कंधार : प्रतिनिधी
आज कंधार तालुक्यातील लिंगायात समाजाद्वारे मा. तहसीलदार साहेब यांना निवेदनाद्वारे कंधार शहरामध्ये लोकशाहीचे जनक महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी दर्शनी आणि मोक्याच्या ठिकाणी जागेची मागणी करण्यात आली.
महात्मा बसवेश्वर महाराज यांनी बाराव्या शतकात समता, न्याय आणि बंधुता या मूल्यांचा पुरस्कार करत सबंध भारत वर्षामध्ये शरण चळवळ उभी करून; लोकशाही मूल्यावर आधारित समाज रचनेची पायाभरणी केली. सध्याचे महाराष्ट्र राज्य ही त्यांची कर्मभूमी असून त्यांचे शरण उरलींगदेव पेदी यांनी कंधार पंचक्रोशी मध्ये या मूल्यांची पेरणी केलेली आहे. कंधार शहरांमध्ये त्यांचे प्रशस्त मठ असल्याचे अनेक पुरावे आज उपलब्ध आहेत. कंधार तालुक्यामध्ये लिंगायत वाणी, लिंगायत तेली, लिंगायत कुंभार, लिंगायत चांभार, लिंगायत ढोर, लिंगायत बुरुड, लिंगायत फुलारी, लिंगायत सुतार, लिंगायत जंगम इत्यादी समाज हा महात्मा बसवेश्वर महाराज यांना आपले आराध्य मानतो. लिंगायत समाजामध्ये 84 पेक्षा जास्त जातींचा समावेश होतो. आपले आराध्य महात्मा बसवेश्वर महाराज यांचा अश्वारूढ पुतळा कंधार शहरांमध्ये उभा टाकावा, एवढी माफक अपेक्षा समाजाने बाळगणे सहाजिक आहे. महापुरुषांचे चित्र समोर असले की त्यांचे विचार आणि त्यांचे चारित्र्य तेवत राहते, हेच विचार पुढच्या हजारो पिढ्यांच्या उज्वल भविष्यासाठी निर्णायक भूमिका बजावतात.
निवेदनाद्वारे पुढील सात दिवसात प्रशासनाने जागा उपलब्ध करून द्यावी, अशी आग्रही भूमिका यावेळी लिंगायत समाजा द्वारे मांडण्यात आली आहे. सात दिवसानंतर मागणी मान्य न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा सचिन पेठकर यांनी दिला आहे. यावेळी मा. दत्ताभाऊ कारामुंगे, पिंटू भाऊ अभंगे, प्रवीण मंगनाळे,नारायण फुलवळे, राजूभाऊ कारामुंगे,राहुल पेठकर, विश्र्वांभर पांचाळ, उमाकांत अभंगे, ओमकार डोम,शुभम फसमल्ले, नवनाथ बेंबळगे,विश्वनाथ भुरे, आनंदा वंजे आणि इतर लींगायत बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.