Post Views: 74
नांदेड – शालेय विद्यार्थ्यांनी दररोज पुरेसे पाणी प्यावे, या उद्देशाने राज्याच्या शिक्षण विभागाने सर्व शाळांमध्ये तीन वेळा ‘वॉटर बेल’ (पाणी पिण्याची घंटा) वाजविण्याचा अध्यादेश काढला होता. केरळ येथील एका शाळेने राबविलेला ‘वॉटर बेल’चा उपक्रम केरळ राज्यातील सर्व शाळांमध्ये राबविला. त्याचे चांगले परिणाम दिसून आल्याने महाराष्ट्रातील शाळांमध्ये सुद्धा वॉटर बेल व्हावी, अशी मागणी समोर आली होती. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा अध्यादेश प्रसिध्द केला. मात्र पुढील काळात प्रभावी अंमलबजावणी झाली नाही. आता जवळ्याच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने वाटरबेल ही संकल्पना वास्तवात आणली आहे. यासाठी मुख्याध्यापक गंगाधर ढवळे, विषयशिक्षक संतोष अंबुलगेकर, उमाकांत बेंबडे
सहशिक्षक संतोष घटकार हे मार्गदर्शन करीत असून यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशनराव गच्चे, सरपंच माधव पावडे, माजी सरपंच कमलताई शिखरे, साहेबराव शिखरे, माजी सरपंच कैलास गोडबोले, आनंद गोडबोले, हरिदास पांचाळ, हैदर शेख, मनिषा गच्चे, मारोती चक्रधर आदींची उपस्थिती होती.
उन्हाळ्यात तापमान वाढत असतांना शरीरातील पाण्याची कमतरता हे अनेक आजारांचे कारण बनते. अनेक विद्यार्थी पाण्याची बाटली तशीच परत आणत असल्याचे निदर्शनास आले आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे थकवा येणे, मुतखडा, चिडचिडेपणा वाढणे आदी त्रास होण्याची शक्यता असते. बरेचदा विद्यार्थी खेळण्याच्या नादात पाणी पिण्याचेच विसरून जातात. त्यांना पाणी पिण्याची आठवण करून देण्यासाठी शाळेत तीन वेळा वॉटर बेल वाजविली जात आहे. शाळेच्या वेळापत्रकात तीनवेळा वॉटर बेल वाजविण्याबाबत मुख्याध्यापक ढवळे यांनी वेळ निश्चित केली आहे. पुढील काळात विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची सवय लागेल. या वेळेत विद्यार्थ्यांना स्वच्छतागृह वापरण्याची मुभा देण्यात येत आहे. जवळ्यात पाणी पिण्याचे महत्व जाणून वॉटर बेल उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. सर्व विद्यार्थी शाळेच्या वेळेत नियोजनाप्रमाणे तीन वेळा पाणी पित आहेत. त्यासाठी ग्राम पंचायतीकडून शाळेत पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
जिल्ह्याचे तापमान ४० अंशावर गेले आहे. या पार्श्वभूमीवर सर्वप्रथम ही संकल्पना वास्तवात आणण्यासाठी शाळेतील शिक्षकांशी चर्चा केली. शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी आपल्यासमोर विद्यार्थी भरपूर पाणी पितील आणि पाण्याअभावी होणारे रोग कमी होतील या उद्देशाने सर्वांनी होकार दिला. त्यानुसार सकाळी १० वाजता पहिली घंटा वाजते तेव्हा सर्व विद्यार्थी प्रांगणात जमतात आणि पाणी पितात. असेच सकाळी ११.३० वा आणि शाळा सुटण्याच्या सुमारास दु. १.३० वा तिसऱ्यांदा पाणी पितात. या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होत विद्यार्थी आनंद घेत आहेत.
– मुख्याध्यापक गंगाधर ढवळे, जि.प.प्रा.शा. जवळा दे.