भीमजयंती : क्रांतिकारी जबाबदारीची जाणीव

 
         महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस जगभरात भीमजयंती म्हणून साजरी केली जाते. भीमजयंती म्हणजे एखादा पारंपरिक सण किंवा उत्सव नाही. ती मानवी समुहाच्या जबाबदारीचीच जाणीव आहे. ही जाणीव जयंती साजरी करणाऱ्या किंवा सहभागी होणाऱ्या गटालाच असावी असे नाही. तर वैचारिक पातळीवर प्रबोधनाच्या प्रभावी भूमिका साकारणाऱ्या चिंतक, विचारवंत तथा अभ्यासकांसाठीही ही जाणीव महत्वाचीच आहे. कारण ही जबाबदारी सर्वसामान्यपणे आपल्या शिरावर येते तशी नव्हे तर ती क्रांतिकारी जबाबदारीची जाणीव आहे. त्यामुळे नाचगाण्याची मिरवणूक म्हणजे भीमजयंती नव्हे. प्रतिमापूजन करुन फोटोसत्र साजरे करणारेही नियोजन नव्हे. भीमजयंती म्हणजे आंबेडकरी समुहाशी ठेवण्यात येणारी सहानुभूती नव्हे. भीमजयंती म्हणजे आंबेडकरी चळवळीचा जाहिरनामा असणे आवश्यक आहे. भीमजयंती म्हणजे येणाऱ्या पिढ्यांना विचारधारेची प्रेरणा देणारी कार्यशाळा होय. आंबेडकरी विचारधारेसमोरील आव्हाने आणि त्यांची सोडवणूक ही माझी भीमजयंती झाली पाहिजे. अन्याय अत्याचाराविरोधात सतत पाय रोवून उभे राहण्याची सूर्यकुलीन उर्जा म्हणजे भीमजयंती. भीमजयंती म्हणजे विश्वकल्याणाचा विचार. बुद्धाकडे जाणारी पायवाट. अंधाराला पौर्णिमेत रुपांतरीत करणारी क्रांतिकारी पुनर्रचना म्हणजे भीमजयंती. आपल्या हक्कासाठी, अधिकारासाठी लढणाऱ्या योद्ध्यांसाठी आंबेडकरी समाजाची प्रेमाची शाबासकी म्हणजे भीमजयंती. अशा प्रकारचे युगांतराचे नियोजन म्हणजे भीमजयंती.
 
           एप्रिल महिना सुरू झाला की आपल्या अंगात येते. अंगावर रोमांच उभे राहतात आणि आपण उन्हातही सूर्यबिंबाकडे झेपावत राहतो. मग वर्गण्यांचे जुलुस निघतात आणि आपण मिरवणूकीचा मनोरा रचत जातो. १४ एप्रिल या सकाळपासून मध्यरात्र उलटून जाईपर्यंतच्या दिवसाचे नियोजन गल्लोगल्ली आणि गावोगावी सुरू असते. डोक्यावर नको डोक्यात घ्या म्हणणाऱ्या भाष्यकार आमची रेलचेल सुरू होते. कोणी राजकारणावर बोलतं कुणी खोलवर अभ्यासाच्या जोरावर अधिक चिंतनशिलतेचा परिणामकारक कार्यक्रम देतं. या सगळ्याच्या मागच्या बाजूला गेल्यावर्षीपेक्षा अधिक धांगडधिंगा करणारी युवकांची एक जमात सकाळीच जन्माला येते. यातील हरेक सदस्य मद्यधुंद अवस्थेत नाचण्याच्या, सतत डुलत राहण्याच्या किंवा ठेवण्याच्या क्षणांची गेली वर्षभर वाट पहात असतो. गावखेड्यांनी हीच मांडणी तिथल्या मंडळांनी करावी असे आवाहन करुन तशी अपेक्षा काळजात ठेवून अगदी काळजीपूर्वक त्या भीमजयंती साजरी करणाऱ्या गावाची वाट चालत राहणारी शेवटची तारीख तीस एप्रिल असते. याचेही नियोजन एक तारखेलाच होत असते. या मिरवणुकीत होणाऱ्या गर्दीने अशा लाभधारकांना त्यांना पाहिजे तसे लाभ दिले आहेत. बऱ्याचदा मिरवणुकीतील गर्दीचा आणि अंधाराचा फायदा घेऊन आपली मागील उणीदुणी काढण्याचीही संधी डोक्यावर घेऊन नाचणाऱ्या गर्दीने अनेकदा दिली आहे. मग ही भीमजयंती नाचून नाही तर वाचून साजरी करावी म्हणणाऱ्या व्याख्यात्यांचे पीक एप्रिल मे महिन्यात जोरदार उगवत राहते. 
 
            राजकीय क्षेत्रातील लोकांची भीमजयंती फार वेगळी असते. तशी ती खर्चिक असते आणि कार्यकर्ते सांभाळणारी पण असते. कारण ही आपली दुकानदारी नीट चालण्यासाठी आणि चालवण्यासाठी कार्यकर्त्यांचे सहकार्य, वार्ड प्रभागातील किंवा मतदारसंघातील लोकांचे चोचले पुरवण्यासाठी येणारी संधी असते. विरोधक किंवा प्रतिस्पर्धी यांच्या तुलनेने आपण अधिक सरस ठरलो पाहिजे यासाठी आटापिटा करून योग्य तो मंच आपल्यासाठी उपलब्ध व्हावा ही एक साधी आणि माफक अपेक्षा ठेवली जाते. अनेक वेळा राजकारणावर तोंडसुख घेणाऱ्या राजकीय विश्लेकांना मोठ्या प्रमाणावर समाजाने एकत्र येऊन बौद्धांच्या राजकारणाची दिशा बदलावी या त्यांच्या जुन्या विधानचर्चेची आठवण होऊ लागते. आपण आपल्या नेत्यांच्या राजकारणाला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या समाजकारणाला नेहमीच सलाम करीत आलो आहोत. त्यामुळे आपल्या नेत्याची भौगोलिक तथा बौद्धिक सीमारेषा हेच आपले विहारविश्व होऊन जाते. ही वैचारिक जाळ्यांचे जंजाळ डोक्यात तयार झाले की मग बाबासाहेबांच्या राजकीय पक्षाची, त्यांच्या राजकीय संहितेची आठवण होते. तशी ती अधूनमधूनही होतेच परंतु इतर राजकीय पक्षांच्या दावणीला आंबेडकरी समुहातील कार्यकर्ते नगरसेवक, जिल्हा परिषद वा पंचायत समिती सदस्य यापुढे जाऊन साहेबांनी महापौर, अध्यक्ष किंवा सभापतीत्व दिले तर आमच्या अख्या पिढीची बोळवणच होते. या संदर्भाने ऐक्यवादी साम्राज्याचे शिलेदार गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल हे ठणकावून सांगत असतात. 
 
            मोलमजुरी करणाऱ्या समुहाची भीमजयंती म्हणजे घराला सौंदर्याचा लेप लावून दारात भीमजन्माचा नगाडा वाजवणारी आणि वातावरण भीममय करणारी जयंती. आपले घर, विहार आणि परिसरावरुन केलेली विद्युत रोषणाई जयंतीचे सौंदर्य अधिकच खुलवते.‌ पुरणपोळी, शेवया किंवा बुंदी, लाडू, करंज्या, चिवडा ही ऐपतीप्रमाणे येणारी संपदा ताटभरुन आपल्या घरच्या सदस्यांच्या, नातेवाईकांच्या, पाहुण्यांच्या पुढे सरकवून समाधानाची दिवाळी साजरी जयंती. आपल्या विहारावरुन भोंग्यामार्फत घराच्या दिशेने येणारी गाणी वातावरणात भीमसुगंध दरवळत ठेवतात. गावभरुन मिरवणूक काढून समाधानाचा सुस्कारा सोडणारी मंडळे मिरवणुकीच्या समारोपाकडेही समाधानाने पाहतात. मात्र समकाळात शहरातील सुंदोपसुंदीची, मानापमानाची, मलाच मोठं म्हणा म्हणून कार्यक्रमाचा बेंग्या करणाऱ्या प्रवृत्तीची, वस्तुस्थिती बदलण्यासाठी अटोकाट प्रयत्न करणाऱ्या गटातटाची गावखेड्यालाही लागण झाली आहे. सकल आवास डीजे होणे आणि दारु पिऊन तर्र होणे ही मिरवणुकीची गरज बनली आहे. मुलांचे पोषाख आणि केशरचना किंवा लक्ष वेधून घेणारे पुंग्यांचे आवाज ही काही मिरवणुकीची वैशिष्ट्य बनली आहेत.
बाहेरून येणारी मंडळी तर खुन्नस काढतील किंवा गावची वतनदार मंडळी बाहेरच्यांची खुन्नस काढतील हे समन्यायी समीकरण बनलेले असते. ज्या गावांनी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यासाठी रक्ताच्या चुंबळी पिळल्या आहेत त्या इतिहासाची आठवण होणे गरजेचे असतांना थोड्याशा मौजमजेसाठी आपला लढा कुणाच्या विरोधात आहे हे आपण सोयिस्करपणे विसरतो.
 
              सामाजिक कार्यकर्त्यांच्या वर्गणीबाज टोळ्या काही प्रमाणात सामाजिक उपक्रम राबवून समाजाचा चेहरा होण्याचा प्रयत्न करतात. त्यांना राजकीय लोकांचे पाठबळ असतेच असे नाही. परंतु घर जाळून कोळसे करणारांचीही आपल्याकडे उणीव नाही. हे सामाजिक कार्यकर्ते राजकीय कार्यकर्त्यांचे जवळचे मित्र असतात. त्यांनी काही संविधानवर्धक नियोजनही केलेले असते. पण राजकीय क्षेत्राला झुकते माप नाही दिले तर मैत्रीचे संदर्भ संपुष्टात येतात. आम्हालाच मोठे स्टेज द्यावे आणि आमच्या बाजूला विरोधकांना बसवू नये ही त्यांची माफक अपेक्षा असते. हे सामाजिक कार्यकर्त्यांनी मान्य केले तरी ज्यांचा उद्देश समाजकारणाकडून राजकारणाकडे प्रवास करण्याचा असतो त्यांच्या डोक्यात सद्या काही नसते किंवा तसे दिसू दिले जात नाही. अशा सामाजिक कार्यकर्त्यांचे जसे राजकीय मित्र तसे साहित्यातीलही मित्र असतात.  सामाजिक कार्यकर्त्यांना भीम जयंतीच्या निमित्ताने का होईना मार्गदर्शन करण्याचा मोठेपणा लाभतो त्याचे या साहित्यिकांना पहिलीत पहिला आल्यासारखे मोठे समाधान लाभते. या संदर्भाने सशक्त सामाजिक कार्यकर्ते किंवा राजकीय पाठबळ असणारे कार्यकर्ते किंवा फक्त राजकीय कार्यकर्ते यांनी आजच्या भीम बुद्ध गीत गायन पार्ट्यांना म्हणजेच आॅर्केस्ट्रावाल्यांना अच्छे दिन दिले आहेत. सकाळच्या सडासारवण आणि रांगोळ्या ते रात्रीची आॅर्केस्ट्रा इतका सुटसुटीत हा भीमजयंतीचा कार्यक्रम असतो. व्याख्यानाला पाच पन्नास माणसांची ददात तर गाण्याबजावण्याला हजारो रसिकप्रेक्षकांची मोजदाद अशी असणारी परिस्थिती सगळीकडे आहे. एकूणच काय तर सामाजिक कार्यकर्त्यांची व्यक्ती गुणवैशिष्ट्ये अशी समाजापुढे येत असतात.
 
            आंबेडकरी समाजातील किंवा इतर काही आंबेडकरवादी कवी, साहित्यिक, चिंतक अभ्यासक यांना काहीतरी लिहावे, वाचावे वाटते किंवा लिहिलेले बोलावे वाटते. परंतु जयंतीचा हंगाम सुरू झाला की या साहित्यिक विचारवंतांचं पीक मोठ्या प्रमाणावर येते. काही बोलघेवडे साहित्यिक विचारवंत ‘व्याख्यान देणे आहे’च्या मोबाईल क्रमांकासह पाट्या लावतात. घरातच बसून शब्दांचा भुलभुलैय्या करणारे साहित्यिक काही कमी विचारवंत नसतात! परंतु रस्त्यावर उतरून व्यवस्थेला जाब विचारणारे कवी, साहित्यिक तथा विचारवंतांना क्रांतिकारी जबाबदारीची जाणीव ठेवूनच लिहणारे असतात.‌ दुसऱ्यांनीच आयोजित केलेल्या कार्यक्रमात जाऊन मोठमोठी भाषणे ठोकतात पण कृतीत शून्यच असतात. आधी रस्त्यावर उतरणारे व मग लिहिणारे साहित्यिक तसे कमीच असतात. आंबेडकरी असो की इतर समाजातील असो त्यांनी भाषणाने प्रबोधन होईल किंवा विचारपरिवर्तन होईल ही जमेची बाजू आहे.‌ बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली विचारधारा पुढे नेण्यासाठी काही वर्षांची गरज आहे. कारण अजूनही आमच्या मनातून आणि काही ठिकाणावरून देवदेवतेचा वापर कमी झालेला नाही. भीमजयंती म्हणजे क्रांतिकारी जबाबदारीची जाणीव जी आजच्या साहित्यिक विचारवंताला असायला पाहिजे. त्यांनी त्या जाणिवेतूनच आंबेडकरी सुसंवादाचे काम केले पाहिजे.‌ आंबेडकरी विचारधारेचा प्रवास खडतर आहे. तरीसुद्धा तुम्हाला तो करावाच लागणार आहे.‌ भीमजयंतीचा एकच दिवस नसतो तर पुढची १४ एप्रिल येईपर्यंतचा तो काळ असतो. आंबेडकरी चळवळीची हरेक विधायक कृती भीम जयंतीची सकाळ असते, हे लक्षात ठेवावे लागेल.
 
– प्रज्ञाधर ढवळे, नांदेड
 मो. ९८९०२४७९५३
 
 
        

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *