Post Views: 122
नांदेड – बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सर्वसामान्य माणसांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. संविधानावर होणारे हल्ले मोडून काढण्यासाठी आणि संविधानाचे संरक्षण करण्यासाठी सर्वसामान्य भारतीयांनी पुढे येण्याची गरज आहे असे प्रतिपादन येथील अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरू संघनायक भदंत पंय्याबोधी थेरो यांनी केले. तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्राची धम्मदान व धम्मसंदेश यात्रा आखाडा बाळापूर येथे सम्राट अशोक बौद्ध धम्म परिषदेत गेल्यानंतर भदंत पंय्याबोधी थेरो बोलत होते. यावेळी मुळावा येथील ज्ञानालंकार शिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. भदंत खेमधम्मो यांच्यासह भिक्खू संघ उपस्थित होता.
धम्मदेसना कार्यक्रमांतर्गत उपदेश देतांना भदंत पंय्याबोधी थेरो यांनी नागरिकांच्या वर्तनावर आणि बोलण्यामध्ये असलेल्या तफावतीवर बोट ठेवले. ते पुढे म्हणाले की, आजचे हिंदुत्ववादी सरकार भारतीय संविधानावर छुप्या पद्धतीने हल्ले करीत आहे. संविधान आहे म्हणून सर्वसामान्य माणूस सुरक्षित आहे. तो मोकळ्या मनाने जगू शकतो. त्यासाठी संविधान सुरक्षित असणे गरजेचे आहे. संविधानाच्या रक्षणासाठी सर्वसामान्य नागरिकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. दुसऱ्या सत्रात सुप्रसिद्ध विचारवंत डॉ. संध्या रंगारी यांचे व्याख्यान झाले. तिसऱ्या सत्रात प्रख्यात गायक अनिरुद्ध बनकर यांच्या प्रबोधनपर गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
धम्म परिषदेत आयोजकांचे टोचले कान
बौद्ध धम्म परिषदेच्या नावाखाली राजकीय पक्षांच्या प्रचारसभा सुरू करण्याचा घातकी प्रयोग आयोजकांनी चालवला आहे. धम्म परिषदेत संविधान विरोधी राजकीय पक्षांच्या नेत्यांना आणि त्यांच्या झेंड्यांना फिरकू देऊ नये. धम्म परिषदेसाठी जमलेल्या लोकांचा वापर राजकीय कामांसाठी करु नये. आयोजक एकाच कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या राजकीय नेत्यांचे फोटो छापून पाँपलेट, पत्रिका छापून प्रचार करीत आहेत. हा प्रकार दुर्दैवी असून, ही बाब खपवून घेतली जाणार नाही, असा सज्जड दम देत भदंत पंय्याबोधी थेरो यांनी आयोजकांचे कान टोचले.