लातूर लोकसभा मतदारसंघात सुमारे 61.41 टक्के मतदान

 

• अभिनव मतदान केंद्रांची संकल्पना ठरली लक्षवेधी
• मतदान केंद्रावर सावली, पिण्याच्या पाण्याच्या सुविधेबद्दल समाधान
• लातूर शहर, ग्रामीण मतदारसंघातील मतदान केंद्रांवर वृक्ष बिया वाटप

लातूर, दि. 07 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीकरिता लातूर लोकसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रिया अतिशय शांततामय आणि उत्साही वातावरणात पार पडली. मतदारांनी सकाळी 7 पासूनच मतदान केंद्रावर मोठ्या संख्येने हजेरी लावून मतदानाचा हक्क बजाविला. लातूर मतदारसंघात एकूण सुमारे 61.41 टक्के मतदान झाले.

लातूर लोकसभा मतदारसंघासाठी तिसऱ्या टप्प्यात झालेल्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणेने जय्यत तयारी केली होती. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या अभिनव मतदान केंद्रांचा उपक्रम लक्षवेधी ठरला. तसेच

उष्णतेच्या लाटेची शक्यता लक्षात घेवून मतदान केंद्रांवर सावलीसाठी उभारण्यात आलेले मंडप, पिण्याचे थंड पाणी, प्रथमोपचार सुविधा यामुळे मतदारांनी समाधान व्यक्त केले. दिव्यांग, वयोवृद्ध मतदारांसाठी प्रत्येक मतदान केंद्रांवर व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आल्याने त्यांचे मतदान सुसह्य झाल्याची प्रतिक्रिया नातेवाईकांनी दिल्या.

लातूर मतदारसंघात सर्वत्र सकाळी 7 पासून मतदानाला सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच मतदार मोठ्या संख्येने मतदानास बाहेर पडल्याचे दिसत होते. सकाळी 9 पर्यंत सुमारे 7.91 टक्के मतदारांनी आपला हक्क बजाविला. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, युवा मतदार यांची संख्या लक्षणीय होती. सकाळी 9 नंतर महिला मतदारांची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून आली. सकाळी 11 पर्यंत सुमारे 20.74 टक्के नागरिकांनी आपला हक्क बजाविला. अनेकजण सहकुटुंब मतदानासाठी आल्याचे चित्र यावेळी दिसत होते. मतदान केंद्रांवर करण्यात आलेली सावलीची सुविधा, पिण्याचे थंड पाणी यामुळे उन्हातही मतदारांना आपला अधिकार बजाविण्यास मदत झाली. दुपारी 1 वाजेपर्यंत मतदारसंघात अंदाज 32.71 टक्के मतदान झाले होते, तर दुपारी 3 पर्यंत मतदानाची टक्केवारी सुमारे 44.45 इतकी झाली होती. तसेच सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुमारे 55.38 टक्के मतदान झाले होते.

वेब कास्टिंगद्वारे लातूर लोकसभा मतदारसंघातील 50 टक्के म्हणजेच जवळपास एक हजार 62 मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कंट्रोल रूम स्थापन करण्यात आली होती.

 

 

जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, प्रभारी अपर जिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम यांनी या कक्षाला भेटी देवून कामकाजाचा आढावा घेतला.

 

मतदारांना रोपे, वृक्षांच्या बियांचे वाटप करून पर्यावरण रक्षणाचा संदेश

लोकसभा मतदारसंघात यावर्षी प्रथमच इकोफ्रेंडली मतदान केंद्रांची संकल्पना राबवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. या उपक्रमांतर्गत लातूर येथील पुरणमल लाहोटी शासकीय तंत्र निकेतन येथे ‘ग्रीन लातूर’ संकल्पनेवर आधारित मतदान केंद्र तयार करण्यात आले होते. याठिकाणी प्लास्टिक वस्तूंचा वापर टाळून पर्यावरणपूरक वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. तसेच याठिकाणी मतदानाला येणाऱ्या प्रत्येक मतदाराला रोपटे देवून वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धनाचे आवाहन करण्यात येत होते. यासोबतच लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील सुमारे 363 मतदान केंद्रांवर विविध प्रकारच्या वनस्पतींच्या बियांचे मतदारांना वाटप करण्यात आले. यामाध्यमातून जिल्ह्यात वृक्षारोपण चळवळ वाढविण्याचे, वृक्ष संवर्धनाचे आवाहन करण्यात आले. यासोबतच लातूर लोकसभा मतदारसंघात समाविष्ट सर्व सहाही विधानसभा क्षेत्रांमध्ये प्रत्येकी एक महिला नियंत्रित मतदान केंद्र, दिव्यांग नियंत्रित मतदान केंद्र, युवा नियंत्रित मतदार केंद्र तयार करण्यात आले होते.

जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांनी केली विविध मतदान केंद्रांची पाहणी

लातूर शहर आणि ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील विविध मतदानकेंद्रांना जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी भेटी दिल्या. गोदावरी लाहोटी कन्या शाळा येथील सखी मतदान केंद्रावरील सुविधांची जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे आणि पोलीस अधीक्षक श्री. मुंडे यांनी पाहणी केली. तसेच तेथील मतदारांकडून या सुविधांबाबत प्रतिक्रिया जाणून घेतल्या.

पुरणमल लाहोटी शासकीय तंत्र निकेतन येथील ग्रीन लातूर मतदान केंद्राला जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली. तसेच येथे साकारलेली संकल्पना लातूरकरांना पर्यावरण रक्षणासाठी प्रेरणा देणारी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांच्या हस्ते मतदारांना रोपांचे वाटप करण्यात आले. राजेवाडी येथील पर्यावरण पूरक मतदान केंद्राला जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सागर, सहायक जिल्हाधिकारी नमन गोयल यांनी भेट दिली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *