कणखर देशा, दगडांच्या देशा, महाराष्ट्र देशा. गर्जा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा या पेक्षा ते आणखी काय वर्णन करणार माझ्या महाराष्ट्राच. संताच्या वाणीने, वारकरी संप्रदायाने
दलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या न्याय, समता बंधुताने,स्त्रीशिक्षणाची ज्योती लावणाऱ्या फुले दांपत्याने आणि शिवबाच्या कर्तुत्वाने पावण झालेली ही पतित पावन महाराष्ट्र भुमी. जेव्हा महाराष्ट्रा बद्दल विचार करते तेव्हा सगळ्यात पहिले आठवतात ते “संयुक्त महाराष्ट्र चळवळी चे दिवस”.
होय भारत स्वातंत्र्या नंतरही महाराष्ट्र हे स्वतंत्र राज्य नव्हत. मराठी भाषिकांचा महाराष्ट्र अनेक प्रांतात विभागलेला होता, विदर्भ हा प्रांत मध्यप्रदेशामध्ये तर मराठवाडा हैदराबादच्या निजामशाहीमध्ये तर मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र गुजरात प्रांतामध्ये विभागलेले होते.
आणि बेळगाव हे कर्नाटक (म्हैसुर प्रांतामध्ये) जे अजुनही तिथेच आहे. या विभागलेल्या विभक्त महाराष्ट्राला संयुक्त करण्यासाठी छत्रपतिंच्या लेकरानी कंबर कसली आणि लाखो गीरणी मजदुर, कामगार आणि दलित वर्गानी एकत्र येवून हा लढा कुठल्याही राजकीय पक्षाच्या मदती शिवाय सुरु केला,
त्याचं नेतृत्व करायला कामगार नेते श्रीपाद अमृत डांगे, सह अनेक ई. मंडळी सरसावली होती. १९५५-५६ पासुन सुरु झालेला हा रणसंग्राम तब्बल ५ वर्षे चालला आणि २१ नोव्हेंबर १९५९ रोजी १०५ हुतात्म्याच्या प्राणाची आहुती घेऊन थांबला. आणि कामगार नेते “श्रीपाद अमृत डांगे” यांची मागणी मान्य होऊन संयुक्त महाराष्ट्राच स्वप्न १ में १९६० “जागतिक कामगार दिनी” सत्यात उतरलं,
तरी बेळगाव च स्वप्न मात्र भंगल, जरी आज बेळगाव महाराष्ट्रात नसेल तरीही महाराष्ट्र रुबाबात, मोठ्या दिमाघात उभा आहे. पण बेळगाव नसल्याची खंत अजुनही जाणवते.
आज त्या १०५ हुतात्म्याच्या रक्त रंजित बलिदानाने पावन झालेला हा लढा थांबला जरी असला तरी संपला मुळीच नाही. आजही प्रत्येक महाराष्ट्रीय मराठी माणसाच्या मनात महाराष्ट्राच्या आणि मराठीच्या विकासाच एक स्वप्न नक्कीच आहे, एक आग त्याच्या हृदयात सतत धगधगत आहे. आज विचार करण्या सारखी गोष्ट अशी आहे कि महाराष्ट्र रुबाबात जरी उभा असला तरी तो खरच सुखात नांदतो आहे का? आज महाराष्ट्रास एकत्र करण्या साठी लढा देणार्या त्या गिरणी कामगारांच्या गिरण्याच्या जमीनीचे लचके तोडण्या साठी नेते, धनाढ्य आणि राज्यकर्त्यांन मध्ये संगनमत झालेले दिसते आहे. आज सगळ्यात मोठा प्रश्न महाराष्ट्रा समोर आहे तो भ्रष्टाचाराचा, बेरोजगारीचा, आणि महागाईचा तरी सुद्धा मनात विश्वास आहे तो महाराष्ट्राच्या प्रगतीचा. कारण काही काळा पूर्वी महाराष्ट्र देशातील सर्वात प्रगत राज्य होत. आपल्या मनातील दुर्दम्य आशावाद हाच महाराष्ट्राच्या प्रगतीचा पाया ठरू शकणार आहे.
प्रत्येक मराठी मनाप्रमाणे माझंही आशावादी मन ह्या महाराष्ट्र भूमी साठी काही स्वप्न रंगवातंय, माझ्या स्वप्नातला महाराष्ट्र जगाच्या पाठीवर कोहिनूर हिर्या प्रमाणे चमकत असेल, इथे छत्रपतींची शिवशाही नांदेल, १०५ हुतात्म्याच्या बलिदानाची प्रेरणा नांदेल, महाराष्ट्राची माय मराठी हिं ज्ञानभाषा असेल, इथे पुन्हा एकदा मजदूर, दलित, कामगार आणि शेतकर्यांच राज्य नांदेल. शेतीसाहित अनेक लहान मोठ्या उद्योगांचा विकास होईल,पण तेही निसर्गाचा समतोल राखून. आणि जागतिकीकरणाचा अधिकाधिक फायदा हि महाराष्ट्राला होईल,
इथला प्रत्येक तरुण सुशिक्षित असेल पण तो बेरोजगार नसेल, माझ्या या स्वप्नाच्या महाराष्ट्रात अनेक उद्योगासहित सहकार क्षेत्राचीही भरभराट हि जगात कुठेही झाली नाही एवढी असेल.त्याच बरोबर इथल्या राजकीय पक्ष्यांच्या भुमिका ह्या सत्ताभिमुख नसुन त्या समाजाभिमुख असेल. त्या मुळे कुठल्या हि ठराविक प्रांतावर कुठल्या हि प्रकारचा अन्याय होणार नाही आणि कुठला हि प्रांत महाराष्ट्रा पासुन वेगळा होण्याचा विचारही करणार नाही. माझ्या या स्वप्नील रंगी रंगलेल्या महाराष्ट्रात कलागुणांना अधिक वाव असेल, महाराष्ट्राच्या भर-भराटी साठी विचारवंतांच्या विचाराची जोड असेल, माझ्या स्वप्नातल्या महाराष्ट्रात अनेक बाबा आमटे, अण्णा हजारे, डॉ आंबेडकर, टिळक, सावरकर, जन्मास येतील.
प्रबळ विश्वासाच्या जोडीने बघितलेलं हे स्वप्न नक्कीच खरं होईल….आणि हा शिवाजी महाराजांचा दुर्दम्य आशावादी महाराष्ट्र पुन्हा एकदा यशाच्या शिकारावर उभा असेल….
डांबराच्या रस्त्यावर मातीच्या पावलांचे ठसे आणि मातीच्या वाटेवर डांबराचे ओरखडे जो पर्यंत पडत राहतील अगदी तोपर्यंत आपला महाराष्ट्र आबादित राहील….
आपल्याही मनात काही स्वप्न महाराष्ट्रासाठी नक्कीच असतील..
जय हिंद…… जय महाराष्ट्र…..
रूचिरा बेटकर,नांदेड.
9970774211