कोणताही सण समारंभ आपण सुख समृद्धी मिळावी म्हणून साजरा करतो. कोणतीही नवीन गोष्ट सुरू करण्या साठी साडेतीन मुहूर्त अतिशय पवित्र व शुभ मानले जातात. (त्यात गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा, दीपावली)
आपल्याला आर्थिक यशाची गुढी उभारण्यासाठी या मुहूर्ताचा उपयोग केला जातो. शुभ कार्य म्हणजे वाहन,सुवर्ण, सदन, जमीन -जुमला खरेदी करणे .भारतीय समाजात सण आणि उत्सवाला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. प्रत्येक सणाला गोडधोड करून ते साजरे केले जातात. काही सण वैज्ञानिक दृष्ट्या महत्त्वाचे आहे. मराठी वर्षाची सुरुवात गुढी उभारून पूजा करून घराघरात केली जाते. त्याची माहिती आज आपल्याला घ्यायची आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंबाची फांदी काठीला अडकवली जाते. मीठ,हिंग, मिरी, साखर इत्यादी वाटून खातात .त्यामुळे त्वचा रोग बरा होतो कडूनिंब हे आयुर्वेदामध्ये अतिशय महत्त्वाचे मानले आहे.
म्हणून कडुलिंबाची फांदी काठीला बांधली जाते. मानवी मणका म्हणजे काठी होय. ती मजबूत असावी कमकुवत नसावी असे संकेत आहेत.
मराठी महिन्याची सुरुवात चैत्र या महिन्यापासून होते. विजयाची प्रतीक म्हणून सर्वत्र गुढी ही सूर्योदयापूर्वी उभारले जाते. विजयाचे आणि आनंदाचे प्रतीक म्हणून मराठी वर्ष गुढी उभारून सर्वत्र साजरा करतात. त्यालाच गुढीपाडवा असे म्हणतात. काठीला साखरेची गाठ बांधली जाते साखरेमुळे गोडवा निर्माण होतो म्हणून त्या गाठी बांधल्या जातात. चैत्र महिन्यामध्ये श्रीराम नवमी, हनुमान जयंती असे महत्वाचे सण येतात. म्हणून हा महिना मंगलमय मानला जातो ;या महिन्यांमध्येच शालिवाहन शक कालगणना सुरू झाली असे आपण ऐकतो. जरीचा खण गुढीला बांधला जातो, कारण या खणामुळे आपली वैभवशाली परंपरा दिसून येते. आणि गुढीला शोभा येते. त्यासाठी ती बांधली जाते. असत्य गोष्टीवर सत्याचा विजय मिळवला जातो. म्हणून ही गुढी उभारली जाते. चैत्र शुद्ध प्रतिपदेला श्रीराम प्रभुने वाली या राक्षसाचा वध केला आणि त्याच्या छळापासून अनेक जणाला वाचविले. प्रभू श्रीराम लंकेवर विजय मिळवून अयोध्येला परत आले.तेव्हा चौदा वर्षाचा वनवास संपला. अयोध्या येथे गुढया उभारून प्रजाजनांनी श्रीरामाचे सर्वत्र स्वागत करण्यात आले.
तो दिवस गुढीपाडव्याचा होता. भगवान विष्णूनी मत्स्य रूप धारण करून शंकासुराचा वध केला तेव्हापासून विष्णूने हातात शंख धारण केले. याच दिवशी पंचांग वाचन करून सरस्वती मातेचे पूजन केले जाते. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तोच हा पवित्र दिवस आहे. असेही पौराणिक कथा सांगितल्या जातात. वैज्ञानिक दृष्टिकोनातून गुढीपाडवा हा चैत्र महिन्यात येतो. सूर्यकिरणाच्या लहरी जमिनीवर सर्वाधिक प्रमाणावर पडतात. गुढीवरचा उलटा घातलेला कलश वातावरणातील लहरी खेचून आणतो. याच महिन्यात शेतकरी आपल्या शेतीची नांगरट सुरू करतो आणि त्यामुळे सूर्यापासून मिळणारी उष्णता शेतीला मिळते. आणि पीक चांगलं येते. त्यामुळे हा दिवस पवित्र मानला गेलेला आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण सर्वांनी वाईट गोष्टी आपल्या मनातून बाहेर काढून टाकाव्यात .वाईटची शिक्षा वाईट लोकांना व्हावी. जीवन जगते वेळेस जीवनात अनेक चढउतार येत असतात. म्हणून कोणावरही रागावू नये. आपलं कार्य करीत रहावे. या मंगलमय सणापासून सर्वांनी बोध घ्यावा. त्यावेळेस हा सण साजरा केल्याचे सुख मिळेल .वर्षभर अनेक सण येतात. परंतु त्यातून आपण काय शिकलो हे सुद्धा अतिशय महत्त्वाचे आहे. चित्रा नक्षत्र याच महिन्यात येते म्हणून चैत्र हे नाव पडलेले आहे असे जाणकार लोक सांगतात. गुढीपाडव्याचा सण हा गोड आणि कडू यांना एकत्रित आणणारा आहे हे या ठिकाणी आपण समजून घ्यावे राग, द्वेष ,सूड अन्याय, अत्याचार, व्याभिचार या गोष्टी कडू आहेत, परोपकार, सद्भावना , मानवता, चांगले कर्म , इतरांना मदत करणे, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, तसेच त्या गोड आहेत म्हणून दोन्हींना एकत्रित आणणारा सण म्हणजे गुढीपाडवा होय.
असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही .शहरी व ग्रामीण भागात या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ग्रामीण भागामध्ये गुढीपाडव्या पासून नवीन वर्ष म्हणून साजरे केले जाते. नवनवीन गोष्टी घेतल्या जातात. गोडधोड जेवण करून नवीन पोशाख घालून हा सण साजरा केला जातो. काहीतरी संकल्प करून आपण आणखी सुधारणा करू असे ही म्हटले जाते. म्हणून प्रामाणिकपणाने तुम्ही तुमचा उद्योग, व्यवसाय, नोकरी करा. त्यातून आनंद मिळवा. कोणालाही फसू नका. कर्मानुसार फळ सर्वांना मिळत जाते. मानव प्रत्येक आयुष्यात त्यांनी केलेल्या कर्मावर त्याला फळ मिळते. प्रारब्धानुसार आपण जीवन जगतो. मोक्षप्राप्तीसाठी चांगलं कार्य करतो. त्यासाठी अशा सणाच्या निमित्ताने सर्वजण एकत्रित यावेत. शुभ गोष्टीवर चर्चा व्हावी. लहानांनी मोठ्यांच्या आशीर्वाद घ्यावा. गुढी उभारावी आणि जीवनाची वाटचाल चांगल्या रीतीने करावी. असे मला वाटते. समाजामध्ये संपत्ती अनेक जणांकडे आहे. परंतु सुख नाही. काहीजणाकडे सुख आहे परंतु संपत्ती नाही. प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या कारणामुळे दु:खी आहे.परंतु अशा सणाच्या निमित्ताने एकत्रित येऊन मुखात सुखाचे दोन घास घालून आनंदाने जीवन जगावे. यालाच जीवन असे म्हणतात. जीवन हा सुख आणि दु:खाने भरलेला हंडा आहे. असे आपण ऐकतो. म्हणून आपल्याला दिलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण पाडा. देशाबद्दल स्वाभिमान बाळगा. आई-वडिलांची, गुरुची सेवा करा. अन्नदान, मतदान करा .चुकीची अफवा पसरू नका. कर्ज काढून सहन करू नका . प्राणीमात्रावर दया करा .दिलेले वचन मोडू नका .आपले उत्पन्न पाहुन खर्च करा. आणि विजयाची गुढी उभी करा. प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात चांगले नाव कमवावे. कुकर्म करू नयेत. जगलेल्या आयुष्याच्या गुणवत्तेच्या आधारे प्रारब्ध ठरत असतात. आपल्या मानसिकतेत बदल करून घ्या. महिलांचा सन्मान करा. भौतिक सुखाच्या मागे न लागता चांगल्या जीवनशैलीचा आधार घ्या.
दैवी संपत्तीच्या मागे लागू नका. भौतिक संपत्ती श्रम करून मिळविता येते. त्यावेळेस समाज प्रगती करू शकतो. खऱ्या अर्थाने ऐश्वर्य संपन्नतेच्या मार्गाने आपली वाटचाल सुरू ठेवा. प्रयत्नांती परमेश्वर असे म्हटले जाते.
त्यामुळे तुम्हाला काही कमी पडणार नाही. त्यासाठी कार्य करणे अतिशय गरजेचे आहे .फक्त देवांची नावे घेऊन आपण मोठे होत नाही, तर कार्य करून मोठे व्हावे, तेव्हाच सण साजरे झाल्याचा आनंद उपभोक्ता येईल. संत चोखोबाच्या अभंगात टाळी वाजवावी गुढी उभारावी। वाट चालावी पंढरीची।। असे म्हटले आहे
.विठूमाऊली प्रतिष्ठान खैरकावाडी यांच्या वतीने गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
*प्रा. बरसमवाड विठ्ठल गणपत*