छत्रपतींच्या जयघोषात नांदेडच्या गुरुद्वारा मैदानावर ‘शिवगर्जना’चा थाटात शुभारंभ · महानाट्याचा पहिल्या प्रयोगाला हजारोंची भरगच्च उपस्थिती · रविवारचा प्रयोग बरोबर सायं 6.30 ला सुरू होणार · प्रवेश निशुल्क : प्रथम येणाऱ्याला बैठक व्यवस्थेत प्रथम प्राधान्य

 

नांदेड, : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित शिवगर्जना या महानाट्याचा 9 मार्च पासून नांदेडच्या गुरुद्वारा मैदानावर छत्रपतींच्या जयघोषात थाटात शुभारंभ झाला. 250 पेक्षा अधिक कलाकारांचे समर्पित सादरीकरण आणि हजारो रसिक प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद अशी तीन तासांची मैफल मैदानावर रंगली राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय व नांदेड जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित महानाट्य शिवगर्जनाचा प्रयोग होत आहे.

 

9, 10 व 11 असे तीन दिवस गुरुद्वारा मैदान हिंगोली गेट रेल्वे हॉस्पिटल समोर दररोज 6:30 वाजता महानाट्याच्या प्रयोगाची सुरुवात झाली आहे. उद्या 10 मार्चचा प्रयोगाला बरोबर सायंकाळी 6.30 ला सुरू होणार आहे. प्रत्येक कुटुंबाने या महानाट्याचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. तत्पूर्वी, आ. बालाजी कल्याणकर, आ. राजेश पवार, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, नांदेड-वाघाळा महानगरपालिकेचे आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांच्यासह विविध मान्यवरांनी सायंकाळी 7 वाजता या महानाट्याची सुरुवात केली.

 

छत्रपती शिवाजी महाराजाच्या उदयापूर्वीची महाराष्ट्राची परिस्थिती, परकिय आक्रमणात पोळलेला महाराष्ट्र आणि छत्रपतीचा उदय होतानाची परिस्थिती. त्याकाळातील संस्कृती, लोकनाट्य, लोककला याची गुंफण करीत पुढे छत्रपतीच्या आयुष्यातील चित्तथरारक प्रसंगाचे लक्षवेधी सादरीकरण, ओघवते निवेदन, ध्वनी व प्रकाश व्यवस्था यामुळे रसिकांना हे महानाट्य खिळवून ठेवते. छत्रपती शिवाजी महाराजांची थेट घोड्यावरून मावळ्यांसह मैदानावरची लाईव्ह रपेट, घोड्यावरची चार मजली सेटवरची हृदयाचा ठोका चुकवणारी एन्ट्री, युद्धाचे प्रसंग चित्तथरारक होते. सलग तीन तास कोणताही मध्यांतर न घेता हा प्रयोग रसिकांना आकर्षित करून ठेवते. प्रत्येक कुटुंबाने बघावा असा हा नाट्यप्रयोग उद्या रविवारी व सोमवारी होणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *