नांदेड – आजचे जग विज्ञान तंत्रज्ञानाचे आहे, शालेय जीवनात विज्ञान विषयाचे अध्ययन अध्यापन करीत असताना प्रात्यक्षिक, प्रयोगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रयोगातून विद्यार्थ्यांच्या निरीक्षण शक्तीला वाव मिळतो, अनुमान काढता येते, बुद्धिमत्ता प्रगल्भ होते, तार्किक विचार करण्याची क्षमता विकसित होते. स्वयंनिर्णय क्षमता वाढते, विषयाचे शास्त्रीय ज्ञान प्राप्त होते. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त उद्याच्या भविष्यातील विद्यार्थी विज्ञान असावा या दृष्टीने शाळेमध्ये विविध उपक्रम राबवले जातात. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून जवळा देशमुख येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत ‘शिकू या प्रयोगातून विज्ञान!’ या मार्गदर्शक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्याध्यापक गंगाधर ढवळे, सहशिक्षक संतोष घटकार, आनंद गोडबोले, कविता गोडबोले, हैदर शेख, मनिषा पांचाळ, मारोती चक्रधर आदींची उपस्थिती होती.
महान भारतीय शास्त्रज्ञ डॉ. सी.व्ही. रमण यांनी केलेल्या रामन प्रभावाचा शोध साजरा करण्यासाठी दरवर्षी २८ फेब्रुवारी रोजी देशात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. या दरवर्षी हा दिवस वेगळ्या थीमने साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश विद्यार्थ्यांना विज्ञानाकडे प्रेरित करणे आणि सर्वसामान्यांना विज्ञान आणि वैज्ञानिक कामगिरीची जाणीव करून देणे हा आहे. या दिवशी शाळा, महाविद्यालयांमध्ये अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. जवळा देशमुख येथील विद्यार्थ्यांनी छोट्या छोट्या प्रयोगातून चला शिकू या प्रयोगातून विज्ञान या कार्यक्रमात सोनल गोडबोले, मयुरी गोडबोले, अनन्या टिमके, पंचशील गच्चे, पीरखाँ पठाण, प्रेम गोडबोले, गीतांजली गोडबोले, वैभवी शिखरे, कल्याणी शिखरे, योगेश मठपती, अक्षरा शिंदे, दीपाली गोडबोले, लक्ष्मण शिखरे या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
कोणते केले प्रयोग?
हवेला वजन असते, प्रकाशाचे परावर्तन, निर्धूर चूल, मातीतील घटक द्रव्ये, चेंडू व फळ खाली पडणे, कंगव्याला कागद चिकटणे, सोटमूळ व तंतुमूळ यांचा अभ्यास करणे, ज्वलनास हवेची आवश्यकता, धातूची उष्णता वाहकता, ध्वनीचे प्रसारण, चुंबकाची गंमत, हवेच्या दाबाचा परिणाम, पाण्याची घनता तपासणे, वनस्पतींमधील वहन व्यवस्था, अन्नभेसळ ओळखणे, प्रतिकर्षण व आकर्षण, उष्णतेचे अभिसरण यासंबंधीचे छोटे छोटे प्रयोग करून चिमुकल्यांनी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला.