मराठी स्वराज्य व्हावे ही मावळ्यांची इच्छा!

 

छत्रपती शिवाजी महाराज! असे उच्चारताच ‘जय’ हे जयघोषी जयजयकार आपल्या अंतःकरणातून आपसूकच निघतो. हे इथल्या महाराष्ट्राचे आणि मराठी माणसांचे वैभव आहे. ‘हर हर महादेव’ ही मावळ्यांची रणगर्जना होती. ती केवळ मराठ्यांशी संबंधित नव्हती तर संबंध मराठी मुलखात आणि बाहेरही दुमदुमली होती. हे मराठे अठरापगड जातींचे प्रतिनिधी होते. या मावळ्यांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी आपला शेवटचा श्वास पणाला लावला होता. प्राणांची बाजी लावली होती. पराक्रमाची शिकस्त केली होती. या मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या केसालाही धक्का लागू दिला नाही. आपणच निर्माण केलेल्या स्वराज्याचे आपल्या रक्ताचे पाणी करून सिंचिले. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले. राजमाता जिजाऊंनाही
जपले. त्यांच्या हुकमांचे पालन केले. आपली व आपल्या कुटुंबाची पर्वा न करता ते रणमैदानात उतरले. प्रसंगी गनिमी काव्याने शत्रुला नामोहरम केले. येणाऱ्या संकटांना न घाबरता महाराजांच्या यूक्ती आणि बुद्धीच्या जोरावर एकजुटीने सामना केला. स्वराज्य निर्माण करणे हे काही येरागबाळ्याचे कामच नव्हते. ते शुरविरांच्या धाडसाचे, पराक्रमाचे, स्वराज्यासाठी स्वतःला झोकून देऊन पिढ्यानपिढ्याना प्रेरणा देणाऱ्या लढवय्यांचे ते विश्वसौंदर्य होते. निबिड अंधाराला फाडून सूर्यतेज पसरविणारे ते इतिहास घडविणारे हात होते. गुलामीची जाणीव कोसो दूर करून या मातीची विजयी पताका स्वातंत्र्याच्या विस्तीर्ण आभाळात अभिमानाने फडकविणारे माणसांचे ते शाश्वत संविधान होते‌.

रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतल्यानंतर शहाजीच्या पोराने आपल्या भोवती हलक्या जातीची पोरं जमविली असा जातीयवाद्यांनी आरोप केला. पण हे हलक्या जातीची पोरं शिवरायांसाठी आणि स्वराज्यासाठी जीव देण्यासाठी सज्ज होते. अत्यंत धावपळीच्या काळात शिवाजी महाराजांचा जन्म झाला. परंतु त्या आधीच जिजाऊंच्या मेंदूत स्वराज्याचा जन्म झाला होता. शिवरायांचे बालपण आणि शिक्षण जसजसे बाळसे धरत होते तसतसे स्वराज्याची संकल्पना अधिकाधिक दृढ होत होती. शहाजीराजे आदिलशाहीची चाकरी करण्यात गुंतले होते, मात्र या परकियांची गुलामी करणाऱ्या मराठी सरदारांबद्दलची चीड आगीचे रुप धारण करीत होती. मावळे खूप कष्टाळू, इमानी, काटक, चपळ लढवय्ये योद्धे होते. परंतु सगळी ताकद सुलतानी राजवटीसाठी खर्ची पडत होती. मराठी मुलखावर राज्य करीत असलेल्या या राजवटी अत्यंत क्रूर होत्या. त्यांना जनतेचे, जनतेच्या प्रश्नांचे काही देणे घेणे नव्हते. जनतेचे दुःख दूर करणारा कुणी वाली नव्हता. महाराष्ट्राच्या चोहोबाजूंनी असलेल्या सर्व राजवटी युद्धपिपासू होत्या. यात अनेक मराठी कुटुंबे देशोधडीला लागायची. मराठी मुलखाची अक्षरशः धुळधाण होत होती. सुलतानशाहीच्या जुलमी अत्याचाराच्या विरोधात बंड पुकारून दुःखी कष्टी जनतेसाठी काही करण्याची इच्छा माँ जिजाऊंनी शिवबात पेरली. यासाठीच तमाम मावळ्यांची फौज उभी करण्यात आली होती. इथे जातीपातीचा विचार नव्हता. श्रेष्ठ कनिष्ठतेची श्रेणी नव्हती. त्यांचे केवळ एकच ध्येय होते – स्वराज्य!

