कंधार : प्रतिनिधी
महाराणा प्रताप चौक ते जाधव हॉस्पिटल पर्यंत शंभर फुटाचा रस्ता झाला पाहिजे यासाठी माजी सैनिक संघटना गेल्या अनेक महिन्यांपासून अंदोलन करत आहे.या संदर्भात जिल्हाधिकारी यांनी संबंधित अधिकारी यांची बैठक घेऊन हा विषय मार्गी लावण्याचे आदेश ही देण्यात आले.केवळ राजकीय द्ववेशापोटी संबंधित अधिकारी या रस्त्याच्या कामात टाळाटाळ करुन जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवुन कामत दिरंगाई करत आहेत.सध्या लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता असल्याने कोणतेही आंदोलन करता येत नसल्याने या संदर्भात माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुक्कलवाड यांनी घरी बसुन अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा प्रदेशीक सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयास निवेदनाद्वारे दिला आहे.
महाराणा प्रताप चौकातुन जाधव हॉस्पिटल पर्यंत जाणाऱ्या रस्ता हा तालुक्याचा मुख्य रस्ता आहे.हा रस्ता राज्य महामार्ग आहे.तालुक्याची वाढती लोकसंख्या व वाहातुकीची वर्दळ लक्षात घेता हा रस्ता शंभर फुटाचा झाला पाहिजे या उद्देशाने माजी सैनिक संघटना अनेक महिन्यांपासून अंदोलन करत आहे. परंतु हा रस्ता राजकीय पुढाऱ्यांना होऊ द्यायचा नसल्याने राजकीय पदाचा गैरवापर करुन संबंधित अधिकारी यांच्याकडुन चुकीच्या पद्धतीने वेगवेगळे शासकीय पत्र काढुन दिशाभुल करत आहेत.हे अधिकारी न्यायलायत एक व कार्यालयात एक बोलत आहेत.
हा रस्ता शंभर फुटाचा असल्याचे सर्व पुरावे असतानाही संबंधित अधिकारी आमदार, खासदार यांच्या ताटाखालचे मांजर झाले असल्याने कायद्याची विटंबना करत आहेत.जिल्हाधिकारी यांनी दोन तिन बैठका घेऊन आदेश दिले असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग चे अभियंता वेगवेगळे कारण सांगुन टाळाटाळ करत आहेत . त्यामुळे माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुक्कलवाड यांनी अन्नत्याग करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
या निवेदनात असे नमुद करण्यात आले आहे की,
कंधार शहरातील महाराणा प्रताप चौक ते जाधव हॉस्पिटलपर्यंत राज्य मार्ग 250 रस्त्याचे अतिक्रमण हटवून अंदाज पत्रकानुसार 100 फुटाचे करण्यात यावे यासाठी गेल्या कित्येक दिवसापासून माजी सैनिक संघटना आपल्या कार्यालयाकडे पाठपुरावा करत आहे पण आपल्या कार्यालयाकडून उचित कार्यवाही झाली नाही याविषयावर मा . जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली 2 बैठकी पार पडल्या त्या बैठकीमध्ये जिलाधिकारी यांनी 100 फुटाचा प्रस्ताव तथा लोकशाहीर आण्णाभाऊ साठे कॉम्प्लेक्स पुनर्रचना करण्याचा प्रस्ताव पाठवण्याचे आदेश दिले आहेत.
मात्र आपल्या कार्यालयाकडून हा प्रस्ताव पाठविला नाही .हा रस्ता 1961 पासूनचा राज्य मार्ग दर्जाचा आहे या रस्त्यावर 1993ला अतिक्रमण करून नगरपालिकेकडून ११ गाळे बांधण्यात आले तरी सार्वजनिक बांधकाम विभागाकडुन कुठलीच कार्यवाही झाली नाही.नगरपालिकेच्या डी.पी.प्लाॅन मध्ये हा रस्ता डी. पी. रोड़ नसून विद्यमान रस्ता दर्शवला आहे असे नांदेड नगर रचना कारानी लेखी पत्र दिले आहे.
2019 च्या जीआर नुसार हा रस्ता राज्य मार्गाचा आहे.असे असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाकडून कंधार शहराच्या विकासाची हत्या केली जात आहे. या रस्त्यांचा प्रस्ताव दिनांक 22 एप्रिल पर्यंत पाठवा अन्यथा पाताळगंगा येथील राहत्या घरी बसुन अन्नत्याग आंदोलन करण्या इशारा माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी रामप्रसाद चुक्कलवाड यांनी प्रदेशीक सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयास निवेदनाद्वारे दिला आहे.