Post Views: 63
नांदेड – जिल्हाभरात स्वीप द्वारे मतदान जनजागृती करण्यात येत आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघात २६ एप्रिल रोजी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील जवळा देशमुख मतदान केंद्रांतर्गत शालेय मतदान जनजागृती मंचाच्या वतीने मतदानाची शपथ घेण्यात आली. यावेळी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी संतोष घटकार यांच्यासह मुख्याध्यापक गंगाधर ढवळे, विषय शिक्षक संतोष अंबुलगेकर, उमाकांत बेंबडे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशनराव गच्चे, उपाध्यक्ष चांदू झिंझाडे, मारोती चक्रधर, आनंदा गोडबोले, हैदर शेख, मनिषा गच्चे, माधवदादा गोडबोले, पांडुरंग गच्चे, इंदिरा पांचाळ, हरिदास पांचाळ, तुकाराम गोडबोले, किशन गोडबोले, सुलक्षणा गच्चे आदींची उपस्थिती होती.
केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार नांदेड लोकसभा मतदारसंघांतर्गत जिल्ह्यातील मतदारांमध्ये मतदानाची जागृती व्हावी व मतदानाची टक्केवारी वाढावी या दृष्टिकोनातून जवळा देशमुख येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत मतदार जागृती मंचाची स्थापना करण्यात आली. यानुसार विद्यार्थ्यांनी तीन टप्प्यांत आपल्या आईवडिलांना आणि इतर नातेवाईकांना मतदान करण्यासाठी आवाहन करणारे पत्र लिहिले. तसेच या मंचाच्या वतीने गल्लोगल्ली मतदान जनजागृतीसाठी मतदारांना शपथ देण्याचे ठरले. यात सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. फुले आंबेडकर शालेय जयंती मंडळाच्या वतीनेही जनजागृती करण्याचा ठराव घेण्यात आला होता. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनीही मतदानाची शपथ कार्यक्रमात सहभाग नोंदविला.
….. अशी घेतली मतदानाची शपथ
‘आम्ही भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करु आणि नि:पक्षपाती, शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता मतदान करु’