शिवरायांच्या काळात जातीयवाद नव्हता असे नाही. तो होताच. अगदी प्रखर होता. धर्माचे अधिष्ठानही तितकेच प्रबळ होते. अशाही परिस्थितीत अस्पृश्य, व्यवस्थेतील बारा बलुतेदार किंवा आदिवासी जाती जमातीतीलच नव्हे तर मुसलमानांतूनही जिवाला जीव देणारे मावळे शिवरायांनी स्वराज्याला जोडले.

स्वराज्याच्या सैन्यात जातिभेद, वर्णभेद असा कोणताही भेदभाव नव्हता.प्रज्ञाधर ढवळे, यांतील प्रत्येक मावळा आपल्यासारखाच माणूस आहे ही जाणीव त्यांनी प्रत्येकाला करुन दिली. ते माणसाचे मन जिंकून घेण्यात पटाईतच होते. त्यामुळे तरुण मावळे शिवरायांसाठी वेडे झाले. स्वराज्याच्या मंत्राने सगळ्यांनाच भारले होते. शिवरायांसाठी जगायचे आणि स्वराज्यासाठीच मरायचे असे ते मानू लागले होते. कारण हिरे माणसं शोधणे आणि त्यांना आपलेसे करणे ही तर शिवरायांची खासियतच! मावळखोऱ्यातील सत्तालोलुप देशमुख मंडळींना सकल मराठी मुलखाची गरज समजावून सांगितली.

मराठ्यांची शक्ती वा .या जात असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. एकेक मावळा स्वराज्याच्या ध्येयाने कसा झपाटलेला आहे आणि तुम्ही काय करताय हे शिवरायांनी ह्या वतनदारांना पटवून दिले. आपापसांतील वैरभाव संपुष्टात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. दांडगाई करणाऱ्या देशमुखांना सरळ केले. अशा रीतीने बारा मावळखोऱ्यांतील मावळ्यांची फौज उभी राहिली. स्वराज्य आता जगण्याची गरज बनली. स्वराज्याला एक नवी भाषा हवी होती. आपली एक राजमुद्रा हवी होती. दुसऱ्या धर्माचा द्वेष न करणारा स्वतःचा कल्याणकारी धर्मही हवा होता. शिवरायांच्या मनातले हे स्वराज्याचे नितीधोरण मावळ्यांच्या लक्षात आले. लोककल्याणकारी राज्य निर्मितीसाठी स्वराज्याचे तोरण लवकरच बांधायचे आहे हे मावळ्यांनी हेरले.

मावळ्यांसाठी स्वराज्यनिर्मितीचे कार्य सहज सोपे कदापिही नव्हते. ते अनेक संकटांनी भरलेले होते. हा मार्ग अत्यंत खडतर होता. त्याकाळी महाराष्ट्रावर दिल्लीचा मुघल बादशहा, विजापूरचा आदिलशहा, गोव्याचे पोर्तुगीज आणि जंजिऱ्याचे सिद्दी यांची हुकुमत होती. यांच्या जोखडातून महाराष्ट्राला मुक्त करायचे होते. यांचा दराराच अधिक भयंकर होता. या सत्तांच्या विरोधात उभे राहण्याची काय तोंडातून साधे ‘ब्र’ काढायची कुणाचीही हिम्मत नव्हती. ती हिंमत शिवरायांनी आणि मावळ्यांनी केली होती.

बळ कमी होते पण निश्चय अढळ होता. सर्वप्रथम स्वराज्याला किल्यांची आवश्यकता होती. किल्ले नसतील तर स्वराज्य कसे असणार? अशी परिस्थिती त्या काळी होती. ज्याच्याकडे किल्ला त्याची सत्ता हेच समीकरण होते. त्यामुळे स्वराज्यासाठी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. तोरणा किल्ल्यापासून १५ किलोमीटर अंतरावर पूर्व दिशेला मुरुंबदेवाचा डोंगर आहे. इथे एक किल्ला होता. तो स्वराज्यात आला आणि स्वराज्याची राजधानी म्हणून सजला. त्यानंतर कोंढाणा, पुरंदर, रोहिडा असे बारा मावळातील किल्ल्यामागून किल्ले स्वराज्यात आले. जावळीवर विजय मिळवला रायरीचा प्रचंड किल्लाही स्वराज्यात आला. त्याचे नाव रायगड ठेवले तर त्याच्या जवळच भोरप्या डोंगरावर प्रतापगड बांधला. स्वराज्याची घोडदौड सुरू होती कारण मावळे आपले रक्त आटवीत होते. मराठा सरदारच या घोडदौडीत आडवे येत होते पण शिवरायांच्या बुद्धीचातुर्याने आणि मावळ्यांच्या साथीने त्यांचा बंदोबस्त केला गेला.

स्वराज्यावर पहिले संकट अफजलखानाच्या रुपाने आले. तो स्वराज्य मातीमोल करण्यासाठी आला होता पण शिवरायांनी त्याचा कोथळाच बाहेर काढला. एकवेळ शिवरायांना वाटले की, आपले काही खरे नाही. पण ते डगमगले नाहीत. भेटीच्या वेळी शामियान्यात अफजलखानाकडून दगा फटका झाला. कृष्णाजी भास्करला ठार केल्यानंतर बडा सय्यद आला. त्याचा वार अंगावर झेलत जिवा महालाने सय्यदला जागच्या जागी ठार केले. त्यावेळी जिवा नसता तर स्वराज्याचा खेळ केव्हाच संपुष्टात आला असता. या संघर्षात संभाजी कावजी यांनी मोठा पराक्रम केला. खानाच्या फौजेची मावळ्यांनी दाणादाण उडविली.

अफजलखानाच्या वधामुळे विजापुरात हाहाकार उडाला. त्यानंतर पन्हाळगड घेतल्यावर तर आदिलशहा भयंकर चिडला. स्वराज्याचा निःपात करण्यासाठी मोठी फौज घेऊन चालून आला. पन्हाळगडाला वेढा पडला. शिवराय यातून शिताफीने निसटले पण शिवा काशीदने शिवरायांसाठी स्वराज्यासाठी स्वबलिदान दिले. यावेळी बाजीप्रभू देशपांडे यांनी शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत झुंज दिली आणि घोडखिंड ही पावनखिंड केली. त्यांच्यासोबतच्या मावळ्यांनीही शौर्याची शर्थ केली. तगडी झुंज दिली. पुढे शायिस्ताखानाने पुरंदरला वेढा दिला पण भीमथडी तट्टावर बसणाऱ्या चपळ आणि काटक मावळ्यांनी आपल्या गनिमी काव्याने शायिस्ताखानाच्या सैन्याला हैराण केले. त्याने वेढा उठवला तरी तो पुण्याच्या लाल महालात तळ ठोकून बसला. निवडक मावळ्यांच्या साथीने त्याची तीन बोटे छाटून मुघल सत्तेला पहिला तडाखा शिवरायांनी दिला.

शायिस्ताखानाची खोड मोडल्यानंतर मावळ्यांनी सुरत लुटली. त्यामुळे बादशहा प्रचंड चिडला. त्याने स्वराज्य नष्ट करण्यासाठी त्याने मिर्झा राजे जयसिंग यांना पाठवले. पुरंदरला मुघलांचा वेढा पडला. दिलेरखानाने उघड उघड युद्ध पुकारले. याप्रसंगी मुरारबाजी देशपांडे यांनी अतुलनीय पराक्रम गाजवला.

.कोणत्याही आमिषाला बळी मुरारबाजींनी निकराची झुंज दिली. मिर्झा राजे जयसिंगाचे मन वळवण्याचा प्रयत्न केला गेला पण शेवटी पुरंदरचा तह झाला. या तहानुसार गफलतीने राजेंना नजरकैदेत ठेवण्यात आले. आग्र्याहून यशस्वी सुटका झाली. यावेळी हिरोजी फर्जंद व मदारी मेहतर यांनी महाराजांना कैदेतून सोडविण्याच्या कामी या दोघांनी जीवावर उदार होऊन मोलाचे योगदान दिले.

 

उदयभान हे एक स्वराज्यावरचे मोठे संकट होते. लग्न असतांनाही कोंढाणा किल्ला घेण्यासाठी आणि उदयभानाचा निःपात करण्यासाठी तानाजीने आपले सर्वस्व पणाला लावले. सुर्याजीने गड जिंकून घेतला पण सिंह गेला. यावेळीही मावळ्यांनी पराक्रमाची शिकस्त केली. स्वराज्यनिर्मितीचे स्वप्न या नरवीर मावळ्यांनी पूर्णत्वास नेले. महार, मांग, रामोशी, वडार, सुतार, लोहार, साळी, माळी, कोळी, तेली आदी अठरापगड जाती आणि बलुतेदारांतील मावळे राजेंच्या सैन्यात होते. एवढेच नव्हे तर
महाराजांच्या नौसेनेची धुरा दर्यासारंग या मुस्लीम सरदाराच्या हाती होती. दर्यासारंग यांनी इंग्रज नौसेनेला अनेकवेळा पराभवाची चव दाखवत आपल्या शौर्याने स्वराज्य वाढीस हातभार लावला होता.

शिवरायांच्या नौसेनेत बहुसंख्य प्रमाणात सिद्दी मुस्लीम आणि मच्छिमार लोक होते. महाराज हे कायम आपले सैन्य प्रगतशील बनवण्यासाठी तत्पर होते त्यासाठी त्यांनी शस्त्रागाराची निर्मिती करत त्याची कमान इब्राहिम खान यांच्या हातात दिली होती. महाराजांच्या शस्त्रागारातील बहुसंख्य सैनिक हे मुस्लीम धर्मातील होते. शिवरायांनी गुप्तहेर खात्याच्या मदतीवरच अनेक मोहिमांमध्ये यश संपादन केले होते.

त्यात गुप्तहेर प्रकरणांचे सचिव हे मुस्लीम मौलाना हैदर अली हे होते. अफजलखान भेटीस जाताना शिवाजी महाराजांनी आपल्या तीन अंगरक्षकांना संरक्षणास ठेवले होते त्यात शिवाजी महाराज यांचा अंगरक्षक सिद्दी इब्राहीम सुद्धा होते. वाघनखे सुद्धा रुस्तमे जमाने यांनीच शिवरायांना बनवून दिलेली होती. तसेच सिद्दी हिलाल, दर्यासारंग, दौलत खान, काझी हैदर, सिद्दी वाहवह, नूरखान बेग, श्यामाद खान, हस्सन खान मियानी, सुलतान खान, दाऊद खान यांसारखे बरेचजण सैन्यातील मुस्लीम सरदार होते. शिवरायांनी आणि मावळ्यांनी सैन्यात कोणताही जातीभेद आणि धर्मभेद मानला नाही. शेतकऱ्यांच्या शेतीतील पिकांच्या देठालाही हात न लावण्याची सक्त ताकीद मावळ्यांना होती. आया बहिणींची आबरु सांभाळण्याचे धडेच महाराजांनी दिले. राज्य कसे लोककल्याणकारी झाले पाहिजे याचा वस्तुपाठच अनेकवेळा महाराजांनी आणि जिजाऊंनी घालून दिलेला होता. स्वराज्यातील सर्व नियम, कानून कायदे सर्व मावळ्यांनी ते शिरसावंद्य मानले. म्हणून आपल्या माणसांचे स्वराज्य निर्माण झाले. यात अनेक ज्ञात अज्ञातांचे अमूल्य योगदान आहे, हे नाकारता येत नाही. शिवरायांचा सबंध इतिहास आजच्या तमाम भारतीयांना जगण्याचा आदर्शच आहे. तेव्हा जातीजातींत आणि धर्माधर्मांत उठसूठ या ना त्या कारणांनी तेढ किंवा विद्वेष निर्माण होणार नाही याची काळजी ह्या मराठी मुलखाने घेतली पाहिजे. मराठी स्वराज्य व्हावे ही मावळ्यांची इच्छा होती म्हणून आपण सर्वांनी हा महाराष्ट्र सतत प्रगतीशील राहो, सर्वचजण सुखी होवो अशी अपेक्षा करायला काय हरकत आहे?

– प्रज्ञाधर ढवळे, नांदेड
मो. 9890247953

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *