लातूर, दि. २७ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा ३० एप्रिल, २०२४ रोजी लातूर जिल्हा दौरा प्रस्तावित आहे. या दौऱ्यादरम्यान लातूर येथील गरुड चौकाच्या बाजूस बिर्ले फार्म येथील प्रधानमंत्री यांच्या सभास्थळाकडे जाणाऱ्या वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. सभास्थळाकडे येणारी जड व मालवाहू वाहने व इतर सर्व प्रकारच्या वाहनांस ३० एप्रिल, २०२४ रोजी दुपारी १२ ते ५ वाजेपर्यंत प्रतिबंध करून पर्यायी मार्गाचा वापर करण्याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (२) नुसार आदेश निर्गमित केले आहेत.
*असे असतील वाहतूक मार्गातील बदल…*
नांदेड रोड व उदगीर रोडकडून लातूरकडे येणारे जड व मालवाहतूक करणारी मोठी वाहने आष्टामोडपासून पुढे येण्यासाठी मनाई राहील. सोलापूर, तुळजापूरकडून लातूरकडे येणारी जड व मालवाहतूक करणारी मोठी वाहने औसा येथील तुळजापूर टी-पाँईटपासून पुढे लातूरकडे आणण्यास मनाई राहील. कृषि महाविद्यालय, डी-मार्ट, रिंगरोडकडून येणारी चारचाकी, तीनचाकी व दुचाकी या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी गरुड चौक ते बाभळगाव नाका हा रोड वाहतूकीस बंद राहील. महात्मा बसवेश्वर चौक, बाभळगावकडून येणारी चारचाकी, तीनचाकी व दुचाकी या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बाभळगांव नाका ते गरुड चौक हा रोड वाहतुकीस बंद राहील.
*बंद केलेले मार्गावरील वाहनांसाठी पर्यायी व्यवस्था*
नांदेड रोड व उदगीर रोडकडून येणारी जड व माल वाहूतक करणारी मोठी वाहने लातूरमार्गे तुळजापूर व सोलापूर जाण्याऐवजी आष्टामोड येथून नळेगाव-निटूर-निलंगा-लामजाना-औसामार्गे जातील. तसेच नांदेड रोड व उदगीर रोडकडून येणारी जड व माल वाहतूक करणारी मोठी वाहने लातूरमार्गे जाण्याऐवजी अंबाजोगाई, बीड जाण्यासाठी आष्टामोड येथून खरोळा-रेणापूरमार्गे जातील. तसेच नांदेड रोड व उदगीररोडकडून लातूर एमआयडीसी येथे येणारी जड व माल वाहूतक करणारी मोठी वाहने आष्टामोड येथून खरोळा-रेणापूर-महापूर-नवीन रेणापूर नाकामार्गे लातूर एमआयडीसी येथे जातील. सोलापूर , तुळजापूरकडून लातूरमार्गे नांदेडकडे जाणारी जड व मालवाहतूक करणारी मोठी वाहने औसा येथून तुळजापूर टी-पाँईटपासून लामजाना -निलंगा-निटूर-नळेगाव-आष्टामोडमार्गे जातील. तसेच अंबाजोगाई, बीडकडून येणारी जड व माल वाहतूक करणारी मोठी वाहने लातूरमार्गे जाण्याऐवजी नांदेडकडे जाण्यासाठी रेणापूर-खरोळा-आष्टामोडमार्गे जातील. तसेच एमआयडीसी येथून गरुड चौकमार्गे नांदेड-उदगीरकडे जाणारी जड व मालवाहतूक करणारी मोठी वाहने नवीन रेणापूर नाका-महापूर-रेणापूर-खरोळा-आष्टामोडमार्गे जातील.
कृषि महाविद्यालय, डी-मार्ट, रिंगरोडला येणारी चारचाकी, तीनचाकी व दुचाकी या सर्व प्रकारच्या वाहनांना गरुड चौक ते बाभळगाव नाका जाण्यासाठी वाहतूकीस बंद करण्यात येत असून त्यांनी गरुड चौक, विवेकानंद चौक, बाभळगाव नाकामार्गे जातील. महात्मा बस्वेश्वर चौक, बाभळगावकडून येणारी चारचाकी, तीनचाकी व दुचाकी या सर्व प्रकारच्या वाहनांना बाभळगांव नाका ते गरुड चौक जाण्यासाठी वाहतुकीस बंदी करण्यात आली असून ही वाहने बाभळगाव नाका-विवेकानंद चौक- गरुड चौकमार्गे जातील. हा आदेश ३० एप्रिल, २०२४ रोजीच्या दुपारी १२ वाजता ते ५ वाजेपर्यंत अंमलात राहतील, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
*****