Post Views: 60
नांदेड – तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्राची धम्मदान व धम्मसंदेश यात्रा सर्व जिल्हा व शेजारील जिल्ह्यातील अनेक ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे. या यात्रेस भरभरून प्रतिसाद मिळत असून बौद्ध उपासक उपासिकांकडून भिख्खू संघाचे जोरदार स्वागत होत आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या तेराव्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेत येथील अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरू संघनायक भदंत पंय्याबोधी थेरो यांनी ‘इव्हिएम हटाव – संविधान बचाव’ चा नारा दिला. यावेळी झेन मास्टर सुदस्सन, भंते शिलभद्र, भंते सुमेध, भंते सुगत, भंते शिलधम्मो, भंते संघदीप, भंते शिलानंद, भंते संघशिल, भंते सुनंद, भंते सुप्रिय आदींची उपस्थिती होती.
धम्मदेसना देतांना भदंत पंय्याबोधी थेरो म्हणाले की, देशभरात होणाऱ्या निवडणूका या प्रामुख्याने इव्हिएमवर घेतल्या जातात. परंतु लोकांचा इव्हिएमवर विश्वास राहिलेला नाही. आपण बजावलेल्या मताधिकारावर गदा येत असल्याची लोकांमध्ये भावना आहे. यामुळे संविधानाच्या तत्वांची पायमल्ली होत आहे. हे लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे. परभणी जिल्ह्यातील पूर्णा येथे भरलेल्या २१ व्या धम्म परिषदेतही पंय्याबोधी यांनी उपदेश केला. या देशातील सरकार इव्हिएमचा गैरवापर करून देशात हुकुमशाही आणण्याच्या तयारीत आहे. यामुळे भारतीय संविधान धोक्यात येत आहे. देशभरातील संविधाननिष्ठ आंबेडकरी अनुयायांनी एकत्र येत येणाऱ्या निवडणुकांत इव्हिएम हटाव संविधान बचाव हा नारा देत सज्ज रहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.