हे..अंजनीच्या सुता,तुला रामाचं वरदान  श्री हनुमान जन्मोत्सव विशेष 23 एप्रिल

 

 

आजही मानवी संस्कृतीला मूल्यात्मक आधार देण्यासाठी राष्ट्रीय सणाचे आयोजन करून त्याबरोबर लोकनेत्यांच्या जयंत्या, पुण्यतिथी रयतेच्या कल्याणासाठी विधायक उत्सवाने करावयाचे असतात. त्यामुळे त्यांचे स्मरण होऊन माणसा माणसात सलोख्याचे एकात्मतेचे नाते जोडल्या जाते. त्यामुळेच आपण वेगवेगळ्या उत्सव करतो हा त्याचा मुख्य हेतू आहे. त्यांनी केलेल्या अविरत कार्याचे प्रत्येक व्यक्तीला स्मरण व्हावे म्हणून आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने हा केलेला शब्द प्रपंच …

ब्रह्मचर्य ,बलोपासना चारित्र्यवान. रामभक्त, आदर्श सेवक या गुणामुळे बजरंग बली संपूर्ण जगात वंदनीय, आदरणीय , पूजनीय मानले जातात. समर्थ रामदास स्वामींनी त्यांची उपासना करून अकरा मारुतीची स्थापना केलेली आहे. आज वेगवेगळ्या तालीमी मध्ये, मंदिरामध्ये, देऊळात,मठामध्ये सप्ताहात त्यांची मनोभावे पूजा केली जाते .

 

सेवेला त्यांनी पहिले प्राधान्य दिले. त्यामुळे आज ते सगळ्यांच्या अंत:करणात आहेत. श्री हनुमानाचा जन्म चैत्र पौर्णिमेला सूर्योदयापूर्वी झाला असून धुमधडाक्यात त्यांचा जन्मोत्सव आज भारतभर साजरा केला जातो. प्रभू श्रीराममाचे एकनिष्ठ सेवक म्हणजे बजरंगी बली हनुमान आहेत. भारतीय संस्कृतीमध्ये सेवेला फार महत्त्व आहे. सेवा केल्यानंतर त्यांना खरोखर फळ मिळते. हनुमानजी, श्रीप्रभूराम सीता आणि लक्ष्मण यांच्या सोबत राहून सेवा केली. श्रीप्रभू रामचंद्राच्या आशीर्वादा मुळे गावेगावी वाडी, तांडा, तेथे मारूतीचे मंदिरे आहेत. एक वचनी, एक बाणी, एक पत्नी रामा सोबत राहुन सेवा करून त्यांच्या पदरी हे पुण्य पडले,

 

म्हणूनच हे…अंजनीच्या सुता तुला, रामाचं वरदान। असे म्हटले जाते. रामभक्त हनुमान हे भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहेत. त्याची भक्ती ही मानव जातीला प्रेरणा देणारी ठरली आहे .आपण आपल्या पातळीनुसार कसं वागावे हे त्यांच्या कडून शिकावे
लक्ष्मण ज्यावेळी मुर्छीत पडले होते,(शक्ती लागली) त्यावेळेस रामभक्त हनुमानांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता द्रोणागिरी पर्वत हातावर उचलून आणून लक्ष्मणाच्या जवळ ठेवला. तेव्हा संजीवनी जडीबुटी वेळेत मिळाली, आणि लक्ष्मणाचे प्राण वाचले .मित्रांनो त्यांची भक्ती ही अनन्यसाधारण होती.

 

मोठ्यांचा सन्मान कसा करावा हे हनुमानजी कडून शिकावे.दररोज आपण आपल्या प्रतिज्ञेमध्ये वडील धा-या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन, खरंच आपण आज असे वागतो काय ? निष्ठा ही चांगली व आदरयुक्त असावी. फसवी व स्वार्थी नसावी ,तर त्याचे फळ आपणाला कर्मानुसार मिळते. कोणत्याही फळाची अपेक्षा न करता निष्ठा ठेवून सेवा करत रहावे, हे या जन्मोत्सवाच्या निमित्ताने सांगता येते. आपला त्यामध्ये फायदा आहे किंवा तोटा आहे हे न पाहता एकनिष्ठ राहणे कधीही चांगले असते.एक ना एक दिवस त्याचे जरूर फळ तुम्हाला मिळते. एकदा भीमाला शक्तीचा गर्व झाला होता, त्या वेळी हनुमानजीने रस्त्यावर शेपटी टाकून ठेवली होती, त्या वेळी शेपटी उचलली नाही,तेव्हा त्यांचे गर्वहरण झाले.

 

आज समाजामध्ये लोकांची वृत्ती वाईट झाली आहे. जिकडे आपल्याला काय चांगलं मिळेल, तिकडे लोक पळत आहेत. झटपट श्रीमंत होण्याच्या नादात चुका करून बसत आहेत. रामराज्य आजही येते .परंतु लोकांची वागण्याची प्रवृत्ती बिघडली आहे. लोकांमध्ये एक मत राहिले नाही. मृग जळाच्या पाठीमागे लोक लागले आहेत. त्यामुळे या काळात हनुमानजीचे कार्य आपल्याला तारणार आहे. संपूर्ण आयुष्य राम नामाचा जप करून दगडावर श्री राम नाव लिहून समुद्रात टाकले तरीही ते बुडाले नाहीत, हे त्यांच्या निष्ठेचे फळ आहे. स्वतः श्री रामाने श्रीराम प्रभू नाव लिहून दगडावर समुद्रात टाकले तर ते लगेच बुडाले. भक्ती आणि माया या कधीच एकत्रित राहू शकत नाहीत. मारुतीरायाने भक्तीने रामाला आपलेसे करून घेतले हे आपण गावोगावी कीर्तनातून ,

 

प्रवचनातून ऐकत असतो म्हणून ‘सज्जनहो’ आपल्याला हनुमानांचे विचार आणि स्वामी निष्ठा समाजात पेरायची आहे. भक्तीमध्ये आपण राहिलो की माया दूर जाते आणि माया जवळ केली की भक्ती दूर जाते. म्हणून माया मध्य अडकू नका. त्यासाठी तुम्ही आपली निष्ठा एकाच व्यक्तीवर ठेवा. असे हे रामराज्य येण्यासाठी हनुमान कडून शिकावे, आज आपण त्यांची जयंती साजरी करत आहोत. हनुमान आपल्या सगळ्यांचे दैवत आहे. ह्या हनुमानाने लंकेच्या रावणाच्या बलाढ्य राजाच्या दरबारातून स्वतःचा पराक्रम दाखवून स्वतःची शेपटी मोठी करून ते सहीसलामत सीतेचा शोध घेऊन अयोध्यत परत आले. त्यांचा रोमांचकारी जीवन संघर्ष आपण अभ्यासल्यास तो फार मोठा इतिहास आहे. आपणाला फक्त इथं थोडक्यात हनुमानजीचे चरित्र अंगीकारायचे आहे. हनुमान जन्मल्या बरोबर ते सूर्याला गिळायला गेले .काय ती शक्ती होती, की धन्य धन्य ती माता होती,

 

त्यामुळे त्यांना पवनपुत्र हनुमान, बजरंग बली, संकट मोचन, पंचमुखी, दक्षिणमुखी,महारुद्र ,मारुती , मारूतीराया पवनसुत, वायुसुत अशा कितीतरी नावाने त्यांना ओळखले जातात, सेवा करावी तर हनुमाना सारखी असे लोक बोलतात *शरण शरण हनुमंता। तुम्हा आलो रामदूता। काय त्या भक्तीच्या वाटा । मज दावाव्या सुभटा।।*
जगद्गुरु तुकाराम आपल्या अभंगात म्हणतात. मी तुम्हाला शरण आलो आहे.तुम्ही केलेल्या भक्तीच्या वाटा कोणत्या आहेत? ते आम्हाला सांगा. तुम्ही धैर्यशील, शूरवीर आहोत .धर्म अर्थ ,काम, मोक्ष हा पुरुषार्थ तुम्हाला समजतो ,तुम्ही आयुष्यभर स्वामीजीची सेवा केली आहे .म्हणून तुम्ही सर्वत्र स्वामीनिष्ठ आदरणीय, वंदनीय आहोत, त्यासाठी तुम्ही आम्हाला त्या भक्तीच्या वाटा दाखवा, आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत. अशी त्यांच्याकडे मागणी करतात.

 

आज हनुमाना विषयी जनसामान्यांमध्ये आदर आहे या पृथ्वीतलावर जीवन जगते वेळेस चांगल्या वाईट गोष्टीची विचार करत असताना हनुमानाचं नाव प्रथम घेतल्या शिवाय जीवन संघर्ष पूर्ण होत नाही, रामायण आलं की लगेच हनुमानाची आठवण येते. तेवढी त्यांची निष्ठा प्रभू श्रीरामावर सदैव होती म्हणूनच
*हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाळी* असे म्हटले आहे. एकदा जानकीने हनुमान रायाच्या गळ्यात नवरत्नाचा हार घातला. त्यावेळेस त्यांनी त्यातील मणी फोडून पाहिले त्यात श्रीराम नाही दिसले, त्यांनी त्यामुळे तो हार फेकून दिला, आणि स्वतःच्या छाती मधून प्रभू रामचंद्र दाखविले असे हे महान रामभक्त हनुमान होते.

 

मारुती स्तोत्रात *भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान मारुती।। वानरी अंजनी सुता रामदूता प्रभंजना।* असे म्हटले जाते. खरोखर हनुमान हे बलोपासनेचे फार मोठे प्रतीक आहे. समर्थ रामदास स्वामींनी बलोपासना करा, हनुमानाची सेवा करा, असे सांगितले आहे. एखाद्या सागरातून घागर काढता येते पण सागर घागरीमध्ये बसत नाही. तसे हनुमानाचं कार्य फार अफाट आहे. हनुमानाच्या कार्यावरच समाजाची बरीच कार्य कर्तृत्व सांगितले जातात. हनुमान जयंतीच्या दिवशी वेगवेगळे कार्यक्रम केले जातात. दानशूर व्यक्ती अन्नदान करून पुण्य पदरात पाडून घेतात. नित्यनेमाने हनुमानाची पूजा करणारे अनेक भक्त आहेत.त्यामुळे हनुमान हे भारतीय संस्कृतीमध्ये आदराचे ,मानाचे ,निष्ठेचे, एकात्मतेचे प्रतीक आहे म्हणून हनुमान चालीसा गायली जाते .

 

आपण आज समाजा मध्ये लोकांची एकनिष्ठता पाहिली, तर ती राहिली नाही, लोक छोट्या-छोट्या गोष्टीसाठी स्वाभिमान गहाण ठेवत आहेत चुकीच्या पद्धतीने वागत आहेत. जो जगात सज्जनांना व दुर्जनांनाही नमस्कार करतो. जो कोणाची निंदा करीत नाही. वाणी, कासोटा ,व मन जो दृढ ठेवतो, अशा पुरुषाची जन्मदात्री आई धन्य होते. त्यामुळेच म्हटलं जाते. म्हणून *हे ..अंजनीच्या या सुता ,तुला रामाचं वरदान l एक मुखाने बोला । बोला जय जय हनुमान, ज्याच्या मनात आहे श्रीराम, संपूर्ण विश्वात आहे तो बलवान , अशा मारुतीरायास आमचा शत शत प्रणाम. विठूमाऊली प्रतिष्ठान खैरकावाडी यांच्या कडून सर्व भक्तांना हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

*प्रा. बरसमवाड विठ्ठल गणपत*
अध्यक्ष: विठूमाऊली प्रतिष्ठान खैरकावाडी ता. मुखेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *