ग्रीष्म ऋतू- उन्हाळा

 

ग्रीष्म (उन्हाळा) ऋतू निसर्ग हा एक मोठा जादूगार आहे. आपल्या देशात क्रमाक्रमाने येणारे सहा ऋतू पृथ्वीला व आपापल्या अमूल्य अश्या भेटी देऊन जातात. ग्रीष्म ऋतू(उन्हाळा) म्हणजे खरे तर उकाड्याचा व प्रचंड उन्हाचा ऋतू. परंतु तो तितकाच आवश्यकही असतो.

प्रचंड उष्णता असणारा ग्रीष्म ऋतू (उन्हाळा) वैशाख व ज्येष्ठ महिन्यात येतो. या ऋतूत सूर्य उत्तरायणाच्या दिशेने जातो, त्यामुळे उष्णता वाढते. दिवस मोठा व रात्र लहान होते.
उन्हाळ्यात प्रत्येकाच्या तोंडावर रोज एकदातरी ही वाक्य येतातच. “केवढ गरम होतय आज” रोज मध्ये हा आज असतो. “काय उन पडलय कडकडीत”, “बाहेर नकोस वाटतय उन्हामुळे”, “कधी संपेल हा उन्हाळा ?”
उन्हाळ्याकडे आपण ह्याच दृष्टीने बघतो. तो नकोसा वाटतो. गर्मिने जीव हैराण होतो. खरच आहे ते. पण ह्यातले आपण फक्त अवगुणच पाहतो. पण ह्यात पण बरेच गुण आहेत.

पृथ्वीवरील जलाशयांच्या पाण्याची वाफ होते. पाणी आटते. उष्ण वारे वाहतात. छोट्या वेली वृक्ष पाण्याअभावी जळून जातात. या ऋतूत सूर्याची उष्णता प्रखर असते. उष्णतेमुळे माणसाचे तसेच इतर प्राण्यांचेही जगणे असह्य होते.
आपल्यालाही लवकर थकवा येतो. काम करावेसे वाटत नाही. थंड ठिकाणी राहावेसे वाटते. लोक रात्री उघड्यावर झोपतात. सकाळपासूनच गरम होण्यास सुरवात होते.
उन्हापासून बचाव करण्यासाठी लोक बाहेर जाताना छत्रीचा वापर करतात. थंड पाणी, पेय, आइस्क्रीम यांचे महत्त्व वाढते.

उन्हाळ्यातच मुलांना आणि आपल्याला मार्च, एप्रिल पासून सुट्टीचे वेध लागतात. गावाला जायचे, फिरायला जायचे बेत आखायला सुरूवात होते. मे महीना म्हणजे काय मजेला उधाणच. मामाच्या गावाला जायला मिळते. शाळेला सुट्टी मिळुन झोपेवरचे, खाण्यावरचे बंधन नाहीसे होते. मजा, मस्ती, खेळ, हुंदडण्यात ती रमुन जातात. माहेरवाशीणींना माहेरची मायेची माणस भेटतात, थोरांनाही आपली मुल, नातवंड भेटल्याचा आनंद होतो. नवर्‍यालाही जरा बायकोपासुन मोकळीक मिळते काही जण लांब सफरीला जातात. प्रेक्षणीय स्थळे ह्या दिवसांत आपल्याला पाहायला आलेल्या गर्दी मुळे धन्य होतात तर अनेक आजी आजोबा आपल्या परीवारा सोबत तिर्थ स्थळांना भेटी देउन धन्य होतात.

ह्याच दिवसांमध्ये बहुतांशी जिकडे तिकडे लग्न सोहळे साजरे होत असतात. लग्न घर आनंदाचे सोहळे अनुभवत असतात. नविन नाती जन्माला येतात. तरूण-तरुणी वैवाहीक बंधनात गुंततात आणि नविन स्वप्नांमध्ये तरंगत असतात. प्रेमभावना आणि प्रेम अनुभवत असतात. मोगर्‍याचा सुगंध ह्या दिवसांची आठवण अजरामर करुन ठेवतो.

उन्हाळ्याच्या दिवसांत निसर्गाचा उत्सव असतो. अनेक कवी पावसांवर कविता करुन त्याचे पावसाळ्याचे स्वागत करतात. पण रंगपंचमी रंग उधळत उन्हाळ्याचे स्वागत करते. आमराई बहरुन येते, फळांचा राजा आंब्याचे आगमन होते, काजु दिमाखदारपणे मिरवत असतो. फणसाचा वास घुमू लागतो. कोकमाची झाड रसरशीत भरतात, राना वनात जांभळ, करवंद, आळू, रांजण, जाम, आवळे झाडांच्या फांदी फांदी वर डोलू लागतात.

कडक उन्ह पडायला लागली की सांसारीक बायकांची टिकवण्याचे पदार्थ बनविण्याची लगबग चालु होते. प्रत्येक अंगणात गच्चीवर पापड, कुरडया, फेण्या, शेव असे पदार्थ वाळताना दिसतात, मसाल्यांच्या गिरणिंना ह्या दिवसांत उसंत नसते. ताज्या ताज्या मसाल्याचा वास सगळीकडे दरवळत असतो. लहान मुल ही सुकवलेली आंबोशी, आवळे, फणसपोळी भर उन्हात पळवुन मजा लुटत असतात. लोणची, मुरांब्यांच्या भरलेल्या बरण्या स्वयंपाक घरात मिरवू लागतात.

ह्या दिवसात पाणी म्हणजे जीवन हा समानअर्थी शब्द अधिक तिव्रपणे पटतो. कैरीचे पन्हे, कोकम सरबत, आमरसांच्या गाड्या बाजारपेठेत तळ ठोकुन बसतात.
उन्हामुळे तप्त झाल्यामुळेच पावसाच्या पहिल्या सरीने मातीला मनमोहक सुगंध पसरतो.

पिके चांगली पिकतात.या ऋतूत आरोग्याकडेही लक्ष दिले पाहिजे. उन्हातून आल्यावर लगेच पाणी पिऊ नये. हा ऋतू असा संदेश देतो की, ज्याप्रमाणे प्रचंड उष्णते नंतर पावसाळा येतो.त्याचप्रमाणे दुःखानंतर सुख येते. कष्टांना आपण घाबरू नये. कर्म करीत तेजस्वी बनून सूर्याप्रमाणे चमकावे.

ग्रीष्म ऋतुतच आंबे मोठ्या प्रमाणावर मिळतात. त्यामुळे खूप गरम होत असले तरीही शाळेच्या सुटया व आंबे यामुळे ह्या ऋतूचा मनमुराद आस्वाद घेता आला पाहिजे.

रूचिरा बेटकर,नांदेड.
9970774211

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *