आई हे विश्वाला कधीच न उलगडणारे कोडे आहे
असे म्हणले तर ते चुकीचे होणार नाही.कारण
भल्या भल्याना आई अर्थात जन्मदात्री समजली
नाही हे वास्तव नाकारता येत नाही तरी पण या पुस्तकाच्या माध्यमातून लेखकाने आईला समजून
घेण्याचा जो प्रयत्न केला आहे.तो निश्चितच स्वागतार्ह आहे हे प्रथम मान्य करायला हवे.
आई ही निर्मिकाची सर्वोत्तम देण आहे व आई भोवतीच संपूर्ण सजीवसृष्टी फिरत राहते आई
नसती तर या भुतलावर सजीव सृष्टीच शिल्लक
राहीली नसती.हेच निखळ सत्य आहे.आईला समजून घेण्याचा जो प्रयत्न आई समजून घेताना
या पुस्तकात पत्रकार साहित्यिक, लेखक, संपादक उत्तम कांबळे यांनी केला आहे.खरे तर त्याला दाद द्यावी लागेल.आई समजून घेताना या पुस्तकाची चर्चा साहित्य जगतात मोठ्या प्रमाणात होत आहे.
या पुस्तकाची तुलना रशियाचे जगप्रसिद्ध लेखक
म्यागझीम गोर्की व महाराष्ट्रातील ख्यातनाम साहित्यिक साने गुरुजी यांच्या आई या पुस्तकाशी
ह़ोत आहे खरे तर अशी तुलना करणे हे चुकीचे
आहे. आई समजून घेताना या पुस्तकाच्या लेखकानेही ते प्रांजळपणे कबूल केले आहे हे
पुस्तक वाचनीय आहे मिळाले तर वाचायला हवे
असे अनेक मित्रांनी सांगितले त्या मुळे एक वाचक
म्हणून पुस्तक वाचण्याची ओढ तर लागली होतीच पण पुस्तक मात्र मिळत नव्हते.मात्र ते कसे मिळवता याचा शोध मात्र चालूच होता.अनेक दिवसाच्या शोध मोहीमे नंतर माझे मित्र विद्रोही कवी एन.डी. राठोड यांनी हे पुस्तक उपलब्ध करून दिले.आणी ही शोध मोहीम एकदाची संपली..!!
खरे तर पुस्तक हातात पडुनही कामाच्या रगाड्यात घाईगडबडीत अनेक कारणांमुळे मुळे त्याचे वाचन करणे जमले नाही.मित्राचा पुस्तक परत करण्याचा तगादा मागे लागला.म्हणुन शेवटी आज एका दमात पुस्तक वाचून काढले..!!
पुस्तक खरोखरच वाचनीय तर आहेच पण मला
असे वाटते की एका अर्थाने हे पुस्तक म्हणजे लेखकाचे आत्मकथन आहे.त्यामुळे ते वाचकाला
शेवट पर्यंत खिळवून ठेवते.अतंरमुख करते विचार करायलाही भाग पाडते.असे म्हणले तर चुकीचे
होणार नाही.वाचकाला पुस्तक वाचताना आपण स्वतःच लेखकाच्या जागी आहोत व आपल्याच आईशी संवाद साधत आहोत असा भास होत राहतो.हेच या आत्मकथनाचे व लेखकाचे येश
आहे असे म्हणले तर चुकीचे होणार नाही..!!
खरे तर पुस्तक हातात पडल्यापासून ते वाचून
पुर्ण होई पर्यंत मला एकच प्रश्न पडला होता तो
म्हणजे आई समजून घेता येवू शकते का.?
पुस्तक पुर्ण वाचुन झाले आई काही समजलीच नाही.मग ती उत्तम कांबळेची असो की आणखी
कूणाचीही असो आई ही आईच असते मला असे वाटते की आई समजून घेण्याची नव्हे तर तीला
जमलच तर तिच्यात एकरुप होण्याची गरज आहे
स्वतः बरोबरच तीच्या सभोवताली असलेल्या विश्वाला समजून गरज आहे असे माझे हे स्पष्ट मत पुस्तक वाचून स्पष्ट मत बनले आहे..!!
पुस्तकात लेखकाने आईच्या स्वभावाचे वागण्याचे जे दाहक वास्तव मांडले आहे ते वाचताना वाचक
भारावून जातो एवढेच नव्हे तर वाचक आपल्या
डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रुंना तो थोपवू शकत
नाही वास्तव नाकारता येत नाही.यावरुनच या
पुस्तकाचे मोठेपण सिध्द होते त्याचाच परिणाम म्हणूनच या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत एवढेच नव्हे तर पुस्तकाचे इतर भाषेतही भाषांतर झाले आहे.लेखकाच्या आईचे नाव
ईंलंदा आसले तरी लेखक आपल्या आईला आक्का या नावाने संबोधीत असतो.लेखकाने आपल्या बालपणा पासून ते तरुणपणा पर्यंतच्या अनेक घटना या पुस्तकात शब्दबद्ध करण्याचा जो प्रयत्न केला आहे त्यात जी सुसुत्रता ठेवली आहे
तोड नाही नाही लेखक आपल्या बालपणीच्या शाळेतील आठवणी जागवताना म्हणतो की मी
शाळेत वर्गात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो ही बातमी आक्काला ज्या आनंदाने सांगत असतो पण
आक्काला मात्र त्याचा विशेष आनंद झालेला
मला दिसला नाही.पण ज्या वेळी ते ऐकून आक्का लेखकाला म्हणते जा आणि साखरेच्या डब्यातील चिमुटभर साखर खा कारण उरलेल्या साखरेत
एक वेळेचा कुटुंबातील ईतर सदस्यासाठी चहा
होवू शकतो.
घरात दुसरी साखर नसते.कुटुंबाच्या गरीबीच्या परिस्थिती मुळे विकत घ्यायला पैसेही राहायचे नाहीत याचे भान आक्काला असते.हे कुटुंबाच अर्थशास्त्र घरातील फक्त कर्ती स्त्रीच समजू शकते.
याच वास्तविक भान आक्काने आपल्या कृतीतून दाखवून दिले होते.असे म्हणले तर फारसे वावगे
होणार नाही..!!
आणखी एक प्रसंग कथन करताना लेखक नमुद करतो की आक्का रोज मजूरीने दुसऱ्याच्या शेतात काम करायला जायची अधुनमधून शाळेला सुट्टी
असली की लेखकही आक्का बरोबर शेतात जात असे.त्या काळी मजुरी पण अल्प प्रमाणात मिळत
असायची म्हणून अनेकदा मजुर सांयकाळी काम
संपवून घरी परतत असताना शिवारात, शेतात
कोणी नाही हे पाहून भुरट्या चोर्या करायचे खरे
तर त्याला चोरी म्हणने चुकीचे आहे.तसा तो काही
फार मोठा गुन्हा नसायचा व हे सर्व मजुर मंडळी
गरजेपोटी करायची त्यात शेतकरयांना पण फारसे
वावगे वाटत नसायचे कारण असे प्रकार नेहमीच
घडत असत.चोरी करताना कोणी सापडले तर
शेतकरी चार दोन शिव्या हासाडायचा क्वचित प्रसंगी थोबाडीत मारायचा.पण असे तिथेच असे
प्रकार संपायचे.असाच एक प्रसंग लेखकाने
पुस्तकात सांगितला आहे लेखकाला आक्का
रस्तयावर थांबवुन शेतकरयांच्या शेतातील थोड्या
शेंगाची चोरी करते व लेखक रस्त्यावर कोणी
आक्काला चोरी करताना पाहनार नाही या कडे लक्ष ठेवून ठेवून असतो आक्का थोड्याशा शेंगा आपल्या ओटीत घेवून येते व दोघेही घराची वाट
चालू लागतात.
लेखक आक्काला शेंगा खायला मागत असतो.
पण आक्का त्याला घरी गेल्यावर देते असं म्हणते.
लेखकाला राहवत नाही तो आक्काला म्हणतो
मला तू शेंगांची चोरी करू देत नाहीस व चोरी
केलेल्या शेंगा खायला मागत असतो आक्का घरी गेल्यावर देते असं म्हणत असते खरे तर रस्त्याने
शेंगा खाताना कुणी पाहिले तर चोरी उघडकीस
येईल अशी भिती आक्काला वाटत असते म्हणून
ती घरी गेल्यावर देते अस म्हणत असते पण ते
लेखकाच्या लक्षात येत नाही.लेखक आक्काला
म्हणतो तु मला चोरी करु देत नाहीस व तु चोरी
केलेल्या शेंगा मला देत नाहीस त्या वेळी आक्का
लेखकाला म्हणते भडव्या तु चोरी करायला शिकण्या एवजी शाळेत लिहायला वाचायला शिक.
आपल्या लेकराला भविष्यात कुणी चोर म्हणून
हिनवु नये याची जणू दक्षताच ती घेत आसते.हे फक्त आईच करूच शकते.जगातील कुठल्याच आईला आपल मुल चोर व्हाव अस वाटत नाही .
आपली मूल शिक्षण घेवून मोठ व्हावीत समाजात प्रतिष्ठीत माणूस म्हणून ओळखली जावीत असच
वाटत असतं हाच संदेश आपल्या कृतीतून आक्का
देते या पेक्षा मानवी जीवनातल मोठ तत्वज्ञान दुसरं असूच शकत नाही.अस मला वाचक म्हणून वाटत.
पुढे जसजसे दिवस जात राहतात तसे तसे लेखक
ही महाविद्यालयीन शिक्षणासाठी गाव सोडून शहरात जातो.आक्का मात्र गावातच राहते.जमेल
तसा परिस्थितीचा सामना करत.लेखकाला दुसरा
एक भाऊ आणि दोन बहिणी आसतात आक्काला
आता मुलीच्या लग्नाची चिंता लागलेली असते.
लेखकाचे वडील लेखक त्याना आण्णा या नावाने
संबंधित आसतो आण्णा मिलिटरीच्या नोकरीतून
निवृत्त झालेले असतात.व पुढे ते व्यसनाधीन बनतात म्हणून कुटुंबावरची सर्व जबाबदारी
आक्काच्या खांद्यावर येवून वर पडते ती त्याला समर्थपणे सांभाळत कुटुंबाचा गाडा पुढे ओढीत
आसते.
पुर्वीच्या काळी मुलगी दहा बारा वर्षाची झाली की मुलीचे सर्रास लग्न लावले जात असे आक्काची मोठी मुलगी ही आता दहा बारा वर्षाची झाली होती
घरात तीच्या लग्नाची चर्चा सुरू होती.लेखकाचा
या लग्नाला विरोध होता कारण तो बालविवाह
होता. लेखक आक्काला खूप समजावून सागंत
होता पण आक्का मात्र लेकीचे लग्न करण्याच्या
निर्णयावर ठाम होती मुलीचे वय वाढले की मुली थोराड दिसतात आपल्या समाजात सर्व लोक
याच वयात मुलीचे लग्न करतात मला समाजात राहायचे आहे तू देखील या समाजाचाच भाग आहेस हे आक्का लेखकाला पटवून देत असते लेखक ही त्यांच्या परीने असे करणे म्हणजे कायद्याने गुन्हा आहे हे परोपरीने पटवून देण्याचा प्रयत्न करतो मतभेद टोकाला जातात.शेवटी आक्का म्हणते तुझा कायदा तुझ्या बुकातच ठेव
तो तिथेच शोभून दिसतो.लेखक बहीणीसाठी वर शोधण्यासाठी ठामपणे नकार देतो आक्का
त्याला म्हणते ठिक आहे तुला जर बहीणीसाठी
वर शोधणे जमणार नसेल तर मग मलाच शोधावं
लागेल.लेखक शिक्षणासाठी कोल्हापूरला नीघुन
जातो आणि काही दिवसांतच आक्का पोस्टाने
लेखकाला बहीणीच्या लग्नाची पत्रिका पाठवते पत्रीका पाहताच लेखक अस्वस्थ होतो लग्नाला
सम्मती देण्या शिवाय तो काहीच करू शकत नाही
असेच दिवस पुढे ढकलत जातात एक दिवस
लेखकाचे वडील आण्णाचे निधन होते.भारतीय
समाज व्यवस्थेत कर्मकांडाला अनन्य साधारण महत्व दिले गेले आहे त्या वेळी जो प्रकार घडला
तो लेखकाने कथन केला आहे.वडील वारल्या
नंतर घरातील थोरला मुलगा त्यांना अग्नी देत
आसतो प्रथेप्रमाणे त्याचे मुंडन केले जाते त्याच्या
डोक्यावरील केस काढले जातात.सगे सोयरे
जाती बांधव गावातील लोक अंत्यविधीसाठी
उपस्थित राहतात काही कर्ती माणसं त्या वेळी पुढाकार घेऊन अंत्यविधी पार पाडतात त्यावेळी लेखकाला मुंडन करण्यास सांगितले जाते लेखक
मुंडन करण्यास साफ नकार देतो ही बातमी
आक्का पर्यंत पोहचते त्या वेळेस आक्का जे रौद्र
रुप दाखवते त्याने लेखक ही गोंधळून जातो.
आक्का लेखकाला म्हणते आर माझा डोगंरा
एवढा नवरा मेला अन तुझे केस काय घेऊन
बसलास चल ऊठ अन घे तुझे केस भादरुन
तुझे केस काही सोन्याचे लागुन गेले नाहीत.तेच्या
मुळच तु ह्या दुनियेत आलास हे ईसरू नगस असे ठणकावून सांगते या ऊपरही लेखक आपल्या
भुमिकेवर ठाम राहतो.या घटने वरून मला वाटते आपल्या समाज व्यवस्थेत पतिपत्नी या नात्याला
अनन्य साधारण महत्व आहे म्हणूनच आजही
आपल्या देशात विवाहसंस्था टिकून आहे.पती
आणि पत्नीचे नाते हे कुटुंब व्यवस्थेचा महत्त्वाचा
गाभा आहे हेच या वरुन सिध्द होते.
शेवटी शहाणी म्हणून घेणारी माणस प्रसंगावधान
बाळगून मार्ग काढतात व लेखकाच्या ऐवजी त्याच्या लहान भावाकडून आण्णांच्या अंत्यविधीचे
सोपस्कार, क्रियाकर्म पार पाडतात व अंत्यविधी
ऊरकला जातो.
या वेळी लेखकाच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात जी आक्का ऊठता बसता आपल्या
नवर्याला त्याच्या व्यसनाधीनते वरून रोजच
शिव्याची लाखोळी वाहत असते रोजच त्याच्या
हातचा मार खाते,तुझ एकदाचं मड बसू दे म्हणते
मेलास तर आमची तुझ्या जाचातून कायमची
मुक्तता होईल म्हणते तीच आक्का नवरा मेल्यावर
एवढी दु:खी कसे होते? आपल्या नवर्या साठी
शिकल्या सवरल्या मुलाचीही पर्वा न करता त्याला
कठोर पणे सुनावते.खरेच आक्काचे आण्णावर
आपल्या पेक्षाही जास्त प्रेम असते का.? अशीच
अनेक प्रश्नांची मालिका लेखकाचा मेंदू सुन्न करून
टाकते.यातच विवाह संस्थचे येश दडले आहे हे
मान्य करायला हवे.
पुढेही लेखकाने अनेक प्रसंग पुस्तकात लिहिले
आहेत ते सर्वच्या सर्व मांडणे शक्य नाही.तरी पण
काही प्रसंग टाळता येणार नाहीत.
असाच काळ पुढे सरकत राहतो.लेखक शिक्षण
संपवून पुढे नौकरी करु लागतो.समाजात प्रतिष्ठीत
व्यक्ती म्हणून नावारूपाला येतो.गाडी बंगला सर्व
भौतिक सुविधाही त्याला प्राप्त होतात.लग्न ही
होते मुले बाळे होतात.लेखक आपल्या पत्नीच्या पहिल्या डिलिव्हरीच्या वेळी आक्काला घरी कोणी तरी पत्नीची काळजी घेणार हक्काच माणूस असावं म्हणून गावाकडुन आपल्या सोबत घेऊन गेलेला असतो पत्नीचे डिलिव्हरीचे दिवस भरत आलेले असतात.आणी नेमके त्याच वेळी लेखक चित्रपट पाहण्यासाठी चित्रपट गृहात गेलेला असतो व घरी पत्नी डिलिव्हरी साठी दवाखान्यात दाखल होते.लेखक चित्रपट पाहण्यात मग्न असतो तोच डोअर किपर मोठमोठ्याने उत्तम कांबळेच नाव घेऊन ओरडत असतो आणि सांगत असतो की त्याच्या पत्नीला दवाखान्यात अडमिट केले आहे लेखक ते एकुण तातडीने चित्रपट गृहातुन बाहेर पडतो व घरी येऊन आक्काला सोबत घेऊन दवाखान्यात जातो पाहतो तर काय लेखकाच्या आधीच तिथे जेष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे उपस्थित असतात आणि संबंधित डाक्टराशी चर्चा करत असतात.लेखकाला व आक्काला आलेले पाहून त्यांच्याशी बोलून रावसाहेब कसबे आपल्या
कामाला निघून जातात.ईकडे आक्का मात्र मुलगा व्हावा म्हणून देवाला नवस बोलत असते त्यासाठी
तीने उपवासही धरला असतो थोड्या वेळातच आपरेशन थेटर मधुन नर्स बाहेर येते व मुलगी झाल्याचे सुचीत करते व आपल्या कामाला निघून जाते.मुलगी झाली म्हणून आक्का नाराजी व्यक्त करते लेखक आक्काला म्हणतो मुलगा काय
आणि मुलगी काय आपल्या साठी सारखेच.
आक्का लेखकाला म्हणते बहिणीच्या लग्नात
हुंडा देताना आपल्याला झालेला त्रास विसरलास वाटतय.तेवढ्यात डॉ येतात व लेखकाचे अभिनंदन करतात आणि आक्काला तुम्हाला नातू झाला म्हणून सांगतात.आताच तर ती नर्स बाई म्हणत होती मुलगी झालीय म्हणून आणि तुम्ही म्हणता मुलगा झाला डॉ नर्सला बोलावून घेतात आणि विचारतात तू आक्काला खोटं का बोललीस नर्स म्हणते नाही मी तर सहजपणे जिलेबी मागतीली .
डॉ नर्सला समज देतात आणि आक्काला तीच्या सोबत नातवंडाचे तोंड पाहून घ्या म्हणून आपरेशन थेटर मधे पाठवतात.लेखक ही बाळ बाळंतीण सुखरूप असल्याचे पाहून आनंदित होतो पूढे लेखक आपल्या पहिल्या मुलांचे नाव चार्वाक ठवतो.मला या घटना कृमाकडे पाहून असे वाटते
की यातून कार्यकर्ता आणि विचारवंत यांचे नाते
कसे असावे याचा धडाच कसबे सरांनी घालून
दिला आहे.तर आक्काच्या वर्तनातून मुलींच्या लग्नावेळी द्याव्या लागणाऱ्या हुंड्याची दाहकताच
समाजा समोर प्रकट झाली आहे.हाच बोध सर्वानी
घ्यायला हवा असे वाटते.
असाच हळूहळू कौटुंबिक गाडा पुढे पुढे सरकत राहतो कुटुंबाला बरे दिवस आलेले असतात सगळं ठीक असते लेखकाला आपल्या पुर्व परिस्थितीची
जाणीव असते.लेखकाला वाटते की आता तरी आक्काने
आक्काने सुखाने दोन घास खावेत.आपल्याकडेच
राहावे गावाकडे सारखे सारखे येत जात राहू नये वयाच्या मानाने दगदग धावपळ आता आक्काला झेपत नाही म्हणुन लेखक आक्काला आपल्या सोबतच नौकरीच्या गावी राहयचा आग्रह करत
आसतो पण आक्काचे तिथे मन लागत नाही खरे
शहरी संस्कृतीशी जुळवून घेणे अवघड जाते .
तरी पण आक्का जमेल तस नातवंडांच्या प्रेमा
पोटी आक्का जुळवून घेण्याचा आटोकाट प्रयत्न
करत असते एके दिवशी लेखकाच्या घरी काही मित्र मंडळी जेवायला येणार आसतात लेखक
घरी किलोभर मटण घेवुन येतो त्यावर आक्का सहजच प्रतिक्रिया व्यक्त करते की येवढ मटण खावून काय त्याच सोनं होणार हाय काय.? आक्काला आठवड्याला ऊपास करत असते ती लेखकाला ऊपासासाठी साबुदाण्या साठी पैशे
मागुन घेते लेखक तिला जवळ चिल्लर पैसे
नसल्यामुळे पन्नास रुपये देतो व आफीसला निघुन जातो दुसऱ्या आठवड्यांत ही असेच घडते तरी
पण लेखक काहीच न म्हणता पैसे देत असतो
उरलेले पैसे आक्का कधीच परत नसते असे नेहमीच घडत असते.आक्काची सुनबाई
पण कमावती असते आक्का याच कारणासाठी
सूनबाई कडून पण पैसे मागून घेत असते.शेवटी
लेखकाची सहनशीलता संपते लेखक आक्काला
विचारतो मी दर आठवड्याला तूला उपवासाचे
सामान आणण्यासाठी पैसे देतो उरलेले पैसे परत
पण मागत नाही तरी पण तू तुझ्या सूनबाई कडून
पण याच कारणासाठी पैसे घेत असतेस असे मला
समजले तू या पैशाचे काय करतेस.आक्का चिडते
व लेखकाला म्हणते मी काही मड्यावर बांधून
नेणार नाही तुम्हाला तर खडकुची अक्कल नाही
म्हणून ऊद्या भविष्यात तुझ्याच लेकराला उपयोगी
पडतील म्हणून साठवून ठेवते.
एकदा लेखक मुलाला गाडीत सोबत घेऊन बाहेर
फिरायला जातो रस्त्यावर चौकात डोंबाऱ्याचा
खेळ चालू असतो लेखक ड्रायव्हरला म्हणतो
गाडी रस्त्याच्या कडेला लाव आणि स्वतःसोबत
मुलाला घेऊन रस्त्यावर बसून डोंबाऱ्याचा खेळ
पाहत आसतो खेळ संपतो मात्र लेखकाचा मुलगा
तेवढ्याच वेळात खेळत खेळत दुसऱ्या बाजूला
जातो लेखकाला मुलगा दिसत नाही तो आणि
ड्रायव्हर खूप शोध घेतात तीनचार तास रास्त्यावर भटकतात पण मुलगा काही सापडत नाही.शेवटी
पोलिस स्टेशनमध्ये जावुन तक्रार नोंदवावी का?
या विचारा पर्यंत लेखक येतो तेवढ्यात समोरून
दोन तरुण चार्वाकचा हात धरून समोरून येताना
दिसतात लेखक ते दृश्य पाहून आनंदाने वेडा होतो
चार्वाकला छातीशी लावून कवटाळून घेतो.ते दोन
तरुण लेखकाला ओळख आसतात व सांगतात
हा मुलगा आम्हाला गाडगेबाबांच्या पुतळ्याजवळ
मीळाला त्याला घरचा पत्ता निपटणे सांगता येत
नव्हता म्हणून आम्ही याला पोलिस स्टेशनमध्ये
घेवून जात होतो शेवटी ते तरुण म्हणतात झाले
गेले विसरून जा या निमित्ताने आम्हाला तुमची
सेवा करायची संधी मिळाली हे आम्ही आमचे
भाग्य समजतो.शेवटी लेखक चार्वाकला घेऊन
घरी येतो चार्वाक आजीच्या गळ्यात पडून आपल्या
बोबड्या बोलीत आजीला मी हरवलो होतो असे
सांगतो.आणि घरात आक्काचा राडा सुरू होतो.
आक्का फरशीवर धाड धाड डोक आपटून घेते.
लेखकाला शिव्याचा सपाटा सुरू होतो तुझी अक्कल कुठे माती खायला गेली होती का.? तूला
स्वतःच्या मुलाला सांभाळता येत नाही तूला कोणी
संपादक की बिंपादक केला असे आकांडतांडव
घरात माजते नातवाला पदराखाली घेऊन आक्का
थेट घरा बाहेर पडते आणि त्याच्या वरून अंडी
ओवाळून नदीत टाकून नातवाला घेऊन घरी येते.
लेखक आक्काला म्हणतो अशा अंधश्रद्धा जपून
व देवावर विश्वास ठेवून काही होत नसते विश्वासच
ठेवायचा असेल तर माझ्यावर ठेव आक्का म्हणते
बघीतला की तुझ्या वर विश्वास ठेवून तू काय दिवे
लावलेस हेच पाहीले की आता.? लेखकाकडे
उत्तर नसते तो सरळ गाडीत बसून आफीसची
वाट धरतो.
असेच दिवस पुढे पुढे सरकत राहतात आक्का
नातू चार्वाकच्या बाल लीलात रमून जाते एकदा
आक्का नातू चार्वाकला सोबत घेवून घराशेजारच्या पोल्ट्री फार्म वर खाऊचा डब्बा घेवून जाते चार्वाक
कोंबड्या पाहुन आनंदीत होतो जाळीत हात घालून
कोंबड्याला स्पर्श करतो.आक्का त्याला डब्यातील
खाऊ खावू घालीत त्याच्या बाल लीलात रममाण
होते लेखक हे दृश्य पाहून खजील होतो पण त्या
कडे नजर अंदाज करतो दुसऱ्या दिवशी आक्का
चार्वाकला सोबत घेऊन घराजवळच्या ईंग्रजी
शाळेच्या गेटवरील वाचमनला बोलताना दिसते.
लेखकाला आक्काचा या दोन्ही घटना मूळे राग
आलेला आसतो तो घरी जाऊन मनातला सगळा राग बायकोवर काढतो व या गोष्टी मुळे आपल्या
प्रतिष्ठेला शोभत नाहीत असे सुनावतो लेखकाची
बायको लेखकाला म्हणते तुमचे म्हणणे बरोबर
आसले तरी मी आत्याला म्हणजेच आक्काला
काहीच बोलू शकत नाही.थोड्या वेळाने आक्का
चार्वाकला घेऊन घरी येते लेखक रागाने आधीच
धुमसत असतो आक्काला पाहून तो म्हणतो की
आक्का तू हा काय तमाशा लावला आहेस तूला
कळत कसं नाही की तू एका संपादकाची आई
आहेस? आक्का विचारते काय झाले.? लेखक
म्हणतो तु चार्वाकला घेऊन पोल्ट्री फार्म कशाला
गेली होतीस, शाळेच्या गेटवर जावून वाचमनला
काय बोलत होतीस.आक्का लेखकाला म्हणते
काही नाही मी चार्वाकला तेला शाळा दाखवायची
आम्हाला आत जावू दे अशी विनवणी करत होते
मग तो काय म्हणाला? असा प्रतीप्रश्न लेखक आक्काला करतो आक्का म्हणते तो म्हणाला की
म्हातारे मला असे करता येणार नाही.लेखक म्हणतो मग तुला त्याच काहीच वाटल नाही का ?
त्यात काही वाटायच प्रश्नच कुठे येतो तो काहीच
चुकीचे बोलला नाही म्हातारीला म्हातारी मनल
तर त्यात चुकीचे काय.? राहीला प्रश्न पोल्ट्रीफार्मचा
चार्वाक कोंबड्याला पाहून कीती आनंदी झाला
होता तु एकदा त्याच्या सोबत जा म्हणजे तूला
कळेल.आणी या मधे मी संपादकाची आई आहे
अस काही माझ्या कपाळावर लिहिले नाही.बर
लिहिलेल आसल तरी ते त्या कोंबड्यांना कसं
कळणार की मी संपादकाची आई आहे म्हणून.
खरे तर आक्काचा हा बिनतोड सवाल म्हणजेच
आक्काच अर्थात आई हीच तत्वज्ञनी असल्याचे
सिध्द करून जात.ती या प्रसंगात खरोखरच माणसान वास्तववादी व बिनधास्तपणे जगाव
छोट्या छोट्या प्रसंगातून आनंद कसा मिळवावा
खोट्या प्रतिष्ठेच्या आहारी जावून आनंदा पासून
दूर जावू नये असंच सुचवत आसते जे एखाद्या
विचारवंताला, तत्त्ववेत्त्यालाही जमल नसत हीच
शिकवण आक्का आपल्या कृतीतून देत असते
ती कीती यथार्थ व वास्तववादी आसते हेच या
प्रसंगातून दिसून येते.
पुढे काळ जसा जसा आपली वाट चालू लागतो
तसे तसे दिवस पुढे सरकत जातात आक्का
आजारी पडते लेखक तिला दवाखान्यात घेऊन
जातो आक्काला टी.बी.झाल्याचे निदान होते
डॉ लेखकाला आशवस्त करतात ती औषधोपचारने
बरी होईल असे सांगतात लेखक ही बातमी आक्का
पासून लपवून ठेवतो.पण आक्काला त्याची कुण
कुण लागते व आक्का मला गावाकडे नेवून सोड
म्हणून लेखकाच्या मागे लागते आपल्या आजाराचा संसर्ग कुटुंबातील ईतर व्यक्तींना होणार नाही याची
खरे तर ती दक्षताच घेत असते.गावात आक्काच्या मालकीची एक दिड एकर जमीन आसते मला
तीथे दोन रुम बांधून निसर्गाच्या सान्निध्यात राहूयचे
आहे असे लेखकाला सूचवते.लेखक मात्र आक्का
चे एकुण घेत नसतो त्याला माहित असते की गावी
गेल्यावर आक्काला योग्य उपचार मिळणार नाहीत
शेवटी तडजोडी अंती आक्का तीच्या साठी स्वतंत्र
रुमची मागणी करते लेखक आक्काची मागणी
मान्य करतो.पण आक्काची वागणूक पुर्णपणे
बदलुन जाते आक्का आपल्या रुममध्ये कोणालाच
प्रवेश करु देत नाही.सर्वा सोबत मिळून जेवत नाही
नातवाला जवळ फिरकु देत नाही सवयी प्रमाणे
नातू आक्का कडे जायचा प्रयत्न करतो पण आक्का कठोरपणे त्याला झिडकारून लावते.
आणि अशातच गावाकडे राहत असलेल्या आक्का
च्या दुसऱ्या मुलांच्या मुलाचा म्हणजेच आक्काच्या
नातवाचा अपघातात मृत्यू होतो लेखकाला ही
बातमी आक्काला कशी सांगावी आसा प्रश्न पडतो
लेखक आक्काला घेऊन गावाकडे निघतो आक्का
च्या लक्षात येते की तीचा नातू अपघातात मृत्यू
पावला आहे आक्का आता मला जगुन काय करायचे आहे.? मी कुणासाठी आणि कशासाठी
जगू आसा प्रश्न उपस्थित करत एकच आंकात
करते अन हे आत्मकथन इथेच थांबते.!
हे पुस्तक पुर्ण वाचुन झाल्यावर एक वाचक म्हणून
मी या निष्कर्षाप्रत येतो की आई ही फक्त मायेचा
सागरच नाही अर्थशास्त्रज्ञ ,शिक्षणतज्ज्ञा बरोबरच
जगाला नैतिकता शिकवणारी, जगाच्या निर्मिती
बरोबरच त्याचे संरक्षण करणारी आदीशक्तीचे
रुप तर आहेच त्याचबरोबरच समाजा मधे सर्व सामान्य माणसाचे प्रश्न घेऊन लढणारे कारकर्ते व चळवळीनी समजून घेणयाची गरज आहे असे
वाटते लेखकाच्या वाट्याला आलेला संघर्ष ही
जन आंदोलनतील कार्यकर्त्यांना आपला वाटतो
हे वास्तव ठळकपणे दिसून येते.त्याची दाहकता
पाहता आई समजून घेणे ही माझ्या आकलन शक्तीच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे.
मी वाचक म्हणून प्रांजळपणे कबूल करतोकी मी
श्यामची आई वाचली,गोर्कीची आई पण वाचली
आज उत्तम कांबळेची आई वाचताना ती मला
सर्वाधिक भावली.कदाचित त्या मागे माझ्यातील
कार्यकर्ता अजुनही जिवंत असल्याचे लक्षण ही असु शकते.एवढेच नमूद करतो आणि माझ्या
लेखणीला विराम देतो.
सूनिल खंडाळीकर..
अहमदपूर जी.लातूर..
९०११८०४८२८.