मुखेड :- राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असतो. अशा शिबिरातून विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध होत असल्यामुळे त्यांच्यात सभाधिटपणा येतो. शिबिराच्या माध्यमातून ग्राम- शहर स्वच्छता अभियान , मतदान जनजागृती , रस्ता सुरक्षा, व्यसनमुक्ती, पर्यावरण, जलसंवर्धन यासारखे अनेक राष्ट्रीय उपक्रम राबविले जातात. म्हणून यातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडत असते.
ते विकसित होत असते. अशा राष्ट्रीय प्रश्ना विषयी युवकांच्या मनात जागृती निर्माण होवून समाज घडविण्याचे ते कार्य करतात.असे महत्त्वपूर्ण विचार प्राचार्य डॉ. मनोहर तोटरे यांनी मांडले.
येथील शाहीर आण्णाभाऊ साठे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या ‘ युवकांचा ध्यास : ग्राम शहर विकास ‘ या विशेष वार्षिक शिबिराच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. विचारमंचावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा कार्यक्रमाधिकारी प्रा. संजीव डोईबळे तर प्रा. डॉ. केशव पाटील, प्रा. एम. एस. सगरोळे, प्रा. डॉ. सौ. अश्विनी बारसकर यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना प्राचार्य डॉ.मनोहर तोटरे म्हणाले की, आपण शिबिरार्थींनी या शिबिराच्या माध्यमातून वृक्षारोपण, अंधश्रद्धा निर्मूलन, पर्यावरण, गांडूळ खत निर्मिती, आपत्ती व्यवस्थापन, व्यक्तिमत्व विकास इत्यादी असे महत्त्वपूर्ण उपक्रम राबवून जे कार्य केले ते कौतुकास्पद आहे.
जनजागृतीच्या माध्यमातून आपण गावकऱ्यांना जी कृतिशील माहिती दिली ती नक्कीच गावकऱ्यांच्या स्मरणात राहील. तुमच्यामध्ये निर्माण झालेला आत्मविश्वासच तुम्हाला मोठे करतो. कोणतेही काम आपण निष्ठेने करावे म्हणजे ध्येय गाठता येईल. कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात उपप्राचार्य तथा कार्यक्रमाधिकारी प्रा. संजीव डोईबळे म्हणाले की गेल्या सात दिवसात या शिबिरात घेण्यात आलेल्या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी कृतिशील सहभाग अनेक उपक्रम राबवले. त्यांच्यातील आवड लक्षणीय होती. ते स्वतःची कामे स्वतः करून श्रमपरिहार, जनजागृती रॅली, बौद्धिक, सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होत होते. सात दिवसाच्या शिबिरातून विद्यार्थ्यांशी एक कौटुंबिक नाते निर्माण झाले. ही मुलं कायमस्वरूपी लक्षात राहणारी ठरली. शिबिरातील शिबिरार्थी श्रीकांत डोंगळे, सुमेध जोंधळे, कु. भाग्यश्री देवपूजे, नारायण गवळे , राजवैभव इंगोले, निखिल इंगोले, कु. चेतना तमशेट्टे, प्रकाश डोंगरे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव पाटील यांनी तर आभार नितीन पवार यांनी मांडले. कार्यक्रमास प्रकाश राठोड, व्यंकटी पांचाळ, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शिबिरार्थी विद्यार्थी ,विद्यार्थिनी व गावातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.