◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
कवी – बा.सी.मर्ढेकर
कविता – किती तरी दिवसात
बाळ सीताराम मर्ढेकर (उर्फ बा.सी.मर्ढेकर).
जन्म – ०१/१२/१९०९ (फैजपूर, खानदेश).
मृत्यू – २०/०३/१९५६ (दिल्ली).
*कवी आणि लेखक या भूमिका पार पाडत असतानाच मर्ढेकर यांनी पत्रकारीता, अध्यापन, आकाशवाणी इत्यादी विविध क्षेत्रात काम केले.
*दुसऱ्या महायुद्धानंतर जी परिस्थिती निर्माण झाली त्यातून निराशा, कृत्रिमता, प्रचंड मानवसंहारामुळे विषण्ण मनोवस्था या साऱ्यांच्या परिणामातून आलेली विफलता मर्ढेकरांच्या काव्यात आलेली दिसून येते.
*मर्ढेकर यांच्या काव्यात आशय आणि अभिव्यक्ती यांचा सुसंवाद दिसून येतो. भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. परंपरागत सांकेतिक उपमा आणि प्रतिमा न वापरता त्यांनी नव्या प्रतिमांचा उपयोग त्यांच्या काव्यात केला. काव्यातील नवीनता ही संकल्पना त्यांनी स्वतःच्या कवितेत रुजविली आणि समिक्षेतही तिला स्थान मिळवून दिले. यासाठीच मर्ढेकर यांना * मराठी नवकाव्याचे प्रवर्तक * मानले जाते.
*मर्ढेकर यांचा स्वभाव अलिप्त आणि अबोल होता. जीवनातील आणि वर्तमानातील अस्वस्थता व्यक्त करणारी त्यांची कविता सतत चर्चेत होती. जोष, ठसठशीतपणा, निर्भिडता ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये होती.
*शिशिरगान पहिला कवितासंग्रह, त्यानंतर तांबडी माती, रात्रीचा दिवस, पाणी या कादंबऱ्या, आणि काही कविता, आणखी काही कविता, सौंदर्य आणि साहित्य असे मर्ढेकर यांचे विपूल लेखन प्रसिद्ध आहे.
*”मर्ढेकरांची कविता” हा मर्ढेकर यांच्या कवितांचा कविता संग्रह मौज प्रकाशनने प्रकाशित केला. मौज प्रकाशनने मर्ढेकर यांचे बरेच साहित्य प्रकाशित केले.
मर्ढेकर यांना साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले.
पिंपात मेले, त्रुटीत जीवन, फलाट दादा, काळ्या बंबाळ अंधारी, गोंधळलेल्या अन चिंचोळ्या, न्हालेल्या जणू गर्भवतीच्या… या त्यांच्या काही गाजलेल्या कविता आहेत. बऱ्याचवेळा मर्ढेकर यांच्या लिखाणावर दुर्बोधतेचाही ठपका ठेवला गेला. तरीही त्यांच्या अनेक रचना या साध्या सोप्या शब्दातील आहेत. त्यातलीच एक रचना “किती तरी दिवसात” या कवितेचा आनंद आपण आज घेणार आहोत.
“किती तरी दिवसात”
ही मर्ढेकर यांची सहज सुंदर सोप्या शब्दातील अष्टाक्षरी रचना आहे. कवी गावाकडून आज शहरात आला असला तरी त्याला त्याचे बालपणातले गावाकडचे दिवस आजही आठवतात. आजही बालपणातल्या साऱ्या गोष्टींचा आनंद कवीला हवाहवासा वाटतो.
शहरातल्या गर्दीत हरवलेला कवी सांगतो की कितीतरी दिवसात मी चांदण्यात फिरलो नाही की नदीतही डुंबलो नाही. त्या मोकळ्या पटांगणातल्या चांदण्याची ओढ आजही मला आहे. आणि नदीच्या वाहत्या पाण्याचा आवाज (कवी त्याला शीळ ही उपमा देतो) आजही मला ओळखीचा आहे.
बरेच दिवस गावापासून लांब असल्याने आणि शहरातील वातावरणात गुदमरलेल्यामुळे खुल्या चांदण्यांची मनात भीती आहे. नदीच्या पाण्याची आठवणही अंगावर काटा आणते. तरीही कवीला आशा आहे की मी नक्की कधीतरी पुन्हा निर्भयतेने या चांदण्यात फिरेन, गावकडच्या नदीत मनसोक्त डुंबेन. पण सध्या मात्र चांदण्यांऐवजी हा शहरातला लाईटचा दिवा आणि नदीच्या खळाळत्या धारे ऐवजी नळाला रडतघडत येणारी पाण्याची धार यावरच समाधान मानावे लागत आहे, अशी खंत मर्ढेकर आपल्या कवितेत व्यक्त करतात.
खरतर ही परिस्थिती आजही तुमची आमची सर्वांचीच तशीच आहे, तेव्हाही होती आणि आजही आहे. मर्ढेकर यांनी प्रातिनिधीक स्वरुपात ती आपल्या समोर कवितेतून मांडली. आणि म्हणूनच आजही ही कविता अजरामर आहे…
किती तरी दिवसात
किती तरी दिवसात
नाही चांदण्यात गेलो;
किती तरी दिवसात
नाही नदीत डुंबलो
खुल्या चांदण्याची ओढ
आहे माझी ही जुनीच;
आणि वाहत्या पाण्याची
शीळ ओळखीची तीच
केव्हा तरी चांदण्यात
पुन्हा जाईन निर्भय;
गावाकाठच्या नदीत
होईन मी जलमय
आज अंतरात भीती
खुल्या चांदण्याची थोडी
आणि नदीचा प्रवाह
अंगावर काटा काढी
बरा म्हणून हा इथे,
दिवा पारवा पाऱ्याचा;
बरी तोतऱ्या नळाची
शिरी धार, मुखी ऋचा !
◆◆◆◆◆
- बा. सी. मर्ढेकर
◆◆◆◆◆
संदर्भ – इंटरनेट
विनंती – या स्मृतिगंध उपक्रमाबद्दल आणि या कवितेबद्दल आपला अभिप्राय जरूर कळवा.
(विजो – विजय जोशी, डोंबिवली, ९८९२७५२२४२)
सुचना – या उपक्रमातील माहिती कोणताही बदल न करता आपण इतरत्र देऊ शकता.
■■■