गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानात शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्यने सहभागी व्हावे – जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

 

लातूर, : तलावातील सुपीक गाळ आपल्या शेतात टाकून जमीन अधिक सुपीक बनविण्याची संधी गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानामुळे शेतकऱ्यांना मिळत आहे. तसेच तलावातील गाळ उपसला गेल्याने अधिकचा पाणीसाठा निर्माण होवून सिंचनासाठी मदत होणार असल्याने शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने या अभियानात सहभागी होवून आपल्या परिसरातील तलावातील गाळ उपसा करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानातून रेणापूर मध्यम प्रकल्पातील गाळ उपसा करण्यात येत असून या कामाची जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी पाहणी केली. औसा-रेणापूरचे उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे, लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित जगताप, जिल्हा जलसंधारण अधिकारी अनिल कांबळे यांच्यासह स्थानिक शेतकरी यावेळी उपस्थित होते.

सध्या जिल्ह्यातील तलावांमधील गाळ उपसा करण्याला प्रशासनाने प्राधान्य दिले आहे. पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्त प्रकल्पांमधील गाळ उपसा करण्याचे नियोजन असून या कामामध्ये शेतकऱ्यांचा सहभाग आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी आपल्या आजूबाजूच्या तलावातील गाळ उपसा करण्यासाठी जलसंधारण विभागाकडे मागणी नोंदवावी. पावसाळ्यापूर्वी तलावातील गाळ उपसा झाल्यास तलावाच्या साठवण क्षमतेत वाढ होणार असून त्या पाण्याचा शेतीसाठी लाभ होईल, असे जिल्हाधिकारी म्हणाल्या.

रेणापूर मध्यम प्रकल्पातून आजूबाजूच्या 7 ते 8 गावातील शेतकऱ्यांनी लोकसहभागातून गाळ उपसा सुरु केला आहे. आतापर्यंत सुमारे 2 लाख 20 घनमीटर गाळ उपसा करण्यात आला आहे. या तलावातील जास्तीत जास्त गाळ उपसा करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

काटगाव येथे जलयुक्त शिवार अभियानाच्या कामाला भेट

लातूर तालुक्यातील काटगाव येथे जलयुक्त शिवार अभियानातून करण्यात आलेल्या नाला खोलीकरण व रुंदीकरण कामाला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी भेट देवून पाहणी केली. याठिकाणी जवळपास 4 किलोमीटर लांबीच्या नाल्याचे रुंदीकरण व खोलीकरण करण्यात आले असून नाल्यातील अंदाजे 38 हजार घनमीटर गाळ उपसण्यात आला आहे. त्यामुळे 380 सहस्त्र घनमीटर अतिरिक्त पाणीसाठा होवून या पाण्याचा फायदा आजूबाजूच्या 50-60 विहिरी, विंधन विहिरींना होणार आहे.

ग्रामपंचायत, तसेच स्वयंसेवी संस्थांनी या नाल्याच्या दोन्ही बाजूला मृद व जलसंधारणासाठी वृक्ष लागवड करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी केले. लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित जगताप, जिल्हा जलसंधारण अधिकारी अनिल कांबळे, नायब तहसीलदार गणेश सरोदे, महादेव गोमारे यांच्यासह स्थानिक शेतकरी यावेळी उपस्थित होते. टाकळी येथे आर्ट ऑफ लिव्हिंगमार्फत करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीचीही जिल्हाधिकारी यांनी पाहणी केली.
*****

Collector & District Magistrate, Latur
Latur Police Department
Z P Primary School Parunagar Murud Tq and dist Latur

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *