Post Views: 151
नांदेड – जागतिक महिला दिनानिमित्त ८ मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत गावातील महिला शिक्षिका म्हणून अवतरल्या! शाळेचे मुख्याध्यापक गंगाधर ढवळे, सहशिक्षक संतोष घटकार, विषयशिक्षक संतोष अंबुलगेकर, उमाकांत बेंबडे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील सातही वर्गात जवळा दे. येथील सुशिक्षित महिला श्रावस्ती गच्चे, अक्षरा गोडबोले, शुभांगी गोडबोले, मुस्कान पठाण, साक्षी गोडबोले, कविता गोडबोले, साक्षी गच्चे यांनी शिक्षिका म्हणून सकाळच्या सत्रात
अध्यापनाचे कार्य केले. यानिमित्ताने ‘शाळेचा एक दिवस महिलांसाठी’ हा उपक्रम शाळेत राबविण्यात आला. यावेळी या शिक्षिकांना पुस्तक देऊन गौरविण्यात आले.
जागतिक महिला दिन दरवर्षी ८ मार्च रोजी साजरा करण्यात येतो. जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांनी याबाबत नियोजन करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते. वरिष्ठांच्या आदेशानुसार जवळा देशमुख येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत गावातील सुशिक्षित महिलांना संधी देत एक दिवस अध्यापन करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनास प्रतिसाद देत महिला दिनाचे औचित्य साधून शाळेस महाशिवरात्रीची सुट्टी असतांनाही काही महिलांनी पुढाकार घेत एक दिवस अध्यापन केले. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून हा कुतुहलाचाही विषय ठरला आहे.