मुखेड : निसर्ग हा मानवाच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे.तो नव चैतन्याचे रुप आहे. तो आल्हाददायी असतो. एकांतवास म्हणजे निसर्ग. नैराश्य ग्रस्त व्यक्तीला सुख, शांती देतो. समाजाच्या विकासाचा पाया म्हणजे निसर्ग. निसर्गाला वगळून मानवच काय सृष्टीतील एकही सजीव जीवन जगू शकत नाही.असे असतानाही मानव स्वतःच्या भौतिक गरजांची पूर्तता करण्यासाठी निसर्गाची मोडतोड करून पर्यावरणाचा -हास करतो आहे. नदी,नाले,जंगल उध्वस्त करतो आहे. म्हणून पर्यावरणाचा समतोल ढासाळत आहे.असे चिंतनशील विचार प्रा. डॉ. केशव पाटील यांनी मांडले.
येथील शाहीर आण्णाभाऊ साठे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या ‘ युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास’ या विशेष वार्षिक शिबिरातून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा कार्यक्रमाधिकारी प्रा. संजीव डोईबळे तर व्यासपीठावर प्रा. एम. एस. सगरोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना डॉ. पाटील म्हणाले की, आपल्या आजूबाजूचा परिसर म्हणजे पर्यावरण. आपल्या सभोवताल जे हवा, पाणी, पशु ,पक्षी ,प्राणी ,कीटक, जमीन, वृक्ष, वेली, आकाश, ग्रह,तारे ,नदी, नाले, डोंगरदऱ्या ह्या सर्वांना मिळून आपण पर्यावरण असे म्हणतो. या सर्वांचा सजीवांच्या जीवनाशी कनिष्ठ संबंध असतो.
नव्हे आपले संपूर्ण जीवनच यावर अवलंबून असते. म्हणून आपण निसर्गाचे संवर्धन केले पाहिजे. सृष्टी ईश्वरनिर्मित असली तरी सृष्टीचे संगोपन करणे, मानवाचा धर्म आहे. मध्ययुगीन काळात निर्माण झालेल्या संत साहित्याने ही सृष्टीचे महत्त्व सांगितलेले आहे. संत ज्ञानदेवापासून संत तुकारामा पर्यंत लिहिलेल्या अभंग, ओवीतून निसर्ग ओसांडून वाहतो आहे. याप्रसंगी प्रा. एम. एस. सगरोळे यांनी काही कवितांचे गेयताबद्ध गायन केले. त्यांची बाप ही कविता ऐकून श्रोते मंत्रमुग्ध झाले. रसिक भाऊक झाला.अनेकांचे डोळे पाणावले. टाळ्यांच्या गजरात त्यांनी मनमुराद प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात प्रा. संजीव डोईबळे यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण विचार सांगितले. सूत्रसंचालन प्रदीप बोडके तर आभार अविनाश वल्लेपवार या विद्यार्थ्यांनी मांडले. कार्यक्रमास व्यंकट पांचाळ, प्रकाश राठोड, शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.