कंधार :
गरोदर व स्तनदा मातांसह ३ वर्षांखालील मुलांसाठी एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत पोषण आहाराचा पुरवठा करण्यात येतो. तालुक्यातील गुंटुर येथील वस्तुस्थिती जाणून घेतली असता धक्कादायक बाब पुढे आली. ११ रोजी सोमवारी लाभार्थ्यांना दिला गेलेला पोषण आहारातील मुगदाळ ही अतिशय निष्कृष्ट दर्जाची व भेसळयुक्त असल्याचे पाहणीत दिसून आले.
मुलांना पोषण आहार मिळावा, शाळेची गोडी व ओढ लागावी म्हणून बालकांना अंगणवाडीच्या माध्यमातून या पोषण आहाराचा पुरवठा होतो. कंधार तालुक्यात फेडरेशनतर्फे आहार पुरवठा केला जातो. यात तांदूळ, गहू, मिरची पावडर, हळद, मूगडाळ, मीठ, साखर दिले जाते. बहुतांश अंगणवाडीत हा प्रकार आहे की नाही पण गुंटुर येथील अंगणवाडी ‘रिऑलिटी’ चेकमधून मूगदाळ ही निष्कृष्ट दर्जाची असल्याचे पुढे आले आहे. हा आहार आपल्या मुलांना कसा खाऊ घालू, असा सवाल तालुक्यातील लाभार्थ्याकडून केला जात आहे. काही वेळा हा पोषण आहार अतिशय निकृष्ट असल्याने काही लाभार्थी आहारात न वापरता जनावरांना खाऊ घालत असल्याचे बोलले जाते. ‘मुलं ही देवा घरची फुलं’ असे म्हटले जाते.
परंतु या मध्यमातून एक प्रकारे त्याच्या जिवाशी कशा प्रकारे खेळ खेळतात त्याचे हे एक जिवंत उदाहरण. अंगणवाड्यांना माल वितरित करण्यापूर्वी त्या मालाची प्रत्येक तालुकास्तरावर त्याची तपासणी करणे गरजेचे असताना त्याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करण्यात येत असल्याचे या सर्व गोष्टींवरून दिसून येत आहे. शिवाय या पाकिटावर एक्सपायरी डेट, मॅन्युफॅक्चरिंग डेट, बॅच नंबर आधी कोणतीही माहिती नमूद नसल्याचे दिसून आले.
शासनाच्या धोरणानुसार बालविकास प्रकल्प विभामार्फत अंगणवाडीला पोषण आहार दिला जातो. कुपोषण मुक्त आणि गरोदर माताना सकस आहार देण्याचा शासनाचा हा प्रयत्न आहे. मात्र, ग्रामीण भागात हा आहार गुरांच्या तोंडी जात असल्याच दिसून येत आहे. हा आहार निष्कृष्ट असल्याचा आरोप केला जात असून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी वाया जात आहे. ० ते ३ वर्षे वयोगटातील मुलांना महिन्याला आहार देण्याचा शासनाचा आदेश आहे. अंगणवाडीतून मिळत असलेला पोषण आहार निष्कृष्ट दर्जाचा असल्यामुळे लाभार्थी गुरांना खाऊ घालत आहेत. बालविकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीने तालुक्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांमध्ये पोषण आहार पुरविला जातो.
काही वर्षांपूवी अंगणवाडी मिळणारा पोषण आहार अतिशय दर्जेदार मानला जात होता. मात्र, अलिकडे पोषण आहार पुरवठा करण्याचे कंत्राट राजकीय संबंधातून दिले जाते. त्यातून गैरव्यवहाराचे प्रकार घडत आहेत. बालकांच्या आरोग्याची कुणालाही काळजी उरली नाही. सध्या पुरविण्यात येणारा आहार अत्यंत निष्कृष्ट दर्जाचा असल्याने मुले खात नाहीत.
—————
आहारातील मूगडाळ अत्यंत निष्कृष्ट दर्जाची असून, बालकांना अजिबात खाण्यायोग्य नाही. ही मूगडाळच आहे का हे ओळखणे दुरापास्त आहे. हे निष्कृष्ट आहार संबंधित अधिकारी- कर्मचारी आपल्या मुलांच्या जेवणात देतील का, हा प्रश्न पालक विचारत आहेत. या आहारात बालक सुदृढ तर सोडा, परंतु कुपोषित होण्याची शक्यता अधिक आहे. या संबंधीत बाबीकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे पालकांकडून बोलले जात आहे.
——–
गरोदर माता आणि तीन वर्षांपर्यंतची बालके यांचे मुळातच रोगप्रतिकारशक्ती कमी असते. अशा स्थितीत त्यांना पौष्टिक आहार मिळणे गरजेचे असते. शासनाकडून कुपोषण मुक्तीसाठी पोषण आहार वाटप मोहीम हाती घेतली आहे. परंतु अशा पद्धतीचा निकृष्ट आहार बालकांच्या अथवा गरोदर मातांच्या पोटात गेल्यास त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. अशा बाबींकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.