घेउन आम्ही निघालो..
पोपटीसाठी लागणारा भांभुर्डीचा पाला , केळीची पानं, बटाटे , रताळी , मडकी , कडव्या वालाच्या शेंगा , मका , पनीर अशा सगळ्या गोष्टी त्यांनी आणल्या होत्या… पोपटीची प्रोसेस मी फेसबुक लाइव्ह केलं होतं ते पहा .. इथे मी लिहीत नाही…
ती करतानाची प्रोसेस खूपच मजेशीर होती .. अरुणजीचे हॉटेल व्यावसायिक मित्र यांनी पोपटी बनवायला सुरुवात केली.. आणि आम्ही व्हीडीओ , फोटो याचा मनमुराद आनंद घेतला.. सगळे पदार्थ आणि मसाले मडक्यात भरुन घराच्या मागे शेतात लाकूड , पेंडा लावुन जाळुन त्यात ती मडकी आणि आतल्या भाज्या खमंग खरपुस भाजुन निघाल्या त्यासाठी लागणारी संपूर्ण मेहनत ही अरुणजींच्या संपूर्ण कुटुंबाने माझ्यासाठी केली होती.. त्याशिवाय आज रात्री इथे रहा.. किवा पोपटी खाल्यावर जेवून जा हा आग्रह होता तो वेगळाच . त्यांची तिन्ही लहान मुलं सुध्दा लोभस आणि गोड ..
प्रेमाने आणि आग्रहाने त्यांनी भरपुर पोपटी खाऊ घातली .. त्यांना भेटल्यावर मी पहिल्यांदा भेटले असं वाटलच नाही.. वागण्या बोलण्यात प्रचंड आदर होता.. खुप कौतुक होतं .. आम्हाला खाऊ घातल्याचा आनंद होता.. तरीही लोक म्हणतात , सोशल मिडीया वाईट.. जेव्हा अरुणजींसारखीस अनेक मंडळी वेगवेगळ्या ठिकाणी मला भेटतात तेव्हा तेव्हा माझ्यावर भरपूर प्रेम करतात.. सोशल मिडीयावरुन ओळख होवुन अनेक मित्र आणि कुटुंब माझ्याशी जोडली गेली आहेत.. मी या कुटुंबाशी जोडले गेल्याचा मला मनोमन आनंद आहे..
कोणीही आणि काहीही वाईट नाही याचा पुनप्रत्यय आला.. या कुटुंबाचे आभार मानुन मला त्यांना परकं करायचं नाही पण कृतज्ञता नक्कीच व्यक्त करायची आहे.. माझे मित्र आप्पा, डॉक्टर अभय , संतोष यांच्या सोबतीने पोपटी प्रवास अतिशय रंजक होता.. सगळ्या पनवेल कराना धन्यवाद..
ज्यांना पोपटी माहीत नाही त्यांनी पेण पनवेल ला जाऊन या सीझनमधे पोपटीचा जरुर आस्वाद घ्या..
सोनल गोडबोले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *