आज मराठी राजभाषा गौरव दिन तेव्हा जगातील सर्व मराठी बोलणाऱ्या, मराठी भाषा जाणणाऱ्या माझ्या तमाम बंधू-भगिनींना मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
जगभरातील मराठी भाषकांकडून दर वर्षी मराठी साहित्यातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व, ज्ञानपिठ पुरस्कार विजेते, ज्येष्ठ साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 मध्ये झाला होता. यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधुन सर्वत्र “मराठी राजभाषा दिवस” साजरा केला जातो.
ज्या माय मराठीने आपल्यावर संस्काराचे आणि सांस्कृतिचे छत्र धरले, ज्या भाषेनं आपल्याला लहानाचं मोठं केलं, या बहुआयामी जगात स्वताः ला सिद्ध करण्याची धमक आपल्यामध्ये निर्माण केली, आपणाला व्यक्त होण्यासाठी जिने शब्दांची ताकद दिली. भावनीकतेचे बंध दिले. अश्या माय मराठी भाषे प्रती आज आदर व्यक्त करण्यासाठीचा हा दिवस आहे.
भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, हि समस्त मराठीजनाची मागणी आहे. ही मराठी असे आमुची मायबोली म्हणजे मराठी भाषा हि आपल्या साठी फक्त एक भाषा नसून ममतेचे ,वात्सल्याचे बोल आहेत. जसे आईचे बोल लेकरांसाठी हळुवार, प्रेमळ, असतात आणि वेळा प्रसंगी जी आई मुलांच्या भवितव्यासाठी कठोर शब्द हि बोलते तशीच हि आपली मराठी आहे. हळुवार, गोड़, लाघवी, प्रेमळ शब्दांनी सजणारी आणि वेळा प्रसंगी वज्राहूनी कठीण शब्दाने वार करणारी जिथे फक्त शब्दच सगळं काम करतात ,कुठल्याही शस्त्राची गरज मराठी शब्दांना लागत नाही. अशी हि माझी मायबोली मराठी भाषा आहे. या अश्या मराठी भाषेतून कुसुमाग्रज त्यांनी आपल्या असामान्य प्रतिभा आणि विलक्षण लेखन कौशल्य आणि शब्द सामर्थ्याच्या जोरावर साहित्याची निर्मिती केली.
अनेक सरस कथा, कादंबऱ्या, निबंध, लघुकथा, नाटक आणि कविता इत्यादींचे कुशल असे लेखन केले. नटसम्राट सारखे अजरामर नाटक त्यांच्या असामान्य प्रतिभेची ओळख पटवून देते तर कुसुमाग्रजांचे विशाखा हे काव्यसंग्रह भारतातील साहित्यातील त्यांचे उत्कृष्ट कार्य व आधुनिक मराठी काव्याचे कायमची भूषण ठरले आहे. त्यांच्या विशाखा काव्यसंग्रह आणि मराठी भाषेला दुसरा ज्ञानपीठ मिळवून दिला.
मराठी भाषेला अधिक संपन्न बनवण्याकरिता अनेक संत, कवी आणि साहित्यिकांनी अथक असे परिश्रम घेतले. मराठी भाषा ही अनेक संतांच्या किर्तन, भारुड,ओव्यां आणि भजनाने सजलेली आहे. ती अनेक मराठी साहित्यिकांच्या प्रतिभासंपन्न अशा लेखणीने समृद्ध संपन्न झालेली आहे. त्याच मराठी भाषेचा गौरव दिन आज आपण साजरा करीत आहोत. मराठी भाषा ही 1960 पासून राजभाषा म्हणून घोषित झाली. तेव्हापासून सर्व व्यवहार मराठी भाषेतून चालू लागला. आज मराठी भाषिक लोक संपूर्ण जगामध्ये पसरलेले आहे. जगामध्ये सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषेमध्ये मराठी भाषा ही दहाव्या क्रमांकावर आहे.
परंतु असे असतानाही अनेकदा मराठी भाषेच्या भविष्याबद्दल चिंता व्यक्त केली जाते. परंतु,आपण चिंता व्यक्त करत बसण्यापेक्षा मराठी भाषेचा विकास कसा करता येईल याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आपल्या पूर्वजांनी मराठी भाषेचा संपन्न वारसा आपल्याला दिला आहे. त्याचे आपण जतन केले पाहिजे.
यासाठी आपण सर्वांनी मराठी भाषेचा, शिक्षणाचा सन्मान केला पाहिजे. मराठीत वाचन, लेखन केले पाहिजे. मराठीतील ग्रंथ विकत घेऊन वाचले पाहिजे. दैनंदिन जीवनात तसेच आजच्या इंटरनेट युगात,समाज माध्यमावर मोठ्याप्रमाणावर मराठी भाषेचा उपयोग केला पाहिजे. मराठी भाषेच्या जास्तीत जास्त उपयोग करून संपूर्ण जगात मराठी भाषेचा झेंडा रोवूया, मराठी भाषेचा सन्मान हाच आपला सन्मान मराठी भाषेला अजरामर बनवूया.
रूचिरा बेटकर, नांदेड.
9970774211