महात्मा फुलेंचे शैक्षणिक कार्य अविस्मरणीय…!11 एप्रिल जयंती विशेष (भाग 1)

 

 

स्त्री शिक्षण व अस्पृश्यांना माणुसकीचे हक्क मिळावे यासाठी त्यांनी अपूर्व लढा उभारला होता. बहुजन समाजाच्या दुःखाचे गरिबीचे व मानसिक गुलामगिरीचे कारण म्हणजे अविद्या आहे. अशी त्यांची दृढ भावना होती. बहुजन समाजाच्या उद्धारासाठी त्यांनी पुढाकार घेतल्यामुळे जनतेने त्यांना महात्मा ही पदवी दिली.-महात्मा ज्योतिबा फुलेंनी बहुजन समाजातील मुलांना शिक्षण देण्यासाठी आयुष्यभर तळमळीने कार्य केले. अंधारामध्ये वर्षानुवर्षे खितपत पडलेल्या लोकांना त्यांनी शिक्षणाची द्वारे खूले केली,एके ठिकाणी ते म्हणतात

“*विद्ये विना मती गेली*
*मती विना नीती गेली*
*नीती विना गती गेली*
*गती विना वित्त गेले*
*वित्ता विना शूद्र खचले*
*इतके अनर्थ एका अविद्यने केले*”. अस्पृश्यांच्या मुला -मुलींना शाळेत जाऊन शिकण्यास बंदी होती, म्हणून त्यांनी 1848 साली अस्पृश्यांच्या मुला- मुली साठी पुणे येथे पहिली शाळा काढली. तत्कालीन सनातनी लोकांनी महात्मा फुलेंना फार मोठा विरोध केला; शिक्षणाचे पवित्र कार्य करण्यास निघालेल्या पती-पत्नीला सनातनी लोकांनी त्रास दिला. तरीही त्यांनी मानवता वादातून मुलांना शिकवले. त्यामुळे बहुजन समाज शैक्षणिक दृष्ट्या प्रगल्भ झाला. खरोखर महात्मा ज्योतिबा फुले नसते तर आज बहुजन समाजाची आज काय अवस्था झाली असती ? हा विचार न केलेले बरा..! जो आपल्याला प्रत्यक्ष शिकवतो.ज्ञानाची जाणीव करून देतो तोच खरा महात्मा ,पंडित, आणि ज्ञानी होय.

असे मला खरोखर वाटते .
त्यांनी बहुजन समाजाच्या हातात वही आणि पेन दिला. त्यामुळे स्वाभिमान जागा झाल्या मुळे.आज हा समाज शिक्षणाच्या दृष्टीने पुढे पुढे पाऊल टाकत आहे.
त्यामुळे महात्मा फुलेंच्या विचारांचे स्मरण होणे आज गरजेचे आहे. ज्या काळात बहुजन समाजाला शिक्षणापासून दूर ठेवण्यात आले. सुशिक्षितांनी अज्ञानी लोकांचा फायदा करून घेऊ लागले. महिला जर शिकल्या तर नवऱ्याचे आयुष्य कमी होते; तसेच त्याच्या अन्नामध्ये अळ्या तयार होतात असा एक वाईट समज त्या काळामध्ये रूढ झाला होता. त्यावेळी या महान विचारवंतांनी बहुजन समाजाला जागृत करण्यासाठी शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवली
ज्या पालकांनी मुलींना शाळेत पाठवणार नाहीत.त्यांना एक रुपयाचा दंड सुद्धा ठोठावण्यात आला. शिक्षण हे सर्वांगीण सुधारण्याचे प्रवेशद्वार आहे हे त्यांनी दाखवून दिले. म्हणून बहुजन समाजाने महात्मा फुलेंचे विचार आज आत्मसात केले तर आपण आपले जीवन सुखकर जगू शकतो; म्हणून ब्राह्मणाचे कसब , तृतीय रत्न नाटक. सार्वजनिक सत्यधर्म, शेतकऱ्यांचा आसूड, गुलामगिरी हे पुस्तके लिहिली. सत्यशोधक समाजाची स्थापना त्यांनी करून बहुजन समाजा मध्ये असलेल्या वाईट रूढी. प्रथा, परंपरा बाजूला काढल्या आणि गोरगरीब, रंजलेल्या, गांजलेल्या अशा सर्वांना त्यांनी मायेचा आधार स्वतःच्या घरात दिला. त्यांच्यामध्ये शैक्षणिक परिवर्तन घडवून आणले. उच्चवर्णीय लोकांनी त्यांच्या वडिलांचे कान भरले. त्यामुळे गोविंदराव फुलेंनी सुनेला आणि मुलांला अक्षरश: घरातून बाहेर जाण्यास सांगितले. तरी त्यांनी शिक्षणाचा घेतलेला वसा सोडला नाही. त्यांच्या अंगावर मारेकरी पाठवून दिले.तरी ते डगमगले नाहीत, असे युगपुरुष कितीतरी वर्षांनी जन्माला येतात व मानव जातीचा व समाजाचा उद्धार करून अमर होतात .जो पर्यंत चंद्र, सूर्य ,तारे आहेत. तो पर्यंत त्यांचे विचार चिर:काल टिकणारे आहेत.
ब्रिटिशांनी सुद्धा त्यांच्या कार्याचे तोंड भरून कौतुक केले. त्यांचे
शैक्षणिक कार्य अजरामर झाले आहे.
प्रत्येक माणूस शिकावा असे त्यांचे प्रांजळ मत होते. म्हणून त्यांनी स्वतःच्या पत्नीला शिकविले .स्त्रियांचा त्यांनी सन्मान केला. पत्नीला शिकवल्यामुळे आज बहुजन समाजातील लाखो मुली शिक्षण शिकवून मोठमोठ्या पदावर विराजमान झालेल्या आहेत. याचे सर्व श्रेय महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना दिले जाते. त्या दोघां पती-पत्नींनी संपूर्ण हयात लोकांचा उद्धार करण्या साठी घालविले. सावित्रीबाई फुले यांच्या अंगावर शेण, माती ,चिखल समाजाने टाकले तरी त्या डगमगल्या नाहीत. म्हणून त्या आज देशातील पहिल्या मुख्याध्यापिका म्हणून ओळखल्या जातात. हे शिक्षणामधून तावूनसुलाखून पुढे आलेले व्यक्तिमत्व आहे .जर शिक्षण नसते तर आपण स्वाभिमानी झालो नसतो. आपली संस्कृती, सभ्यता ,शैक्षणिक परिवर्तन या गोष्टी मानवाला जीवन जगताना अतिशय महत्त्वाच्याअसतात.
ज्ञानाशिवाय मान येतच नाही. मानव हा विचार करणारा प्राणी आहे. तो सतत विचार करतो त्या विचाराच्या कृतीतून तो मोठा होतो. महात्मा फुले यांचे विचार खरोखरच आज समाजाला प्रेरणादायी, स्फूर्तिदायी आहेत. अंत:करणाला भिडणारे शब्द त्यांच्याकडे होते. ते मानवी मूल्या पासून थोडेही ढळले नाहीत ते एक प्रखर बुद्धिवादी ,मानवतावादी विचारवंत होते त्यांच्या कार्याचे मूल्यमापन करणे तसे अवघड आहे. त्यांच्या हयातीत त्यांच्याच कार्याचा इष्ट परिणाम त्यांना दिसून आला.

म्हणून महात्मा ज्योतिबा फुले एक प्रेरणास्थान , विचारशील कृतिशील महान व्यक्ती होते. समताधिष्ठित समाज निर्माण करण्याचे विचार त्यांच्याकडे होते.स्त्री शिक्षण, शेतकरी विकास, कामगार चळवळ, अस्पृश्यता निर्मूलन हे करण्यासाठी त्यांनी अनेक संस्था उभारल्या. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर .राजर्षी शाहू महाराज. कर्मवीर भाऊराव पाटील , यांना प्रेरणा देण्याचे कार्य त्यांनीच केले. आज ते आपल्याला दिशादर्शन करीत आहेत.सर्वधर्मसमभाव हा महत्त्वाचा राष्ट्रीय विचार त्यांनी रुजवला, परंतु आज पर्यंत भारत सरकारने त्यांना भारतरत्न पुरस्कार दिलेला नाही .याचा उलगडा केव्हा होईल हा महत्त्वाचा प्रश्न आजही निरूत्तरीत आहे. आजच्या तरुणांनी सर्व धर्म समभावाचे विचार आपल्या अंगी बाणवावेत. कसल्याही प्रकारचे व्यसन करू नये, जसे बोलले तसे चालावे ,समतावादी जीवन जगावे. सत्याच्या मार्गाने जावे .माणूस कोणत्या जातीचा आहे याला महत्व नसून त्याचे कर्म कसे आहेत ते महत्त्वाचे पहावे. तेव्हाच महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती केल्याचे आपल्याला समाधान मिळेल.
अशा या महान व्यक्तिमत्त्वाला जयंतीच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.

*प्रा.बरसमवाड विठ्ठल गणपत*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *