अंमली पदार्थांचा विषारी विळखा


         सुशांतसिंह राजपूत या अभिनेत्याच्या हत्येच्या संशयावरुन सुरु झालेला वाद सध्या अमली पदार्थांच्या सेवनापाशी येऊन थांबला आहे.  कंगना राणावत या सध्या फारशा चर्चेत नसलेल्या बॉलिवूड स्टार कंगना राणावतनं ड्रग्सबाबत उघडपणे बोलताना थेट बॉलिवूडच्या ४ स्टार्सची नावे घेतली होती. यात रणवीर सिंग, रणबीर कपूर, अयान मुखर्जी आणि विकी कौशल यांची ब्लड टेस्ट करावी असं म्हटलं होतं. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर सुरु असणाऱ्या चौकशीत ड्रग्स कनेक्शनही उघड झालं होतं. त्यामुळे बॉलिवूड आणि ड्रग्स यांचा संबंध पुन्हा ऐरणीवर आला आहे. कंगना, शिवसेना आणि राज्य सरकार या वादात कंगनाचीही ड्रग्जबाबत चौकशी होणार आहे. 


                 सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात समोर आलेल्या ड्रगच्या सदर्भानेही अभिनेत्री रिया चक्रवर्ती  मुख्य आरोपी आहे. याप्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्‍यूरोने (NCB) रिया चक्रवर्तीला अटक केल्यानंतर तर या प्रकरणात अनेक बाबी समोर येत आहेत. याप्रकरणात रियाने २० पानांचा कबुलीजबाब एनसीबीसमोर दिला आहे. या कबुलीजबाबात काही धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. ज्याच्याआधारे एनसीबी पुढील तपास करत आहे. एनसीबीने तब्बल ७ ठिकाणी धाडी घातल्या असून त्यात ड्रग्जचा मोठा साठाही हाती लागल्याची माहिती मिळाली.  या कबुलीजबाबत रियाने सुशांतच्या ड्रग पार्ट्यांबद्दल मोठा खुलासा केला आहे. तिने यामध्ये असे म्हटले आहे की, सुशांत त्याच्या फार्महाऊसवर नेहमी पार्ट्यांचे आयोजन करायचा आणि त्यामध्ये त्याचे सेलेब्रिटी मित्र नेहमी ड्रग्स घेत असत. या पार्ट्यांमध्ये काही अभिनेते एलएसडी (LSD) आणि कोकेन या अंमली पदार्थांचे देखील सेवन करत असत.  नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो आता रियाने नावं सांगितलेल्या बॉलिवूडमधील सर्व ए-लिस्टर कलाकारांची चौकशी करण्याच्या तयारीत आहेत.
                ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी रिया चक्रवर्तीने बॉलीवुडमध्ये अन्य ३० ते ४० जण ड्रग्ज घेत असल्याची माहिती  दिली आहे. या बॉलीवुड कलाकारांची नावे आता या प्रकरणी पुढे येतात का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणानंतर कंगना रणौतने या सातत्याने ड्रग्ज कनेक्शनवर भाष्य केले होते. ड्रग्जच्या विळख्यात बॉलीवुड़ स्टार कसे अडकत जातात यावरही तिने भाष्य केले होते. आता रिया चक्रवर्तीच्या जबाबानंतर बॉलीवुड आणि ड्रग्ज हे संबंध पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहेत. रियाची शीव येथील रुग्णालयात वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर  व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रियाची सुनावणी आणि त्यानंतर रिया एनसीबीसमोर पुन्हा चौकशीसाठी हजर झाली. न्यायालयातील चौकशीत बॉलीवुडची काही बडी नावे समोर येतात का किंवा अन्य चौकशीत नावे येतात का याकडे लक्ष  लागले होते. एकूण ३० जणांची यादी तयार करण्यात आली असून साऱ्यांची आता पुन्हा एकदा चौकशी होणार असल्याची शक्यता आहे. 
               रियाने तिच्या कबुलीजबाबात अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांची नावं घेतली असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रियाने केलेले खुलासे हे एनडीपीएस अधिनियम कायदा ६७ अन्वये अंतर्गत आहेत. रियाच्या कबुलीजबाबानुसार, बॉलिवूडमधील अनेकांनी सुशांतबरोबर ड्रग्जचं सेवन केलं होतं. ही पार्टी नेमकी कुठे झाली होती. याचीही माहिती रियाने चौकशीत दिली आहे. रियाने तिच्या कबुलीजबाबात दोन बड्या स्टार्सची आणि इतर काही छोट्या कलाकारांची नावं घेतली आहेत.  या पार्टीमध्ये ती नव्हती असल्याची माहिती देखील रियाने दिली आहे. काल एनसीबी च्या गळाला आणखी एक मोठा मासा लागला आहे. ड्रग्ज पुरवढा करणारा ‘केजी’ याला शनिवारी अटक करण्यात आली आहे. करमजीत असं त्याचं नाव असून त्याला ‘केजी’ या टोपण नावाने ओळखलं जात होतं. मुंबईतून त्याला अटक करण्यात आला आहे. करमजीत कॅपरी आणि लिटिल हाइट् इथं ड्रग्ज पुरवढा करत होता अशी माहिती पुढे आली आहे. सॅम्युअल मिरांडा आणि रियाचा भाऊ शोविकला तो ड्रग्जचा पुरवढा करत होता. त्यानंतर हा सगळा माल रिया आणि सुशांतला दिला जात होता अशी माहितीही पुढे आली आहे. एनसीबीकडून त्याची कसून चौकशी सुरू आहे. शोविक सोबत त्याचे थेट संबंध असल्याने अनेक धक्कादायक गोष्टी उघड होण्याची शक्यता आहे.

            एनसीबीने तब्बल ७ ठिकाणी धाडी घातल्या असून त्यात ड्रग्जचा मोठा साठाही हाती लागला आहे. आत्तापर्यंत ६ ते ७ ड्रग्ज पुरवढा करणाऱ्यांना एनसीबीने ताब्यात घेतलं आहे.रिया चक्रवर्ती हिच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंबई बरोबर गोव्यात छापे घातले होते.  प्रामुख्याने उत्तर गोव्यातील अंजुना इथं इथेही कारवाई झाली होती. यापूर्वी रिया चक्रवर्तीच्या मोबाईल चॅटमध्ये नाव आलेल्या गौरव आर्या आणि त्याच्या संबंधित ठिकाणी हे छापे असण्याची शक्यता आहे. यावेळेस आणखीन काही व्यक्तींची माहिती मिळविण्यात येत असून त्याच्याकडून अधिकचा तपशील शोधण्यात येणार आहे.गोव्यात ड्रग्ज डीलर अनुज केशवानी याने दिलेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. सहा ठिकाणी ड्रग्ज माफियांकडून पार्टीचे आयोजन केले जात होते. या कारवाईत आतापर्यंत दोघाजणांना ताब्यात घेतले आहे.रियाने दिलेल्या माहितीतून अनुज केशवानीला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीतून अनेक नाव समोर आली आहे. या बरोबरच नव्याने गौरव आर्याची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.


                 सुशांत सिंह प्रकरणात ड्रग्ज अँगल उघड झाल्यानंतर आता धक्कादायक खुलासे होऊ लागले आहेत. रिया चक्रवर्तीची सलग चौकशी सुरू आहे. अशातच कंगना रणौत हिने बॉलीवुडचा काळा चेहरा जगासमोर आणला आहे. पार्ट्यांमध्ये पाण्यासारखे ड्रग्ज वापरले जातात. नव्याने बॉलीवुडमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला ड्रग्ज देण्याचे काम काही मंडळी करत असतात, असा आरोप कंगनाने केला आहे. एखाद्याला ड्रग्ज देऊन त्याचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रकारही घडतो, असा आरोपही तिने केला आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री कंगना रणौत हिने बॉलीवुड कलाकारांमध्ये होत असलेल्या ड्रग्जच्या वापराबद्दल नवा खुलासा केला आहे. ९९ टक्के स्टार्स ड्रग्ज घेतात, ड्रग्ज डिलर्सही यांच्यापैकीच असतात, एलएसडी, एक्टेसी आदी ड्रग्जचा पुरवठा करतात, असा आरोप ‘रिपब्लिक टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत हे आरोप केले आहेत. सर्व गोष्टी पद्धतशीर नियोजनपूर्ण असतात, असेही ती म्हणाली. अभिनेत्यांच्या पत्नी सुद्धा अशाप्रकारच्या पार्ट्या आयोजित करतात. तिथे संपूर्णपणे वेगळाच माहोल असतो. या पार्टीत तुम्हाला उधळपट्टी करणारे आणि नशाबाज लोकच मिळतील. बॉलीवुड ड्रग्ज माफियांना पुढे जाण्यासाठी व्यवस्थेतील कित्येक जणांनी मदत केली आहे. हे लोक एकमेकांना सांभाळून अशी कामे करतात पुढे दिग्दर्शक बनतात, किंवा अभिनेता बनतात. मी अशा ठिकाणी गेले आहे, तिथे गेल्यानंतर हे लोक फक्त आणि फक्त ड्रग्ज घेणे सुरू करायचे.

या सगळ्या गोष्टी एका ड्रिक्सद्वारे सुरू होतात. एक रोल, एक गोळी त्यानंतर ड्रग्ज दिले जाते. या सर्व गोष्टी गोपनीय असतात. यात कलाकारांच्या पत्नी ड्रग्ज घेतातही आणि दुसऱ्यांना त्याचे व्यसन लावतात. ही अशी एक वाईट सवय आहे ज्याचा सर्वसामान्य विचारही करू शकत नाही. ड्रग्ज पार्ट्या कधीकधी हाताबाहेर जातानाही मी पाहिल्या आहेत. पोलीसांना या गोष्टी माहिती असतात. मात्र, पद्धतशीरपणे या गोष्टींकडे डोळेझाक केली जाते. काही अभिनेता राजकारण्यांसाठी प्रचार करत असतात. याच कनेक्शनमुळे अनेकजण बऱ्याचदा सहज सुटून येतात. कंगना रणौतने बॉलीवुडमध्ये ड्रग्जचे विष पेरणारे लोक हे पब मालक किंवा रेस्ट्रोरंटचे मालक असतात. कंगना म्हणते की मी जेव्हा हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला त्यावेळी एका काम देणाऱ्या कॅरेक्टर आर्टीस्ट व्यक्तीने ड्रग्ज दिले होते. चंदीगडमध्ये एक स्पर्धा जिंकल्यावर एका जाहीरातीसाठी निवड झाली होती. त्यानेच मुंबईत पाठवण्याची व्यवस्थाही केली. मुंबईत आल्यानंतर कामाच्या शोधात एका महिलेसोबत राहत होती. या दरम्यान, त्या व्यक्तीने कंगनावर अधिकार गाजवण्यास सुरुवात केली. तिला ड्रग्ज देऊन नशेच्या आहारी नेण्यास सुरुवात केली. कॅरेक्टर आर्टीस्टने तिला मारहाण करण्यासही सुरुवात केली होती. कंगनावर जास्त परिणाम होत नसल्याचे पाहून त्याने एका खोलीत बंद करून ठेवण्याचा प्रयत्न केला होता.   

              संबंधित कॅरेक्टर आर्टीस्ट कंगनाला स्वतःची मालकी समजू लागला होता. मात्र, ज्यावेळी कंगनाला एका बड्या चित्रपटाची ऑफर मिळाली त्यावेळी कंगनाला त्याने ड्रग्ज देणे सुरुवात केली. ड्रग्ज देऊन एका बंद खोलीत ठेवण्यास सुरुवात केली होती. मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली होती. या प्रकरणी कंगनाने पोलीसांत एफआयआर दाखल केली होती. कंगना शुटींगला जाऊ नये म्हणून तो व्यक्ती कंगाला इंजेक्शन देत असल्याचा खळबळजनक आरोपही कंगनाने केली होता.कंगनाने एका घटनेचाही उल्लेख केला, त्यात एक बॉलीवुड स्टारची परदेशात शुटींग होती. त्यात लास वेगास येथे एक छोटी भूमिका निभावली होती. या दरम्यानच ड्रग्ज माफियाशी जवळून संबंध आला होता. सिने अभिनेत्याची पत्नी खुलेआम ड्रग्ज विकत होती. त्यानंतर कंगना या बड्या स्टारशी संबंधातही आली होती. त्यावेळी ओव्हरडोसमुळे त्याला रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते. त्या स्टारने आणि त्यांच्या कुटूंबाने कंगनाला ड्रग्जच्या दुनियेत ढकलण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही केला.      

          बाहेरून येणाऱ्यांचे वारंवार शोषण केले जाते. बॉलीवुडमध्ये येणाऱ्यांवर होत असलेल्या अत्याचारांबद्दल कुठलीही कायदेव्यवस्था नाही. पोलीसांकडे जाणाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते, असेही ती म्हणाली. पोलीसांबाबत तिचे मत चांगले नाही. तिला मुंबई पोलीसांवर भरवसा नाही. तिला मुंबई म्हणजे पाकव्याप्त काश्मीर वाटते. या तिच्या विधानांवरुन चांगलाच गदारोळ माजला आहे. तिचे आॅफिस पाडण्यात आले, तिने मुख्यमंत्र्यांना एकेरी भाषेत आव्हान दिले, सोनिया गांधी, शरद पवार यांना डिवचण्याचा प्रयत्न, भाजपाचा कंगनाला पाठिंबा या पार्श्वभूमीवर कंगनाच्याही ड्रग्ज कनेक्शनची चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई पोलिसांना दिले आहेत. कंगना ड्रग्ज घेत असल्याचा दावा दिग्गज अभिनेता शेखर सुमनचा मुलगा – अभिनेता अध्ययन सुमन याने एका मुलाखतीत केला होता. त्याबाबतची चौकशी मुंबई पोलीस करणार आहेत. 


                   शेखर सुमनचा मुलगा अध्ययन सुमनने चार वर्षांपूर्वी दिलेली एक मुलाखत पुन्हा व्हायरल झाली आहे. त्यात कंगनाने आपल्याला कोकेन घेण्याचा आग्रह केल्याचा दावा अध्ययनने केला आहे. आपण हॅश ट्राय केलं होतं, पण ते आवडलं नव्हतं, त्यामुळेच आपण कोकेन घेण्यास नकार दिला होता. कोकेन घेण्यास नकार दिल्यामुळे कंगनाचे आणि माझे कडाक्याचे भांडणही झालं होतं” असंही अध्ययनने म्हटलं होतं. शिवसेना आमदार सुनिल प्रभू आणि प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या निवेदनाच्या आधारे कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले आहेत. या प्रकरणाचा तपास आता मुंबई पोलीस करणार आहेत, मात्र कोणता अधिकारी तपास करणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाने कंगनाची डोकेदुखी वाढण्याची दाट शक्यता आहे. कंगनाच्या निमित्ताने शिवसेना भाजप आमने-सामने आले आहेत. यात राजकारणही असेल परंतु या गदारोळात मुंबईला ड्रग्जचा विळखा पडला आहे. तो विसरता येणार नाही. अनेकांची आयुष्ये उद्वस्त होतांना मुंबई पोलीसांनी हे जाळे का विणू दिले हा प्रश्नच आहे.     

                    बदलत्या जीवनशैलीत तरुणपिढीच्या सवयीही बदलल्या आणि त्यांच्या मागण्याही. आई-वडील हल्ली आपल्या पाल्याच्या हट्टापायी सगळ्याच गोष्टी अगदी सहजपणे पुरवतात. कधी-कधी आई-वडिलांना माहितही नसतं, की आपला मुलगा किंवा मुलगी कोणत्या गोष्टींच्या आहारी जात आहेत. मग, त्याचे परिणामही वाईट होतात. चरस, गांजा, दारु, गुटखा असे पदार्थ बाजारात सहज उपलब्ध होतात. या सर्वांच्या जोडीला ड्रग्जचंही बाजारात सहज उपलब्ध होण्याचं प्रमाण वाढलं आहे.  त्यामुळे तरुणपिढी व्यसनाधीन होत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर परळ येथील केईएम रुग्णालयात ड्रग्ज ट्रीटमेंट सेंटर सुरू करण्यात आलं. या केंद्रात दररोज उपचारासाठी येणाऱ्या तरुण-तरुणींची संख्या मोठी आहे. दररोज जवळपास १५ ते २० रुग्ण या केंद्रात उपचारासाठी दाखल होतात, म्हणजे, आधी बाजारात उपलब्ध होणाऱ्या ड्रग्जला कायद्याचा धाक होता. पण, आता नवीन व्यसनजन्य पदार्थ बाजारात उपलब्ध झाले आहेत, ज्यांना अजूनही कुठल्याच कायद्याची परवानगी नसून ते सर्रास विकले जातात.

                    तरुण पिढी फॅशन, आधुनिक जीवनशैलीच्या नावाखाली व्यसनाकडे ओढली जातेय. पण, ड्रग्समुळे हाणारे आजार शरीराला घातक ठरतात. यावर वेळीच उपाय करणे गरजेचे आहे. यासाठी व्यसनाधीन व्यक्तीची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. त्यासाठी सरकारही या गोष्टीकडे सकारात्मकतेने पाहताना दिसून येत आहे. सहज उपलब्ध होणाऱ्या ड्रग्जचे प्रकारांची नावे क्रिस्टल मेथ,मेफेड्रोन,केटामिनसिंथेटिक कॅनाबिनोइड्स, कैनाबिनोइड्स, एमिनोइनडेन्स अशी आहेत. आशिया, युरोप, अमेरिका, आफ्रिका, चीन या देशात अंमलीपदार्थांच्या सेवनाचे प्रमाण सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे, युनायटेड नेशन्स ऑफिस ऑन ड्रग्ज अँड क्राईम (युएनओडीसी) या संस्थेने २०१५ मध्ये सादर केलेल्या अहवालात जगभरात ६०० नवीन व्यसनजन्य पदार्थ आहेत, असं सांगितलं होतं. पण, आता ती संख्या दहा हजारांहून अधिक असेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. ही अतिशय चिंतेची बाब आहे. काही ड्रग्जची टोपण नावं डिझायनर ड्रग्ज, स्पाईस,बाथसॉल्ट, स्पेशल के, हर्बल इनस्नेस, लिगल हाय अशी असून यातील बरेच ड्रग्ज कायद्यापासून बचावासाठी घरीच तयार केले जातात. बाजारात तर काही ड्रग्जचे प्रकार सहज उपलब्ध होतातच. पण, आता तर हे ड्रग्ज ऑनलाईनही उपलब्ध करुन देण्यात आले आहेत, ही भयंकर बाब आहे. मुलांना अशा ड्रग्जची सवय लागली की त्यांना त्यांचं दुखणं कमी झालेलं वाटतं. धुंदी चढते. काहीतरी नवीन करावसं वाटतं. ड्रग्जमुळे झालेली नशाही त्यांना हवीहवीशी वाटते.

व्यसनाधीन व्यक्तींना व्यसनातून मुक्त करणे कठीण आहे. कारण, या व्यक्तींना फक्त व्यसन नसतं, तर व्यसन करणं असा मानसिक आजारही त्यांना होतो. त्यावरही उपचार करणं आवश्यक असतं. व्यसनामुळे मेंदूतील रसायनांमध्ये काही बदल होतात. त्यामुळे अशा व्यसनाधीन व्यक्तींनी व्यसन सोडलं, तरी पुन्हा-पुन्हा ते व्यसनाकडे वळतातच. या व्यक्तींना व्यसनातून बाहेर काढण्यासाठी मेंदूतील रसायन स्थिर करणं गरजेचं असतं. ड्रग्ज ट्रिटमेंट सेंटरमध्ये पहिल्यांदा आलेल्या व्यक्तीवर औषधोपचार केले जातात. त्यानंतर त्याच्यासह कुटुंबाचंही समुपदेशन केलं जातं. ड्रग्ज सेंटरमध्ये जवळपास १४ ते १८ वयोगटातील मुलं असतात. शांत बसून रहाणेउत्तेजना (Excitement) वाढणे,वैचारिक, बौद्धिक क्षमतेवर परिणाम होणे, विचार करण्याची क्षमता कमी होणे ही काही ड्रग्ज घेणाऱ्या मुलांची लक्षणे आहेत. बऱ्याचदा पालकांना माहितही नसतं की मुलं ड्रग्जचं सेवन करतात. येणारी मुलंच असे ड्रग्ज कुठे मिळतात ते सांगतात. जेणेकरुन आम्हालाही कळतं की असे पदार्थ कुठे-कुठे सर्रास विकले जातात. नवीन आलेल्या ड्रग्जची नावे आपल्याला माहीत असतील. पण, त्यांच्यावर कायद्याचे कुठलेही निर्बंध नाहीत. व्यसनाधीन व्यक्तींना व्यसनातून बाहेर काढण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने काही सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार केंद्रे सुरू केली आहेत. अंधेरीतील भरडावाडीत आणि घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात ड्रग्ज ट्रिटमेंट सेंटर सुरू करण्यात आले आहेत. तसंच, लवकरच गोवा, गुजरात- सुरतमध्ये अशी केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. केईएम रुग्णालयातील ड्रग्ज ट्रीटमेंट सेंटर प्रादेशिक असून फक्त ‘क्रिस्टल मेथ’ या नावाचं ड्रग्ज घेतलेल्या ७० ते ८० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ज्याला ‘स्पीड मेथ’ही म्हणतात. तर, दररोज यात 15 ते 20 नवीन रुग्णांची भर पडत आहे. 

               २०१६ साली नवी मुंबई पोलिसांच्या नार्कोटिक्स सेलने केलेल्या कारवाईत १७५ ग्रॅम मॅफेडॉन अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. साधारणत: पाच लाख रुपये किमतीचा हा अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी राफे उर्फ रफिक कादिर खान या आरोपीला ही अटक केली होती. नवी मुंबई परिसरात अंमली पदार्थाचे मोठ्या प्रमाणात जाळं पसरत असून महाविद्यालयीन तरुण या अंमली पदार्थांच्या अधिक आहारी जात आहेत. हे रोखण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी अँटी नार्कोटिक सेलची स्थापना केली. तेव्हापासून पोलीस अंमली पदार्थ विकणाऱ्या टोळ्यांच्या मागावर होते. २०१८ च्या दिवाळीमध्ये रेव्ह पार्टीकरता ‘इफेड्रीन’ हा अंमली पदार्थ ठाण्यातल्या मुंब्रामध्ये घेऊन आलेल्याला ठाणे खंडणीविरोधी पथकानं अटक केली. अवील प्रकाश रॉबर्ट मोंथेरो असं या आरोपीचं नाव असून त्याच्याकडून एक कोटी रुपये किंमतीचं चार किलो इफेड्रीन जप्त केलं गेलं. मुंब्य्रातल्या कौसा भागात अवील मोंथेरो इफेड्रीन घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलीस पथकानं सापळा रचून ही कारवाई केली होती. 

          मुंबईत जुहू भागात २०१३ साली साली पोलिसांनी धाड टाकून उघडकीस आणलेल्या रेव्ह पार्टीप्रकरणी `बीग बॉस` फेम अपूर्व अग्निहोत्री आणि पत्नी शिल्पा अग्नीहोत्री या जोडप्यासहीत ८६ जणांवर आरोप निश्चित करण्यात आले होते.२०१३ साली मे मुंबईत जुहू भागातील ‘ओकवूड हॉटेल’मध्ये रेव्ह पार्टी करणाऱ्या १०० तरुण-तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. धक्कादायक बाब म्हणजे, या पार्टीत राहुल शर्मा आणि वेन पार्नेल हे आयपीएलचे दोन-चार खेळाडूही सहभागी झाल्याचं समोर आलं होतं. याच पार्टीत शिल्पा आणि अपूर्व अग्निहोत्री यांचाही समावेश होता. वैद्यकीय तपासणीत अपूर्व अग्निहोत्री याच्‍या रक्ताचा नमुना पॉझिटीव्‍ह आढळला होता.अपूर्व अग्निहोत्री त्याची पत्नी शिल्पा, आयपीएल क्रिकेटर राहुल शर्मा आणि इतर ८६ जणांवर अमली द्रव्यप्रतिबंधक विशेष न्यायालयाने त्यांच्यावर आरोप निश्चित केले होते. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी ६ मार्च रोजी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. यात दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटर वेन पार्नेल याला फरार दाखवण्यात आले होते. 


            याप्रकरणी, पोलिसांच्या कारवाईनंतर अपूर्व-शिल्पा यांनी एक पत्रकार परिषद घेऊन याबाबत स्पष्टीकरणही दिलं होतं. आपल्याला एका वाढदिवसाचं आमंत्रण होतं. ही रेव्ह पार्टी असल्याचं आपल्याला माहित नव्हतं, असं स्पष्टीकरण या दोघांनी दिलं होतं. या रेव्ह पार्टीतून १०० तरुण तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. यामध्ये ३८ मुली आणि ५८ मुलांचा समावेश आहे. त्यांच्या वैद्यकीय तपासणीनंतर यामध्ये सहभागी असलेले ३५ परदेशी नागरिक मायदेशी परतले होते. या सर्व परदेशी नागरिकांना फरार दाखवण्यात आलं होतं. सेलिब्रिटी आणि बॉलिवूडशी संबधित आणखी काही जण या पार्टीत सहभागी झाले होते. मेडिकल झाल्यानंतर दोन्ही क्रिकेटपटूंसह काही जणांना पर्सनल बाँडवर सोडून देण्यात आलंय. पार्टीच्या ठिकाणाहून १५० ग्रँम कोकेन, १०० ग्रँम एक्सएमडी असे अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले होते. विविध बहाण्यानी रेव्ह पार्टीचे आयोजन करुन तरुण मुला मुलींना अमली पदार्थांच्या नादाला लावले जाते. देशभरात विविध ठिकाणी पोलीसांनी टाकलेल्या छाप्यात ही बाब उघडकीस आली आहे. यात साधारणतः परदेशी नागरिकांचाच सहभाग असतो. 

       एकीकडे प्रगत महाराष्ट्राचा डंका वाजवला जात असतानाच अंमली पदार्थांचा विळखा किती घट्ट होत चालला आहे, याचे चित्र  आत्महत्यांच्या घटनांमधून स्पष्ट होऊ शकेल. अंमली पदार्थाच्या व्यसनातून मागील तीन वर्षांच्या एका सर्वेक्षणात तब्बल ४ हजार ८५५ जणांनी जीवनयात्रा संपवली आहे,हे दिसून आले आहे. देशात अशा प्रकारच्या सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. राज्यातील विविध भागात अफू, चरस, गांजा यासह मेफ्रेडोनसारख्या अंमली पदार्थाची खुलेआम विक्री होत असताना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह नागरी भागातील उच्चभ्रू व्यक्ती मोठय़ा प्रमाणात या व्यसनात गुरफटत चालले आहेत. राज्यात अमली पदार्थाच्या विक्रीसाठी बंदी असली, तरी ड्रग्ज माफियाने विविध क्लुप्त्या वापरून विक्रीचे जाळे विस्तारतच ठेवले आहे. अनेक शहरांमधून अमली पदार्थाची ऑनलाईन विक्री केली जात आहे. पोलिसांच्या कारवाईनंतर छुप्या पद्धतीने महाग दरात अमली पदार्थ विकले जातात, ते परवडत नसल्याने नैराश्यातून आत्महत्या करणाऱ्यांची मोठी संख्या आहे. ‘नॅशनन क्राईम रेकॉर्ड ब्यूरो’ च्या अहवालातील नोंदीनुसार देशात २०१२ मध्ये अमली पदार्थाच्या व्यसनातून ४००८ जणांनी आत्महत्या केली. २०१३ मध्ये ४ हजार ५९१ आणि २०१४ मध्ये ३ हजार ६४७ जणांनी आत्महत्येचा मार्ग निवडला. अशा आत्महत्यांमध्ये देशात महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे. राज्यात २०१२ मध्ये १ हजार ६८९, २०१३ मध्ये १ हजार ७९४, २०१४ मध्ये १ हजार ३७२ जणांनी आत्महत्या केली. ही आकडेवारी चिंताजनक मानली जात आहे. महाराष्ट्रानंतर मध्यप्रदेश आणि तामिळनाडूचा क्रमांक आहे. महाराष्ट्रात अमली पदार्थाच्या व्यसनातून तीन वर्षांमध्ये ४ हजार ८५५, मध्यप्रदेशात १ हजार ५११ आणि तामिळनाडून १ हजार २३१ आत्महत्यांच्या घटना घडल्या आहेत. सामाजिक न्याय मंत्रालयाकडून मद्य आणि अमली पदार्थ प्रतिबंधक उपाययोजना म्हणून स्वयंसेवी संघटनांना पुनर्वसन केंद्र चालवण्यासाठी अनुदान दिले जाते. व्यसनविरोधी शिबिरांचे आयोजन करणे, जनजागृती करणे, व्यसनाधीन युवकांचे पुनर्वसन करणे, अशा उपाययोजनांसाठीही आर्थिक सहाय्य पुरवले जाते.


         शाळा-महाविद्यालयांमधूनही विद्यार्थ्यांना अमली पदार्थाच्या घातक परिणांमाविषयी माहिती दिली जाते, पण त्याचा फारसा फायदा होऊ शकलेला नाही. विद्यार्थिनीही अमली पदार्थाच्या विळख्यात अडकू लागल्या आहेत. बाजारात नशा आणणारे अनेक पदार्थ मिळतात. काही औषधांनीही नशा येते. काही अमली पदार्थ युवक शरिरात टोचून घेतात, पण कोणताही अमली पदार्थ हा शरिरासाठी घातकच असतो. अफू, चरस, गांजा यासारख्या पारंपरिक अमली पदार्थाची चलती आहेच. शिवाय, राज्यात महानगरांमध्ये महागडे पदार्थ देखील उपलब्ध आहेत. काही विद्यार्थी अभ्यास करताना झोप येऊ नये म्हणून सुरुवातीला अमली पदार्थाचे सेवन करतात आणि नंतर त्यांची त्यातून सुटका होऊ शकत नाही. या वस्तूंचा पुरवठा करणारे रॅकेट राज्यात सक्रीय आहे. याच्या खरेदी-विक्रीसाठी विशिष्ट सांकेतिक शब्द तयार करण्यात आले आहेत. पोलीस यंत्रणेला अजून त्याला वेसण घालणे शक्य झालेले नाही आणि अमली पदार्थाच्या व्यसनातून होणाऱ्या आत्महत्या हा चिंतेचा विषय बनला आहे.

अमलीपदार्थांची नशा (ड्रग्ज) ही चिंतेची बाब बनली असून भारतातील तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर याला बळी पडलेली पाहायला मिळते. मात्र तुमची ही नशा सैनिकांच्या जीवावर बेतते याचा विचार कधी केला आहे का?, असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात बोलताना केला. ड्रग्जला आळा घालण्यासाठी नरेंद्र मोदींनी जनतेला आकाशवाणीवरून आवाहन केलं‌ होतं. 


                 ड्रग्ज ही भयंकर समस्या असून यामध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढणे आवश्यक आहे. नशेच्या आहारी गेलेल्या अनेकांना हे माहीत आहे का की, त्यांनी नशेसाठी खर्च केलेला पैसा हा दहशतवाद्यांकडे जातो. दहशतवादी संघटना यातून आपलं जाळं पसरवत आहेत आणि त्या पैशातून शस्त्रास्त्र जमवून हल्ले करतात. दहशतवाद्यांशी दोन हात करताना जेव्हा सैनिकांचा बळी जातो त्यामागे नशेबाजांचा पैसा असतो. तेव्हा नशेच्या आहारी जाऊन दहशतवाद्यांना मदत करू नका, असे नरेंद्र मोदी म्हणाले. ड्रग्जच्या आहारी जाण्यामागे ‘D-डिस्ट्रक्शन, डेवस्टेशन आणि डार्कनेस (3D) ’ ही कारणे आहेत. मात्र या सगळ्यात पालकांची भूमिका महत्वाची आहे. तसेच पालकांनी आपल्या पाल्याविरोधात नाही तर त्याच्या सवयी विरोधात, ड्रग्ज विरोधात लढले पाहिजे. त्याला समजून घेतले पाहिजे आणि समजावून सांगितले पाहिजे. त्यांनी आपल्याला पाल्याला ध्येय दिले पाहिजे तर तो या मार्गाला वळणार नाही. 


             सरकारतर्फे आपण या संदर्भात एक हेल्पलाइन सुरू करण्याचा विचार करतो आहोत. जेणेकरून तरुणांना या व्यसनातून बाहेर येण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले. ड्रग्ज मुक्त भारत करण्यासाठी सोशिअल मीडियावरील लोकांनाही त्यांनी आवाहन केले की, यासंदर्भात जागृतता पसरावी म्हणून ‘#drugfreeindia’ असा हॅश टॅग वापरावा. असे केल्यास तो एक लोकशिक्षणाचा भाग ठरेल, असेही मोदी म्हणाले. तसेच सेलिब्रेटी, सामाजिक कार्यकर्ते, नेते, धार्मिक-अध्यात्मिक क्षेत्रात मोठे कार्य करणाऱ्या व्यक्ती या साऱ्यांनी देखील आपल्या संवादातून ड्रग्जचे गंभीर परिणाम आणि त्याच्या विरोधात लढा देण्यासाठी शक्य तेव्हा विचार द्यावेत, असे आवाहन केले होते. 

         तरुणांमध्ये मादक पदार्थाच्या व्यसनाचे प्रमाण वाढतच आहे. या प्रमाणामध्ये वाढ होण्यासोबतच तरुण वैद्यकीय सल्ला किंवा उपचाराकडे कानाडोळा करत आहेत. १६ ते २२ वर्षे वयोगटातील तरुणांना मादक पदार्थाचे व्यसन असून या प्रमाणामध्ये १० टक्क्यांनी वाढ होत आहे. आज तरुणांवर परिणाम करणारी वाईट गोष्ट म्हणजे मादक पदार्थाचे व्यसन. तरुणांमध्ये मादक पदार्थाच्या व्यसनाचे प्रमाण वाढतच आहे. या प्रमाणामध्ये वाढ होण्यासोबतच तरुण वैद्यकीय सल्ला किंवा उपचाराकडे कानाडोळा करत आहेत. १६ ते २२ वर्षे वयोगटातील तरुणांना मादक पदार्थाचे व्यसन असून या प्रमाणामध्ये १० टक्क्यांनी वाढ होत आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोच्या शहर-निहाय माहितीमधून समोर आले की, २०१४ मध्ये देशात नार्काटिक ड्रग्ज अ‍ॅण्ड सायकाट्रॉपिक सबस्टन्सेस अ‍ॅक्ट अंतर्गत १९,८७४ केसेसची नोंद झाली. यापैकी मुंबईमध्ये १४,२७४ केसेसची नोंद करण्यात आली, ज्यामधून मुंबई शहरामध्ये मादक पदार्थाचे सेवन करण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून येते.
                भारताच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने केलेल्या सर्वेक्षणानुसार, १५ ते १९ वर्षे वयोगटातील २८.६ टक्के मुलांना तंबाखू खाण्याचे आणि १५ टक्के मुलांना मद्यपान करण्याचे व्यसन असल्याचे दिसून आले. १५ ते १९ वर्षे वयोगटातील ५.५ टक्के मुलींना तंबाखू खाण्याचे आणि ४ टक्के मुलींना मद्यपान करण्याचे व्यसन असल्याचे दिसून आले. नोबेल शांती पुरस्कार विजेता व बाल कल्याण चळवळीचे प्रणेते कैलाश सत्यर्थी यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर मादक पदार्थासंदर्भातील समस्या मांडली आणि मुलांना मादक पदार्थाच्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी एक ‘नॅशनल अ‍ॅक्शन प्लान’ तयार करण्याची सरकारला विनवणी केली. सामाजिक संबंधाचा अभाव, वेगळेपणाची भावना आणि सपोर्ट सिस्टमचे अपयश हे याकरिता कारणीभूत घटक आहेत. कामात व्यस्त असलेले, तसेच विभक्त पालकांची किशोरवयीन मुले, व्यक्तिमत्त्व डिस्ऑर्डर्स असलेली किशोरवयीन मुले सर्वात असुरक्षित आहेत. तसेच तणावग्रस्त जीवन, जैविक दुर्बलता, आनुवांशिक आजार व मानसिक आजारापासून पीडित मुलांनासुद्धा असुरक्षिततेचा उच्च धोका आहे. सामान्यपणे दिसण्यात येणारे मादक पदार्थ आहेत दारू, तंबाखू व भांग, ड्रग्जचे एम्फेटामिन्स ग्रुप, हेरॉईन, इन्हेलंट्स व इंजेक्टेबल पदार्थ. अनेकजण कोकेन, अफू व एलएसडीचे सुद्धा सेवन करतात. सहका-यांमध्ये इम्प्रेशन पाडण्यासाठी या मादक पदार्थाचा सेवन करण्याचा ‘प्रयत्न’ करतात.


                मानसोपचारतज्ज्ञांच्या एका समूहाने केलेल्या सर्वेक्षणातून दिसून आले की, मुंबईमधील बहुतेक किशोरवयीन मुले वाईट मित्रांच्या सोबतीमुळे मादक पदार्थाचे सेवन करत आहेत. पाहणीत सहभागी झालेल्यांनी सांगितले की, सहका-यांचा दबाव आणि तणाव, या पदार्थाबाबत असलेली कुतूहलता व नैराश्यामुळे मादक पदार्थाचे व्यसन करण्यास सुरुवात होते. समाजात आपली प्रतिष्ठा दाखवण्याकरिता व्यसनाला सुरुवात होते आणि हळूहळू याची सवय होऊन जाते. मादक पदार्थ सहजपणे उपलब्ध होणे, योग्य प्रतिबंधाचा अभाव, कायद्याच्या अंमलबजावणीचा अभाव आणि आर्थिक उपलब्धता या देखील समस्या आहेत. शांत असणारी, लोकांमध्ये कमी प्रमाणात वावरणारी, समाजापासून दूर राहणारी मुले सहजपणे व्यसनाधीन होऊ शकतात. सहका-यांचा दबाव, घरातील भावंडांचा त्रास, बालपणीच लागलेली सवय यांमुळे मादक पदार्थाचे व्यसन लागू शकते. रेव्ह पार्टीज, स्नेहसंमेलने अशा ठिकाणी मादक पदार्थाच्या सेवनावर कोणतेच प्रतिबंध नसते. किशोरवयीन पिढीला व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. यात पालकांचा पाठिंबा आवश्यक असतो.


गंगाधर ढवळे,नांदेड 

संपादकीय

१३.०९.२०२०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *