कोरोना काळात मन प्रसन्न ठेवणे आवश्यक

मन चंचल असते, मन सैरभैर फिरते, मन क्षणात इथे असते तर क्षणात दूरवर कुठं तरी फिरून येते. मनाचा वेध आणि वेग आजपर्यंत कोणालाही साधता आले नाही. आपले मन आपल्या भलाचा विचार करतेच पण इतरांच्या भल्याचा विचार करणारे मन सर्वात सुंदर असते. असे म्हटले जाते की सुंदर तन काही कामाचे नाही जर आपले मन सुंदर नसेल तर. म्हणून आपले मन सुंदर राहण्यासाठी मनात चांगले विचार येऊ द्यावे, सकारात्मक विचार करावे, दुसऱ्यांना त्रास होईल किंवा ईजा होईल असे विचार आपल्या मनात कधीच येऊ नये याची काळजी घ्यावी. आज देशात ज्या काही अप्रिय अशा घटना घडतांना दिसून येत आहेत त्यामागे सर्वस्वी कारण आपले मन आहे. कणखर आणि मजबूत मनात कुणाचे वाईट करावे असे येतच नाही. मनाला मजबूत म्हणजे स्ट्रॉंग बनविण्यासाठी योगा करणे आवश्यक आहे. आपल्या मनाला काही तरी विरंगुळा ठेवावे, आवडीचे गाणे ऐकावे, चित्रपट पहावे, खेळ खेळावे, पुस्तक वाचावे, लेखन करावे, कविता लिहावी म्हणजे मनाला आत्मिक समाधान मिळेल. कुणासोबत शक्यतो वादविवाद टाळावे, राग येईल असे काही वर्तन करू नये म्हणजे मन शांत राहील. डोळे आणि कान हे दोन महत्वाचे इंद्रिय आपल्या मनाला हवे ते सुख शांती देऊ शकतात. तेव्हा त्याचा योग्य वापर करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. आपल्या डोळ्याला वाईट पाहण्याची व कानाला वाईट ऐकण्याची सवय लागली की मन देखील तसेच वागते. समर्थ रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक वाचावे म्हणजे आपले मन आपणांस समजून येईल. माणूस जेव्हा जेव्हा एकटा राहतो त्यावेळी त्याच्या मनात नानाप्रकारचे विचार येतात. तुम्ही जर सुखात किंवा आनंदात असाल तर त्याच प्रकारचा विचार कराल पण दुःखात किंवा काळजीत असाल तर जीवाचे बरे-वाईट करून घेण्याचा विचार मनात घुटमळत राहतो. मग त्यातूनच आत्महत्त्येचे प्रकार घडत असतात. सध्या कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे. प्रत्येकजण आपापल्या घरातच कैद आहे. घरातील सर्व सदस्यांचे वाढत चाललेले वास्तव्य देखील कुटुंबाला एका वेगळ्या वळणावर नेत असल्याच्या चीनमधील बातम्या वाचण्यात आल्या होत्या. तश्याच आशयाच्या काही बातम्या भारतात देखील वाचण्यात आले आहेत. कोरोना पॉजिटिव्ह अहवाल आल्यानंतर व्यक्तीच्या मनाची घालमेल मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. काही तज्ज्ञांच्या मतानुसार लोकं कोरोना रोगाने कमी आणि त्याच्या धसकीने जास्त मृत्यू पावत आहेत. म्हणून कोणत्याही विपरीत परिस्थितीमध्ये आपल्या मनाचे संतुलन ढळू द्यायचे नाही. काही समुपदेशन करणाऱ्या मित्रांच्या मदतीने आपल्या कमजोर बनत चाललेल्या मनाला मजबूत करायला हवे. आजच्या या काळात तर आपले मन भक्कम ठेवणे अत्यावश्यक आहे. वाल्मिकी ऋषीनी म्हटले आहे की, ज्याप्रमाणे सूर्योदय होताच अंधकार नाहीसा होतो, त्याप्रमाणे मन प्रसन्न होताच सर्व व्याधी नाहीशा होतात. मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचे कारण हे संत तुकाराम महाराज यांचे वचन नेहमी लक्षात असू द्यावे. आपण अंधारात चालताना नेहमी देवाचे नामस्मरण करीत चालत असतो. कारण त्यावेळी आपल्या मनाला सांगत असतो की, भिऊ नको तू एकटा नाहीस तर तुझ्यासोबत अजून कुणीतरी म्हणजे देव आहे. श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांना एकच वचन देतात ते म्हणजे भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. नुसते कोणी सोबत आहे असे जरी म्हटले तरी आपणाला तेवढी भीती वाटत नाही. म्हणूनच आपल्या मनाला कधी ही एकटे ठेवू नका. त्याला सदोदित कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त करून ठेवावे. म्हणजे आपल्या मनाला दुसऱ्या कोणत्या गोष्टीवर विचार करायला वेळ मिळणार नाही. रिकाम्या डोक्यात सैतानाचे वास्तव्य असते आणि ते आपल्या मनाला नको असलेले काम करायला भाग पाडते. स्वामी विवेकानंद यांनी म्हटल्याप्रमाणे, आपले मन आपल्या लाडक्या मुलांप्रमाणे असते. ज्याप्रमाणे लाडकी मुलं नेहमी असंतुष्ट असतात ; त्याप्रमाणे आपले मन नेहमी अतृप्त असते. म्हणूनच मनाचे लाड कमी करा व त्याला सतत लगाम घाला.

सदा असतो जो काही कामामध्ये,

उत्साह दिसतो त्याच्या चेहऱ्यामध्ये

जो काम न करता करतो आळस
चेहऱ्यावर दिसे निरुत्साहाचा कळस

संत बहिणाबाई चौधरी यांनी देखील आपल्या कवितेत मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात, आता व्हतं भुईवर गेलं गेलं आभाळात असे म्हटले आहे. आपणांस मिळालेले हे जीवन खूप सुंदर आहे फक्त ते आनंदाने कसे जगता येईल याचा विचार करावा. चला तर आपल्या मनाला सदा प्रफुल्लीत ठेवू या आणि निरोगी, निरामय व आनंदी जीवन जगू या.

नागोराव सा. येवतीकर
नागोराव सा. येवतीकर

नागोराव सा. येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद, 9423625769

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *